चौल व रेवदंडा - दोन प्राचीन शहरे

चौल व रेवदंडा ही दोन प्राचीन महत्व असलेली गावे अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून १६ किमी अंतरावर आहेत. सुमारे अडीच हजार वर्षाची प्राचीन परंपरा या गावांना  लाभली आहे.

चौल व रेवदंडा - दोन प्राचीन शहरे
चौलचे रामेश्वर मंदिर व रेवदंड्याचा किल्ला

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

या गावांचा प्राचीन इतिहास इतका मनोरंजक और की तो सांगण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आज जरी चौल आणि रेवदंडा ही स्वतंत्र गावे असली तरी फार पूर्वी ही दोन्ही गांवे एकच होती व अनेक नावांनी ती ओळखली जात होती. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, इटालियन. पार्शियन, चीनी इत्यादी परकिय प्रवाश्यांनी तत्कालीन वर्णन आपल्या प्रवासवृत्तांत केले आहे.

आज वाचतांना तुम्हाला नवल वाटेल पण त्याकाळी चौल शहरांत सुमारे ३५० देवळे होती. दिड लाख टुमदार इमारतींनी या शहराची शोभा वाढली होती. अनेक प्रकारचे कारागीर व  कलावंत चौल येथे होते. सुतीच्या झाडापासून रेशीम काढण्याचा व्यवसाय व त्यापासून पितांबर तयार करणे, रेशमी कापड बनविणे वगैरे व्यवसाय चालत. त्याकरिता कच्चा माल चीन देशातून मागवित. धनधान्याची विपुलता असलेले हे चंपावती नगर (चौल) ' श्रीमंत व्यापारी नगर' म्हणून ओळखले जात होते. असो, तेव्हाच्या अष्टागारांत म्हणजेच आजच्या अलिबाग तालूक्यांत कशा कशा सत्ता होत्या त्या पहा. रेवदंडा पोर्तुगीज सत्तेखाली, चौल मुसलमान सत्तेखाली आणि नागावपासून उत्तरेकडे आंग्रे यांची सत्ता. १५०५ साली आलेल्या पोर्तुगीजांनी तब्बल २३५ वर्षानंतर १७४० साली रेवदंडा हे ठिकाण किल्ल्यासह मराठ्यांच्या स्वाधीन केले.

त्याकाळच्या (फार पूर्वी नव्हे) व्यापारासंबंधीत काही महत्वपूर्ण माहिती अशी सापडते की, दोनशे वर्षांपूर्वीचा १ खंडी भाताचा भाव ८ रु. ते १२ रु. होता. साधारण दिडशे वर्षापूर्वी नागवेलींची पाने १ आण्यास हजार पाने व्यापारी खरेदी करत. रेशीम उद्योगावर रेशमीकर आकारला जाई. स्थानिक भंडारी समाज ताडीमाडीचा व्यवसाय करीत. क्वचित प्रसंगी मोहाची दारू काढीत व त्यावर मोहतरफा नावाचा कर भरीत असत. मिठाचा व्यवसाय भरभराटीस होता त्यावेळी एक गोण मीठ १ रु. मिळत असे. मत्स्यव्यवसाय नेहमी फायद्यात चालत होता. मासळीसंबंधी गंमतीदार नोंद वाचनात आली ती अशी की, संभाजी आंग्रे यांनी सातारच्या शाहूमहाराजांना भेट म्हणून काही वस्तुंसोबत मासे पाठविले होते. परंतु त्यावेळी शाहूमहाराज आंग्र्यांवर नाराज  असल्यामुळे सर्व भेट परत पाठविली पण मासे मात्र घेतले ! साधारण २५०  वर्षांपूर्वी  फक्त  १ रु. मध्ये शंभर नारळाची गोण मिळत असे. तर सुपारीचा भाव मणास ३ रुपये होता. दोन आणे म्हणजे पूर्वीची चवली. १ चवलीस एक कोंबडे मिळत होते. रुपया सव्वा रुपयाला १ बोकड किंवा बकरी मिळत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी नोंद सापडते ती अशी की, मुसलमानी सत्ता नष्ट करून  त्यावेळच्या अष्टागारांत (अलिबागेत) मराठी सत्ता आल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सारावसुली रोख रक्कम व वस्तूंच्या स्वरूपांत चालू केली. यामागचा उद्देश हा की सरकारी नोकर अस्वस्थतेच्या काळात लुटला गेला तर त्याला उदरनिर्वाहाची काळजी पडू नये. कारण वस्तुंचा साठा सहसा लुटला जात नव्हता. म्हणजे सरकारी नोकरांच्या सुरक्षिततेची किती काळजी घेतली जात होती. त्याकाळच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पाहू, नाण्यांची नावे पुढीलप्रमाणे होती. सजगनी, (ढबू) शिवराई , चौलच्या सुभ्यांतील नाण्याला चौली लारी म्हणत. तसेच लारी हे चांदीचे नाणे १ रु. म्हणजे ५ लारी. तसेच अशर्फी बुजरुकी, आंग्र्यांनी ' अलिबाघी' रुपया हे नाणे सुरू केले. नागाव येथे नाणी पाडण्याची टाकसाळ होती व त्याच्या प्रमुखाला पोतदार म्हणत असत. त्याशिवाय सपिका, दमडी हीसुद्धा नाणी प्रचारात होती. १८५६ साली ही सर्व नाणी प्रचारातून बंद होवून इंग्रजी रुपया प्रचारांत आला.

अशाप्रकारे एके काळी वैभवात असणारी रेवदंडा व चौल ही नगरे काळाच्या ओघांत हळूहळू आपले वैभव हरवून बसली . निजाम शहा, आदिलशहा, पोर्तुगीज, सिद्दी, मराठे, पेशवे, आंग्रे आणि इंग्रज यांच्यातील सतत होणा-या लढयांनी जनजीवन विस्कळीत झाले नगराचा विध्वंस झाला. आणि इंग्रजांची मुंबईची राजवट सुरू जाहल्यावर या दोनही नगराचे महत्त्व हळूहळू कमी झाले.