मौजे उंबर्डी - एक ऐतिहासिक गावं

काळनदीच्या  उगमावरच वसलेलं हे गाव जव्हार (पालघर) च्या एका लढाऊ राजघराण्याचं मूळगाव. महादेव कोळी समाजातील देवराम मुकणे उर्फ जयाबा यांनी १३४३ मध्ये स्थापन केलेल्या जव्हारच्या स्वतंत्र राजघराण्याचे मूळगाव उंबर्डी असल्याचा उल्लेख सापडतो. - श्री.रामजी कदम

मौजे उंबर्डी - एक ऐतिहासिक गावं

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

किमान १४०० वर्षांचा इतिहास लाभलेले रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या निजामपूर विभागातील गाव म्हणजे उंबर्डी. पुणे जिल्ह्यातून ऐतिहासिक देवघाटातून उतरणारी  चिंचोळी पायवाट याच गावात उतरते म्हणूनच मराठ्यांनी आणि गनिमांनी सुध्दा कोकणात प्रवेश करण्यासाठी याच देवघाटाचा वापर केल्याचे दिसून येते.

उंबर्डी गाव म्हटलं तर छोट्या छोट्या वाड्यांचं एक संस्थानच. मोरेवाडी, साळुंखेवाडी, हळंदेवाडी, बगडेवाडी, कुर्डूपेठ, आदिवासीवाडी , बौध्दवाडी आणि धनगरवाडी. शहाण्णव कुळी मराठा वस्ती असलेल्या गावात मोरे, लाड, जाधव, हळंदे, बगडे, साने, शेडगे, धामुणसे, साळुंखे,  पळसकर,  धोंडगे, सुर्वे, पवार, तसेच कोकरे, होगाडे, गंगावणे  या उपनामाची कुटुंबं राहत आहेत.

काळनदीच्या  उगमावरच वसलेलं हे गाव जव्हार (पालघर) च्या एका लढाऊ राजघराण्याचं मूळगाव. महादेव कोळी समाजातील देवराम मुकणे उर्फ जयाबा यांनी १३४३ मध्ये स्थापन केलेल्या जव्हारच्या स्वतंत्र राजघराण्याचे मूळगाव उंबर्डी असल्याचा उल्लेख सापडतो. राजघराण्याचा मूळ पुरूष देवराम मुकणे याच्या वंशजांनी तब्बल ६०० वर्षे स्वतंत्र राज्यकारभार केला. उंबर्डीच्या पूर्वेला असलेल्या रहाट परिसरात एकेकाळी याच मुकणे घराण्याचं वैभवसंपन्न राज्य होतं. ४० ते ६० फूट लांबीच्या तटबंदीचे अवशेष आजही याठिकाणी पाहायला मिळतात.  देवाचा सर्वा या भागात तर आजही काही भव्य उध्वस्त चौथरे दिसून येतात. काळनदीच्या ईशान्येकडील भूभागाला सातनाल असं म्हणतात, तर त्याच्याच पुढे दक्षिणोत्तर पसरलेल्या सपाट प्रदेशाला कळकीचा गवंड असं स्थानिक नावं आहे.

इथल्या पंधरा सोळा फूट उंच चौकोनी तटबंदीकडे पाहिल्यानंतर तत्कालीन वैभवाची कल्पना करता येते. लिंग्या घाटाच्या अलीकडे डोंगरकड्यातून कशेडी नाल दिसते. या कशेडी नालेच्या पायथ्याशी सपाटीवर एक चौथरा दिसतो त्याला गोसाव्याचा मठ असं म्हटलं जातं. शोधूनही सापडणार नाही इतकं प्राचीन अवशेष याच उंबर्डी परिसरात दिसतात. वीरगळ, गजांतलक्ष्मी शिल्प, शिवमंदिरं, जाते, उखळ, राजवाड्याचे अवशेष, भूमिगत पाणी योजना, गुप्त तळघरातील जिने हे सारं अनुभवयाचं असेल तर प्राचीन नगरीकडे फुरसतीचा वेळ काढून जायलाच पाहिजे.

उंबर्डीचाच एक भाग असलेलं कुर्डूपेठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या  एका निष्ठावंत मावळ्यांचं जन्मगाव. पायदळाचे सरसेनापती येसाजी कंक यांचा जन्म  इथं झाल्याचा उल्लेख रायगड जिल्हा गॅझेटीयरमध्ये सापडतो. कुतुबशहाच्या दरबारात हत्ती लोळवणारा रांगडा मर्दगडी याच मातीत जन्मला. इतिहासाने दखल घेतली पण वर्तमान अनभिज्ञ आहे. काल्पनिक पात्र असलेल्या जेम्स बाॅन्ड च्या खोट्या वास्तूचं जतन परदेशात होतं पण रक्ताचा अभिषेक घालून , आम्हाला मराठेपण मिरवायचं भाग्य ज्यांच्यामुळे लाभलं त्यांनाच आम्ही विसरलोय.

उंबर्डी गावातलं हेमाडपंथी शिवमंदिर म्हणजे तत्कालीन वास्तुकलेचा अजोड नमुना. एकावर एक दगड रचून शुष्कसंधी बांधकाम असलेल्या शिवमंदिराने किमान नऊशे वर्षे आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलंय. मंदिराच्या आवारात जवळपास ४० वीरगळ पाहायला मिळतात. शिवमंदिराच्या उत्तरेला गावाच्या वेशीवरच मारूतीरायाचं शिल्प दिसतं. तेथील खुणांवरून कळतं कि कधीकाळी अंजनीसुताचं मंदिर इथं असावं. याच आवाराच्या पूर्वेला गच्च झाडीमध्ये काही घडीव समाधीशिळा पाहायला मिळतात. सध्याच्या धनगरवाडीच्या पाठीमागे ग्रामदैवत श्रीकाळभैरवाचं मंदिर आणि समोरच मोकळ्या मैदानावर एका अनामिक वीराचं चित्र असलेली चौकोनी समाधीशिळा दिसते. कुर्डूगडाशी संबंधित खंडनाक, बाजी पासलकरांचा आश्रित अनंता खुर्सुले कि बाजींचा विश्वासू येलजी गोटेकर यांची समाधी? कोण? हातात तलवार घेऊन युध्दासाठी सज्ज असलेला तो मावळा कोण असेल? हे आत्ता आमचं इतिकर्तव्य आहे त्या वीराच्या स्मारकाला न्याय देणं.

उंबर्डी बौध्दवाडीच्या अलीकडे देशसेवेतल्या एका फौजींचं स्मारक दिसतं. गंगावणे कुटुंबांतील या वीराने १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युध्दात पराक्रम गाजवला होता. त्यांचीच स्मृती म्हणून अर्धाकृती पुतळा उभारला आहे. प्रत्येक भारतीयाने जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी असं आळवत माथा झुकवलाच पाहिजे.

अख्ख्या माणगाव तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेल्या काळनदीचं उगमस्थान पावसाळ्यात तर इतकं विलोभनीय दिसतं. पेठेतल्या सांबरे च्या घरचं गरमागरम दुधाचे पेले रिचवायचे. काटकोनातल्या उतारावरून जंगली श्वापदांचा अदमास घेत घेत त्या प्राचीन नगरीच्या तटबंदीवर काही क्षण उसंत घ्यायची. हेमाद्री पंडिताने बांधलेल्या शिवालयातल्या पिंडीवर बेल किंवा निर्गुडीचं पान वाहायचं. तिथंच वेशीवर तिन्ही त्रिकाळ रक्षण करत असलेल्या अंजनीसुतासमोर खड्या आवाजात मारूती स्तोत्र म्हणावं. खळखळत्या नदीपात्रात उतरायचं. इथल्या असंख्य राजवटी आठवत आठवत निरोप घ्यायचा.

असं हे आपलं सरसेनापती येसाजी कंकांचं गाव. महादेव कोळी समाजाच्या लढाऊ देवराम मुकणे राजाचं गाव. काळनदीच्या व्युत्पत्तीचं गाव. ऐतिहासिक उंबर्डी.

- श्री.रामजी कदम