इतिहासातील एक खुनाची घटना व कोकणातून घाटावर जाणारा रस्ता
या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड पार करून वाकण फाट्याहून पालीस जावे लागते व पालीहून जांभूळपाड्यास जावे लागते.
इतिहासातील काही घटना माहितीपूर्ण तर काही बोधपूर्ण असतात. अनेकदा इतिहासात घडून गेलेल्या छोट्या छोट्या घटनांचा उपयोग तत्कालीन सामाजिक व भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासही उपयुक्त ठरतो. इसवी सन १८०७ मध्ये घडलेली अशीच एक घटना म्हणायला तशी दुय्यम असली तरी त्यातून तत्कालीन सामाजिक स्थिती व कोकणातील काही मार्गांची माहिती चांगल्या पद्धतीने मिळते.
ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील तळे येथील. तळे हे गाव पूर्वी माणगाव तालुक्याचा भाग होते, कालांतराने त्याचा एक स्वतंत्र तालुका होऊन तळे हे तालुक्याचे मुख्यालय झाले. याच तळे गावात बाबा देशमुख नावाचे गृहस्थ राहत होते. देशमुखी असल्याने घरी नोकर चाकर विपुल असणारच. अशाच एके दिवशी देशमुखांची एक मोलकरीण तळ्याहून पळून पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील कुवारीगडास (कोरीगड) गेली. बाबा देशमुखांना ही गोष्ट समजली व त्यांनी तिला शोधून आणण्यासाठी आपल्या राम्या आणि सुडक्या या चाकरांना घेऊन कुवारीगडाचा प्रवास सुरु केला.
तळ्याहून कुवारीगडास जाऊनही मोलकरणीचा शोध लागला नाही म्हणून बाबा देशमुख राम्या आणि सुडक्या या दोघांना घेऊन कुवारीगडाहून तळ्यास जाण्यास निघाले. कुवारीगडाहून त्यांनी घाट उतरला आणि जांभुळपाडा मार्गे पालीस आले. पालीस येताना दुपार झाली म्हणून सर्वानी तेथे भोजन केले आणि तेथून सुकेळी खिंड गाठली आणि ती पार करून खिंडीच्या दक्षिण दिशेस आले.
बाबा देशमुखांना याची कल्पना नव्हती की आपल्यापुढे काय प्रसंग गुदरणार आहे. खिंड ओलांडताच बाबा देशमुख यांच्या अंगावर ओझे ठेवून राम्याने त्यांच्या अंगावर टोणपा घातला.अचानक झालेल्या हल्ल्याने सावध होण्याचा प्रयत्न करीत असताना टोणप्याचा दुसरा घाव त्यांच्या अंगावर झाला आणि त्यांचे प्राण गेले.
राम्या सोबत असलेला सुडक्या मागे चालत होता. हा कट त्याला ठाऊक होता मात्र त्याने थेट हल्ला केला नाही. यानंतर दोघांनी बाबांचे प्रेत व सामान सुमान कोलाड येथील डोहात बुडवले आणि त्यानंतर तळ्यास जाऊन लोकांना सांगितले की सुकेळी खिंड ओलांडून आम्ही सर्व पलीकडे आलो तेव्हा सात चोर येऊन त्यांनी बाबास सोट्यानी ठार मारले, आम्ही जीव घेऊन पळालो म्हणून वाचलो.
यानंतर बाबांचा मृतदेह शोधण्यासाठी तळ्याचे माधवराव कुलकर्णी दहा बारा जणांना घेऊन गेले असता त्यांना समजले की शिरवली येथील लंबोदर जोशी यांना तो मृतदेह मिळाला मात्र कुणा ब्राह्मणाचा असेल असे वाटून त्यांनी सरकारची आज्ञा घेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले.
यानंतर तीन महिने गेले आणि एके दिवशी सुडक्या एका दुसऱ्या चाकरासोबत बोलत असताना म्हणाला की बाबा देशमुख चांगला माणूस होता मात्र राम्याने घात केला. हे ऐकून चाकराने सुडक्याची मान पकडली व त्यास सरकारात दिला. तेथे सुडक्या व रामा दोघांची कठोर चौकशी झाली यावेळी राम्याने सांगितले की धनी कामकाजावरून लय किरकिर करत म्हणून ठार मारले.
गुन्हा कबूल झाल्यावर सरकारने राम्यास फाशी दिली आणि सुडक्याचे या गुन्ह्यात सामील असल्याबद्दल हात पाय तोडले. या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड पार करून वाकण फाट्याहून पालीस जावे लागते व पालीहून जांभूळपाड्यास जावे लागते. जांभूळपाड्याहून पूर्वी वाघजाई आणि सवाष्णी हे घाट पायी प्रवास करणाऱ्यांसाठी वापरात होते मात्र आता ते बंद असून सध्या खोपोली मार्गे पुणे येथे जाणारा राज्यमार्ग वापरून लोणावळ्याहून कुवारीगडास जाता येते.