नागेश्वर मंदिर - वेळवंड

भोर तालुका म्हणजे शिवकाळच्या इतिहासाला दिशा देणारी ऐतिहासिक व निसर्गसंपन्न भूमी. भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर वेळवंड नामक खेडेगाव आहे

नागेश्वर मंदिर - वेळवंड

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भोर तालुका म्हणजे शिवकाळच्या इतिहासाला दिशा देणारी ऐतिहासिक व निसर्गसंपन्न भूमी. बारा मावळापैकी वेळवंडी नदी तीराच्या दुतर्फा असलेली सुमारे बत्तीस गावांचे मिळून वेळवंड खोरे वसले आहे, मात्र प्रत्यक्षात यात तीसच अस्सल ग्रामीण संस्कृतीची जपणूक करणारी खेडी आहेत.

भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर वेळवंड नामक खेडेगाव आहे. वेळवंडी नदीवर ब्रिटिशकाळात म्हणजेच इ.स.१९२७ साली २४.५ टि.एम.सी. पाणीसाठा करू शकणारे भाटघर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरण झाल्यामुळे या खो-यातील गावे विस्थापित झाली आहेत. गावे विस्थापित होताना गावातील नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली ग्रामदैवते मात्र मूळ गावठाणातच राहिली असून ती धरणाच्या जलसाठ्यात गेली आहेत. मे महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावर ही ग्रामदैवतांची लहान मोठी मंदिरे आपल्या दृष्टीस पडतात.

दोनतीन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर शिंदे आबा यांनी माझे भोर या समूहावर या संबंधातील माहिती व मंदिर अवशेषांची प्रकाशचित्रे प्रसिध्द केली होती. नागेश्वरचे पुरातन मंदिर पाहण्याचा मनात विचार सुरू झाला आणि पहिले नाव डोळ्यासमोर आले ते माझे स्नेही व भटकंतीची आवड असणारे श्री आनंद गोसावी सर यांचे.

पर्यटनाचा पुरेपूर आनंद घ्यावा तो फक्त आनंदरावांसोबत. आम्ही दोघेही वेळवंडला जाण्यासाठी दुचाकीवरून निघालो. बारे-म्हाळवडी-कर्नवडी-पसुरे-राजघर मार्गे वेळवंड येथे पोहोचलो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली फणसाची झाडे, काळ्याभोर करवंदाच्या जाळ्या, आब्यांची, उंबराची व लेंडी जांभूळ इत्यादी झाडे पाहून चैतन्य येत होते. राजघरपासून पुढे गेल्यावर वेळवंडच्या अलिकडे कांबळे वस्ति / दिघे वस्ति म्हणून डाव्या बाजूस आहे. तेथून नदीपात्राकडे जाणारा एक रस्ता आहे व येथून फक्त ५०० मीटर अंतरावर पुरातन पूर्वाभिमुखी नागेश्वर मंदिर आहे. भोरपासून हे मंदिर सुमारे २२ कि.मी. अंतरावर आहे.

नदी पात्राकडे जाताना समोर दिसणारा दुर्गराज राजगडचे विलोभनीय दर्शन होते. या वेळवंड गावाच्या नावामुळे ह्या नदीस वेळवंडी हे नाव मिळाले असावे, तर तिच्या दोन्ही तीरावर असलेल्या गावांच्या समुहास वेळवंड खोरे हे नामकरण झाले. वेळवंड खो-याची ऐतिहासिक काळातील देशमुखी ही बाबाजी अढलराऊ यांच्याकडे असल्याचा उल्लेख येतो, तर आडनावाचा उल्लेख ' डोहर किंवा ढोर ' येतो. या घराण्याला 'अढळराव' असा किताब होता. वेळवंड खो-याचे देसकुलकर्णी हे मोरो विठ्ठल हे असल्याचा उल्लेख २१ मार्च १६५७ च्या मजहरात येतो. या खो-यात असणारी लोकवस्ति लहान लहान खेड्यात वास्तव्य करीत होती व त्या गावांच्या नावामागे मौजा ही उपाधी असायची, मात्र ऐतिहासिक कागदपत्रात या खो-यातील फक्त हर्णस या गावाच्या नावामागे कसबा ही लावलेली होती. यावरून हर्णस हे वेळवंड खो-याचे मुख्य ठिकाण होते हे अधोरेखित होते. कसबा हर्णस येथे शिरवळ परगण्याच्या देशमुखीविषयी एक मजहर शुक्रवार ३ डिसेंबर १६८० रोजी झाला होता, या मजहरच्या हाजिर मजालसीत मोरो विठ्ठल याच्या मुलाचा उल्लेख 'अंताजी मोरदेव देशकुलकर्णी ता| वेलवंडीखोरे' असा येतो.

मंदिरासमोर सुमारे चार फूट उंच व चार फूट लांबीची नंदी विराजमान आहे. नंदीच्या अंगावर नक्षीदार झुल पांघरलेली असून गळ्यात आभुषणांची माळ व घंटा सदृश्य आभुषण स्पष्टपणे दिसून येते. आजूबाजूच्या मोकळ्या पटांगणात अनेक स्मृतीशिळा,समाधिशिळा चौथरे, सतीशिळा व वीरगळ अस्ताव्यस्त विखुरलेल्या आहेत. सर्व समाधि व स्मृतीशिळा मिळून दहापेक्षा जास्त असल्याचे लक्षात येते. मग आपण नागेश्वराचे दर्शनासाठी जाताना आजूबाजूला मंदिराचे विखुरलेले दगडी अवशेष लक्ष वेधून घेतात.

पूर्वाभिमुखी नागेश्वर मंदिराची रचना सभामंडप, अंतराल व गर्भगृह असून सुमारे १२ ×१२ फूट क्षेत्रफळाचा सभामंडप नामशेष झाला असून फक्त चौधरा शिल्लक आहे. या चौथ-याच्या उजव्या कोपऱ्यावर उभी रचनेतील भग्न झालेली मूर्ती दिसून येते, तर डाव्या बाजूला बैठ्या स्थितितील भग्न मूर्ती लक्ष वेधून घेते. या दोन्हीहि मूर्त्यांच्या मूळ जागा ह्या निश्चितच नसाव्यात. सभामंडपाच्या मध्यभागी जमिनीवर कासवाचे दगडी पुरातन शिल्प असून शुष्क सांधा बांधकामातील अंतरालचे लहान प्रवेशद्वार आहे. ५×५ फूट आकाराचे अंतराल काहीसे खोलगट असून गर्भगृहाचे प्रवेशद्वारावर दगडी गणेशपट्टी आहे तर दरवाजा जमिनीवर चक्क एक वीरगळ आहे. उत्तरेकडे पन्हळी असलेल्या श्री नागेश्वरच्या शिवलिंग दर्शनाने प्रसन्नता येते. पाठीमागील कोनाड्या एका दैवतची मूर्ती विराजमान आहे. अंतराल व गर्भगृहाच्या छतावर अष्टदल कमलपुष्प कोरलेले आहे.

१० × १२ फूट मंदिराला शिखर नाही. चारहि बाजूच्या भिंतीच्या तळाशी एक थर हा वीरगळचा केलेला आहे. मंदिर पाणीसाठ्यात गेल्यावर मंदिराची पडझड झाल्यावर कधीतरी उन्हाळ्यात याचे पुन्हा बांधकाम केले असणार तेव्हा बांधकाम करणाऱ्या कारागीरांना वीरगळचे ऐतिहासिक महत्त्व माहित नसल्यामुळे हे होणे शक्य आहे. मी मंदिर व परिसरात दिसणाऱ्या वीरगळ मोजून पाहिल्या तेव्हा त्यांची संख्या पंचवीस ते तीस इतकी भरली आणि आजूबाजूच्या मातीत किति असतील याचा अंदाज नाही. सभाधिशिळा व चौथरे, स्मृतीशिळा यांची संख्या विलक्षण मोठी आहे. वेळवंड हे गाव राजगड किल्ल्याच्या समीप असल्याने इतिहासकाळात या भूमीत अनेक लहानमोठे संघर्ष झाले असणार ह्यांचा हा मोठा पुरावा आहे. स्वधर्म रक्षणासाठी अज्ञात असलेल्या या भूमीतील अनेकांनी बलिदान दिले असल्याचे इतके पुरावे खचितच इतर कोठे असतील ! या सर्व स्मृतींचे तज्ज्ञाकडून विश्लेषण करून तो वारसा जपला गेला तर ऐतिहासिक काळात बलिदान दिलेल्या नरवीरांना त्यांच्या बलिदानाला यथोचित सन्मान दिल्याचे नक्कीच समाधान मिळेल. भविष्यकाळात भोर तालुक्याच्या इतिहासात वेळवंड गावाला व खो-याला उचित जागा मिळेल.

२९ मे २०१७ नंतर आज बरोबर चार वर्षांनी मला पुन्हा एकदा आनंद गोसावी सरांबरोबर हा भोर तालुक्याच्या ऐतिहासिक ठेवा पाहता आला आणि नागेश्वराचे दर्शन घेता आले हे मी माझे परमभाग्य समजतो.

संदर्भ -

  • श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
  • विकिपिडीया मराठी

- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])