कनकेश्वर - येथे केला होता महादेवांनी कनकासुराचा वध

महाराष्ट्रातील विशेष प्रसिद्ध शिवमंदिरांमधील एक असणारे शंकराचे कनकेश्वर हे स्वयंभू मंदिर रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले आहे.

कनकेश्वर - येथे केला होता महादेवांनी कनकासुराचा वध
कनकेश्वर

महाराष्ट्रातील विशेष प्रसिद्ध शिवमंदिरांमधील एक असणारे शंकराचे कनकेश्वर हे स्वयंभू मंदिर रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले आहे.

कनकेश्वर येथे येण्यासाठी सुमारे ७०० पायऱ्या चढाव्या लागतात. या पायर्‍या १७७४ मध्ये रघुजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रंगदास यांनी बांधल्या. डोंगराच्या पायथ्याला नारोपंत प्रधान यांची समाधी आहे. 

काही अंतर चढल्यावर उजव्या बाजूला नागोबाचा टप्पा लागतो आणि त्याच्यावर गायमंडीचा टप्पा लागतो, गायमंडीचा टप्पा म्हणजे एका खडकाच्या खळग्यात गायीचे पाऊल असुन बाजूला पाच शिवलिंगे आहेत, एका गुराख्याच्या गायीच्या स्मरणार्थ ही जागा बांधली आहे. 

पुढे निबीड जंगलातून जाताना पालेश्वर महादेवाचे मंदिर लागते, या देवाला पालाच वाहतात म्हणून हे देवस्थान पालेश्वर म्हणून ओळखले जाते. येथून थोड्याच अंतरावर कनकेश्वर मंदिर आहे.

ब्रह्मकुंडाच्या जवळ मिरचीबाबांची समाधी आहे. जवळच नव्यानं बांधलेलं गोलाकार प्रेक्षणीय श्रीकृष्ण बलराम मंदिर आहे. कनकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस मोठी पुष्करणी आहे, इथं बारा महिने पाणी असते. पुष्करणीच्या पश्चिम काठावर कनकेश्वरचं पश्चिमाभिमुख मंदिर आहे. 

महादेवाने कनकासुर या राक्षसाचा वध याच ठिकाणी केला म्हणून या ठिकाणास कनकेश्वर हे नाव मिळाले अशी अख्यायिका आहे. याशिवाय सोन्यास संस्कृत भाषेत कनक असे नाव आहे त्यावरूनही या देवतेस कनकेश्वर हे नाव मिळाले असावे. 

पृथ्वी जिंकून ती ब्राह्मणाला दान दिल्यानंतर सागराला हटवून परशुरामानं ही भूमी निर्माण केली अशी आख्यायिका आहे. रेवस ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास करुन परशुरामानं अनेक आश्रम तयार केले. त्यातील पहिला आश्रम त्यांनी कनकेश्वर येथे स्थापन केला.

कनकेश्वरचे शिवस्वरुप नेहमीप्रमाणे जमिनीवर वेदी किंवा शाळुका व तिच्या मध्यभागी लिंग नसून सहा पायऱ्या खाली उतरल्यावर पांढऱ्या रंगाची गुळगुळीत फरशी असलेल्या गाभाऱ्यात मध्यभागी जमिनीखाली खोलगट भागात स्वयंभू शिवस्वरुप आहे. खोलगट भाग झाकून जाईल एवढ्या आकाराचे, पृष्ठभागावर काढता घालता येईल असे गोलाकार पितळी लिंग व त्यावर मुखवटा आणि लिंगास वेटोळे घालून पाठीमागच्या बाजूनं उभा असलेला व मुखवट्याच्या वर पंचमुखी फणा काढलेला व फिरवता येईल असा पितळी नाग आहे. जमिनीपासून थोडे वर असलेली शाळूकाही संपूर्ण पितळी पण आच्छादलेली आहे.

कनकेश्वर मंदिर चालुक्य किंवा हेमाडपंथी पद्धतीचं असून ते अकराव्या शतकातील आहे. मंदिरास चांदणीच्या टोकांसारखा आकार आहे. प्रत्येक कोपर्‍यावर वानरांची मूर्ती असून सर्व बाजूंना देवांच्या मूर्ती आहेत. दक्षिणेस भैरव , त्याखाली ब्रह्मा व सावित्री, उजवीकडे गायत्री, सर्वात खाली दोन हत्ती तसेच बाजूलाही भैरव, शंकर व दोन हत्ती आहेत. मंदिराच्या बाजूला भिमकुंड तसेच विष्णुतीर्थ आहे.

कनकेश्वर येथे सहा धर्मशाळा आहेत. मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. आंग्रे घराण्याचं कुलदैवत असलेल्या कनकेश्वरला सर्वात मोठा उत्सव कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेला भरतो. इतरही अनेक उत्सव येथे सुरु असतात. कनकेश्वर परिसरातील थंडगार हवा व दाट वनराईमुळे या परिसराची पर्यटकांवर मोहिनी पडल्याशिवाय रहात नाही. येथील व्याघेश्वर या स्थानावरुन पक्ष्यांचा किल्ला व अभयारण्य कर्नाळा , माणिकगड, सागरगड व खांदेरी आणि उंदेरी हे जलदुर्ग दिसतात. झिराडकडून मुख्य मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर काका देसाई यांनी बांधलेले पात्रुदेवीचे मंदिर आहे या मार्गावरुन सुमारे ६० मीटर खाली गेल्यावर समुद्र व महामुंबई दिसून येते.

जायचे कसे? - अलिबाग रेवस रस्त्याने कनकेश्वर फाट्यावर उतरुन 3 कि.मी. प्रवास केल्यावर कनकेश्वराचा पायथा गाठता येतो. पायथ्याशी असलेल्या मापगावपर्यंत गाडीही जाते. येथुन २२ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावरील पेण हे रेल्वेस्थानक आहे.