अमृतेश्वर देवालय अण्णिगेरी

कर्नाटक राज्यात उभी असलेली विविध मंदिरे तत्कालीन राजवटींच्या कलेची, संपन्नतेची आणि सामर्थ्याची प्रतीके आहेत. होयसळ, विजयनगर, चालुक्य अशा बलाढ्य राजवटी या परदेशी नांदल्या. त्यांनी त्यांच्या सामर्थ्याच्या खाणाखुणा या मंदिरांच्या रूपाने मागे सोडलेल्या दिसतात.

अमृतेश्वर देवालय अण्णिगेरी
अमृतेश्वर देवालय

७६ खांबांवर तोललेले छत, सोप स्टोन या प्रकारात निर्मिलेले पहिलेच मंदिर, तारकाकृती आकार असलेले आणि इटगीच्या महादेव मंदिराशी साधर्म्य असणारे स्थापत्य..पाहताक्षणी ज्याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात भरेल अशा विविधांगानी नटलेल्या अमृतेश्वर देवालयाला कल्याणी चालुक्यांच्या मंदिरस्थापत्याचे वैभव म्हणावे लागेल. हे वैभव वसले आहे गदगच्या जवळच अण्णिगेरी इथे.

कर्नाटक राज्यात उभी असलेली विविध मंदिरे तत्कालीन राजवटींच्या कलेची, संपन्नतेची आणि सामर्थ्याची प्रतीके आहेत. होयसळ, विजयनगर, चालुक्य अशा बलाढ्य राजवटी या परदेशी नांदल्या. त्यांनी त्यांच्या सामर्थ्याच्या खाणाखुणा या मंदिरांच्या रूपाने मागे सोडलेल्या दिसतात. प्रत्येक राजवटीची काहीतरी वैशिष्ट्ये असलेली ही मंदिरे अतिशय देखणी आणि सुडौल आहेत. 

कल्याणीचे चालुक्य हे कर्नाटकातील एक प्रबळ घराणे होऊन गेले. बीदर जवळील बसवकल्याण ही यांची राजधानी. या गावाच्या नावावरूनच यांना कल्याणीचे चालुक्य असे नाव पडले. साधारणपणे इ.स. चे १० वे ते १२ वे शतक हा यांचा कार्यकाळ होय. यांच्या कालखंडात खूप देखणी देवालायांची निर्मिती झाली. आणि त्यांची एक खास अशी शैली निर्माण झाली. मंदिरस्थापत्यातील वेसर शैलीच्या शिखरांची मंदिरे ह्या कल्याणी चालुक्यांनी बांधल्याचे दिसते. हीच शैली पुढे होयसळ राजवटीमध्येसुद्धा प्रसिध्द पावलेल्या मंदिरांची बघायला मिळते. कर्नाटकातील विशेष करून गदग परिसरात या कल्याणी चालुक्यांची बरीच सुंदर मंदिरे आहेत. गदग, लकुंडी, इटगी, डंबल, सुदी, लक्ष्मेश्वर अशी या चालुक्यांच्या मंदिरांची जणू मांदियाळीच या ठिकाणी वसलेली आहे. 

अण्णिगेरी इथले अमृतेश्वर शिवालय हे याच कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधलेले एक अप्रतिम मंदिर होय. गदगच्या पश्चिमेला अंदाजे २३ कि.मी. वर असलेले हे ठिकाण. इथे असलेले अमृतेश्वर मंदिर हे इ.स. १०२५ मध्ये बांधले गेले. तारकाकृति रचना असलेल्या या मंदिरात ७६ स्तंभ पाहायला मिळतात. 

सोप स्टोन या प्रकारच्या दगडात हे मंदिर बांधलेले आहे. या दगडाच्या प्रकारात बांधलेले हे पहिलेच मंदिर असे अभ्यासक सांगतात. मंदिर स्थापत्याचे तज्ञ Dr. Adam Hardy यांच्या मतानुसार हे मंदिर लकुंडीच्या कुळातील असून, कालमानानुसार इटगीच्या महादेव मंदिराच्यासुद्धा आधीचे आहे. इटगीचे महादेव मंदिर आणि हे अमृतेश्वर मंदिर यांच्यात अनेक बाबतीत साम्य दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग प्रस्थापित केलेले असून गाभाऱ्याच्या द्वारशाखा फारच सुरेख आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवर फारसे शिल्पकाम नाही. मात्र तरीही शिखराच्या जवळ आपल्याला काही मूर्तीकाम केलेले दिसून येते. ज्यात काही पौराणिक प्रसंग, भैरव, वादक, गजलक्ष्मी, दुर्गा यांच्या मूर्ती देखण्या आहेत. खालच्या थरातील अनेक देवकोष्ठ रिकामी आहेत.

अण्णिगेरीसंबंधी काही कथा प्रचलित आहेत. पांडव वनवासात असताना काही काळ याठिकाणी वास्तव्याला होते असे सांगितले जाते. हे ठिकाण पूर्वीपासूनच राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. काही ठिकाणी तर याचा उल्लेख ‘राजधानीपट्टणम’ असा आलेला आहे. तसेच काही शिलालेखांत याचा उल्लेख ‘दक्षिण काशी’ असा केलेला आढळतो. या क्षेत्राशी संबंधित जवळजवळ २८ शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातला सर्वात प्राचीन शिलालेख हा बदामीच्या चालुक्यांचा आहे. ह्या मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार पुढे होयसळांच्या राजवटीत झालेला आहे. 

अण्णिगेरी इथे विविध राजवटींनी राज्य केले आहे. ज्यात कलचुरी, कल्याणी चालुक्य, यादव, होयसळ यांचा समावेश होतो. कलचुरी राजांनी बसवकल्याण ही चालुक्यांची राजधानी जिंकून घेतल्यावर चालुक्यांनी आपली राजधानी अण्णिगेरी इथे प्रस्थापित केली. इथे या मंदिराशिवाय पुरदवीरप्पा मंदिर, बनशंकरी मंदिर, हिरे हनुमान मंदिर आणि मैलार मंदिर आहेत. शिवाय तीर्थंकर पार्श्वनाथ यांची जैन बसदीसुद्धा इथे वसलेली आहे. अण्णिगेरी हे गाव इ.स.च्या १० व्या शतकातील महान कन्नड कवी पंपा यांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. गदग इथे मुक्काम करून निवांतपणे आजूबाजूला वसलेला हा कल्याणी चालुक्यांचा मंदिर ठेवा वेळ काढून बघायला हवा.

- आशुतोष बापट