मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे व हेटकरी

मावळ प्रांत जिंकल्यावर महाराजांनी सर्वप्रथम उत्तर कोकण स्वराज्यात आणला व यावेळी त्यांनी जी सैन्यव्यवस्था निर्माण केली त्यामध्ये मावळे, कोकणे आणि हेटकरी यांचा समावेश होता.

मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे व हेटकरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तरेतील व दक्षिणेतील प्रबळ सत्तांशी संघर्ष करून जे स्वराज्य निर्माण केले त्याचा आदर्श जागतिक स्तरावर घेतला जातो. शिवरायांनी सर्वप्रथम पुणे प्रांतातून स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली व याकामी त्यांना ज्या एकनिष्ठ लोकांची साथ लाभली ते म्हणजे मावळे.

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर नद्यांची जी खोरी तयार झाली आहेत त्या खोऱ्यांना मावळ असे म्हंटले जाते व या मावळांत राहणारी माणसे म्हणजे मावळे. अशी एकूण बारा मावळे प्रसिद्ध आहेत.

शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीचा श्रीगणेशा मावळ प्रांतांत केला असला तरी अगदी थोड्याच अवधीत सह्याद्रीच्या पश्चिमेकडील खोल दऱ्यांचा आणि रानावनांचा कोकण प्रदेशही स्वराज्याचा एक भाग बनला व या प्रांतातील अनेक मातब्बर अगदी सुरुवातीपासून शिवाजी महाराजांच्या सोबतीस होते व हे सह्याद्रीच्या पश्चिम खोऱ्यातील व कोकण प्रांतातील लोक म्हणजे हेटकरी आणि कोकणे लोक.

ऐतिहासिक साधनांत मावळे आणि कोकणे यांचे पुढीलप्रमाणे वर्णन आले आहे.

द्रव्येकरून लोक राजी राहतात, किल्लेकव्याने मुलुख जेरदस्तीत येतो, मुलुख मिळाल्यावर राज्य साध्य होते. मोगलाई राज्यात बिकट जागा सह्याद्री ओळ. त्या मुलुखातील लोक माहितगार, पावसांत डोंगरावर चढणे, झाडीत शिरणे, यास मावळे आणि कोकणे यांवाचून घडणार नाही, हेच आधी ठेवावे. त्यांत सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, देशपांडये वैगेरे यांस सरदारी अथवा किताबा देऊन नांवनिशीवार शिपाई ठेविते झाले.

शिवरायांनी १६४६ साली मावळ प्रांतातील एक मोठा भाग स्वराज्यात घेतल्यावर त्यांनी दोन वर्षांनीच म्हणजे १६४८ सालापासून कोकणातील प्रदेश स्वराज्यात सामील करण्यास सुरुवात केली व या कामी त्यांना त्याच प्रदेशातील वीर हेटकऱ्यांची आणि कोकण्यांची साथ लाभली.

हेटकरी अथवा कोकणे लोकांचा उल्लेख जुन्या साधनांत आढळत असला तरी मागील काही वर्षांत जे ऐतिहासिक लिखाण झाले त्यात दुर्दैवाने हेटकरी आणि कोकणे लोकांचा उल्लेख फारसा न आल्याने ही माणसे स्वराज्यकार्यात मोठे योगदान असूनही उपेक्षित राहिली.

भौगोलिक दृष्ट्या जसे मावळे हे मावळ प्रदेशातील म्हणजे वरघाटी राहणारे तसेच हेटकरी हे तळघाटी म्हणजे कोकणातून जेथून घाट सुरु होतात त्याच्या पायथ्याशी असलेल्या विभागात राहणारे आणि कोकणे हे कोकणात राहणारे असा अर्थ होतो. स्वराज्य काळात हे हेटकरी अथवा कोकणे मावळ्यांच्या साथीने शिवरायांचे स्वराज्याचे कार्य करीत होती त्यामुळे या लेखात आपण हेटकरी आणि कोकणे लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

जर आपण स्वराज्याचा नकाशा पहिला तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा हे विभाग स्वराज्याचा भाग होते व दक्षिण दिग्विजयानंतर महाराजांनी महाराष्ट्र व गोव्याच्या पलीकडे असलेल्या कर्नाटक व तामिळनाडू आदी राज्यांतील काही प्रदेश स्वराज्यात सामील केला होता.

मावळ प्रांत जिंकल्यावर महाराजांनी सर्वप्रथम उत्तर कोकण स्वराज्यात आणला व यावेळी त्यांनी जी सैन्यव्यवस्था निर्माण केली त्यामध्ये मावळे, कोकणे आणि हेटकरी यांचा समावेश होता. मावळे, कोकणे आणि हेटकरी या दोघांचेही वैशिट्य म्हणजे हे सर्वच डोंगदऱ्यातील निवासी असल्याने डोंगर दऱ्या आरामात चढणे उतरणे यात पटाईत असत त्यामुळे गनिमीकावा या तंत्राचा प्रभावी वापर ज्या सह्याद्री विभागात होतो त्याच्याच कुशीत महाराजांनी जनतेचे स्वराज्य स्थापन केले. 

मावळे आणि हेटकरी कोकणे यांच्याजवळ तलवार, बंदूक, ढाल, भाला आणि धनुष्य बाण आदी शस्त्रे असत. ही शस्त्रे घेऊनही हे सर्व आरामात रानावनांतून अथवा डोंगरदऱ्यांतून मोठ्या पल्ल्याचा प्रवास करू शकत कारण सह्याद्रीतील गुप्त वाटा त्यांना पूर्णपणे माहित होत्या.

एखादी लढाई लढवायची असेल तर हेटकरी आणि कोकणे जंगलात झाडाझुडुपांत दडून शत्रूंच्या येण्याची वाट पाहत आणि शत्रू टप्प्यात आला की त्यांच्यावर बाणांचा, गोळ्यांचा, दगडांचा आणि भाल्यांचा वर्षाव करीत आणि लढाईस सुरुवात झाली की मावळे तलवार घेऊन शत्रूचा फडशा पाडत अशा प्रकारे एकमेकांच्या गुणांचा वापर करून मावळे आणि कोकणे हेटकरी स्वराज्याची सेवा करीत. एखादा किल्ला जिंकावयाचा असेल तर पायदळ अत्यंत महत्वाचे त्यामुळे मावळे आणि कोकणे हेटकरी यांचा समावेश असलेले पायदळ किल्ले घेण्यास खूप उपयोगी ठरले. 

मावळे आणि हेटकरी यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना महात्मा फुले म्हणतात की, 

हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस | संभाळी पुरंधरास || हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास | पिडीले फार मोगलास || हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस | पळवी इशानी कोणास || वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस | वरती चढवी तोफांस || वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास | आणले बहु खराबीस || हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास | आणले बहु खराबीस || हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |

मावळे, हेटकरी आणि कोकणे हे तिन्ही शब्द विभागवाचक असल्याने यांमध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट होते आजही काही समाज आपल्या समाजाच्या नावापुढे ही हुद्देवाचक नावे अभिमानाने लावतात.

ही अतिशय महत्वाची माहिती लक्षात घेता मावळ्यांच्या साथीने स्वराज्यासाठी लढणाऱ्या हेटकरी आणि कोकण्यांच्या इतिहासावरील उपेक्षित वलय दूर होईल व त्यांच्या स्वराज्यकार्यास खऱ्या अर्थी मानवंदना मिळेल हीच अपेक्षा.