जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून गेले

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकात येत आहेत हे समजल्यावर हुसेनखान व अब्दुरहीमखान यांच्या जुलुमाने त्रस्त झालेल्या कोप्पळ प्रांतातील लोकांच्या आनंदास पारावर उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपल्याला या जुलुमातून मुक्त करतील अशी येथील जनतेची पक्की खात्री झाली होती.

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून गेले
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून गेले

कर्नाटकातील कृष्णा व तुंगभद्रा या प्रसिद्ध नद्यांच्या मधील सुपीक प्रदेशात त्याकाळी विजापूरकर आदिलशाहीची सत्ता होती. याच परिसरात त्याकाळी दक्खनचा दरवाजा म्हणून प्रख्यात असलेला कोप्पळचा किल्ला व ठाणे होते. कोप्पळचा कारभार त्याकाळी आदिलशाहाचे दोन सरदार हुसेनखान मियाना आणि अब्दुरहीमखान मियाना यांच्या हाती होता व हे दोघे भाऊ होते.

हुसेनखान व अब्दुरहीमखान यांचा कारभार अतिशय जुलुमी असून या कारभाराने कोप्पळ परिसरातील समस्त नागरिक त्रस्त झाले होते. आपल्या दुःखास या दोन बंधूंपासून कोण मुक्त करेल याचा विचार करीत दोघांचे अनन्वयीत अत्याचार सहन करण्यापलीकडे येथील सामान्य जनतेच्या हाती काहीच उरले नव्हते.

मात्र याच काळात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर महाराज दक्षिण दिग्विजयाचे सीमोल्लंघन करण्यास राजधानी रायगडावरून निघाले. यावेळी त्यांच्यासोबत २५ हजार सैन्य व नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, बाजी जेधे, बाळाजी आवजी चिटणीस, सूर्याजी मालुसरे, सर्जेराव जेधे, मानाजी मोरे, अण्णाजी दत्तो, नागोजी जेधे, येसाजी कंक, रघुनाथपंत हणमंते, जनार्दन पंत हणमंते, धनाजी जाधव, बाबाजी ढमढेरे, आनंदराव सोनाजी नाईक बंदी इत्यादी स्वराज्याचे शिलेदार होते.

दुर्गराज रायगडावर महाराज सिंहासनाधिष्टीत झाल्यावर महाराजांनी दक्षिण भारत स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी काढलेली ही अत्यंत महत्वाची मोहीम होती व पाहता पाहता या मोहिमेची वार्ता समस्त भरतखंडात पसरली. 

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकात येत आहेत हे समजल्यावर हुसेनखान व अब्दुरहीमखान यांच्या जुलुमाने त्रस्त झालेल्या कोप्पळ प्रांतातील लोकांच्या आनंदास पारावर उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपल्याला या जुलुमातून मुक्त करतील अशी येथील जनतेची पक्की खात्री झाली होती.

महाराजांचा प्रवास सुरु असताना कोप्पळच्या जनतेने त्यांच्याशी संपर्क करून आपले गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले व या त्रासातून आमची मुक्तता करावी अशी विनवणी महाराजांकडे केली. महाराजांनी हे निवेदन ऐकून आपले मुख्य सेनापती हंबीरराव मोहिते यांना सैन्यासहित कोप्पळ वर चाल करून हुसेनखान व अब्दुरहीमखान यांचा परामर्श घेण्यास सांगितले.

महाराजांची आज्ञा स्वीकारून हंबीरराव मोहिते यांनी ससैन्य कोप्पळ येथे कूच केले. यावेळी त्यांच्यासोबत धनाजी जाधव व नागोजी जेधे हे तरुण योद्धे सुद्धा होते.  नागोजी जेधे हे कान्होजी जेधे यांचे नातू व बाजी जेधे यांचे पुत्र. आपले आजोबा व वडील यांच्या पराक्रमाचा वारसा नागोजी यांच्यातही आला होता म्हणून शिवरायांच्या महत्वपूर्ण अशा दक्षिण दिग्विजय मोहिमेत नागोजी यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. 

हंबीरराव सैन्य घेऊन प्रथम संपगावास गेले याठिकाणी हुसेनखान मराठ्यांच्या सैन्यास सामोरा आला. हुसेनखान याच्यासोबत तब्बल पाच हजार पठाण, याशिवाय तिरंदाज, बरचीवाले, अढहत्यारी आणि बंदुकी तोफखाना सुद्धा सज्ज होता. त्याकाळी हुसेनखानाची तुलना बहलोलखान याच्याशी केली जात असे यावरून त्याच्या ताकदीची कल्पना येते. 

हुसेनखानाने सैन्यबळाचा वापर करून मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कर्नाटकातल्या जनतेस आदिलशाही छळापासून मुक्त करण्यासाठी आलेले मराठे हुसेनखानाच्या सैन्यावर तुटून पडले. मराठ्यांचे घोडदळ व पायदळ एकाच वेळी हुसेनखानाच्या सैन्यावर तुटून पडले यावेळी मराठ्यांनी हुसेनखानाच्या सैन्याची दाणादाण उडवली व कित्येक सैन्य ठार केले. या युद्धात हत्तीसुद्धा वापरले गेल्याचा उल्लेख मिळतो. दिवसा दोन प्रहरापासून सुरु झालेले हे तुंबळ युद्ध रात्रीच्या चार प्रहरापर्यंत सुरु होते व सहाव्या प्रहरी मराठ्यांनी हुसेनखानाची संपूर्ण फौज संपवली. यावेळी हजारोंच्या संख्येत सैन्य, साडे चार हजार घोडे, बारा हत्ती व अनेक उंटांचा मराठ्यांनी पाडाव केला. या युद्धात खुद्द हुसेनखान मराठ्यांच्या हाती आला याशिवाय आदिलशाही सैन्याकडील जिन्नस, बिछाईत, खजिना आणि वस्त्रे यांचा प्रचंड साठा मराठ्यांच्या हाती लागला. 

या युद्धात नागोजी जेधे यांनी विशेष पराक्रम गाजविला. आपल्या सैन्याचा पाडाव होतोय हे पाहून हत्तीवर स्वर झालेला हुसेनखान युद्धभूमीतून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी नागोजी यांनी हुसेनखानास माघारी वळताना पहिले व त्यांनी आपला घोडा थेट हुसेनखानाच्या हत्तीसमोर नेऊन तलवारीने हत्तीची सोंड कापली. या हल्ल्याने बिथरलेल्या हत्तीने पुन्हा एकदा रणांगणावर आपला मोर्चा वळविला.

युद्धातून माघारी जाण्याचे आपले प्रयत्न नागोजी जेधे यांच्यामुळे फसल्याचे कळताच संतापलेल्या हुसेनखानाने हत्तीवरूनच नागोजी यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला यावेळी एक बाण थेट नागोजी यांच्या मस्तकात शिरला व  हनुवटी फोडून बाहेर आला. यावेळी हुसेनखान भर मैदानात आल्याने मराठ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली व हुसेनखानास ताब्यात घेतले मात्र नागोजी माने यांच्या मस्तकात शिरलेला तिर काढल्यावर त्यांना वीरमरण आले. 

अशाप्रकारे कर्नाटक प्रांतातील प्रजेची जुलुमातून सुटका करताना स्वराज्याचा एक महत्वाचा मोहरा धारातीर्थी पडला मात्र त्यांच्या अतुल्य पराक्रमाने त्यांचे नाव अजरामर झाले.

या युद्धात बाजी जेधे सुद्धा होते व त्यांच्या समोरच आपल्या तरुण मुलाने हौतात्म्य स्वीकारल्याचे पाहून त्यांच्या दुःखास पारावर राहिला नाही. नागोजी यांनी आपल्या वडिलांच्या मांडीवर डोके ठेवूनच जगाचा निरोप घेतला. नागोजी यांच्या मृत्यूची बातमी कारी या त्यांच्या मूळगावी गेली, लोक शोकात बुडाले. नागोजी यांच्या पत्नी गोदूबाई या कारी येथे सती गेल्या.

हंबीरराव मोहिते यांनी मराठ्यांच्या विजयाची बातमी शिवाजी महाराजांकडे पोहोचवली ती ऐकून महाराज प्रसन्न झाले. पराभूत हुसेनखान याचा भाऊ अब्दुरहीमखान हा कोप्पळ येथेच होता. हुसेनखानाच्या पराभवाची बातमी त्याजपर्यंत आली होती व त्याने सुरुवातीसच हार मान्य केली होती. यानंतर महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना अब्दुरहीमखान याच्याशी बोलणी करण्यास कोप्पळ येथे पाठवले. यावेळी अब्दुरहीमखान याने शरणागती पत्करून कोप्पळ हा आदिलशाहच्या अमलाखालील किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. 

कोप्पळ म्हणजे दक्षिणेचे प्रवेशद्वार आणि तेच ताब्यात आल्याने दक्षिणेच्या तख्ताची जागा मराठ्यांच्या ताब्यात आली व कोप्पळ हा तुंगभद्रेच्या काठी असलेला प्रदेश असल्याने तुंगभद्रेचा सुपीक प्रदेश स्वराज्यात येऊन मराठ्यांच्या दक्षिण दिग्विजयाची यशस्वी सुरुवात झाली. 

कोप्पळ येथील नागरिकांच्या आनंदास पारावर उरला नाही. आदिलशाही राजवटीच्या जाचक कचाट्यातून सुटून सर्वसमावेशक अशा स्वराज्यात आल्याचा आनंद त्यांच्यासाठी कित्येक पटीने मोठा होता यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी शतशः आभार मानिले.