अश्वत्थामा - एक शापित चिरंजीव

सप्त चिरंजीवींपैकी अश्वत्थामा हे एक गूढ व्यक्तिमत्व. अश्वत्थामाच्या चरित्रावर व त्याच्या दर्शनाचा अनुभव घेतलेल्या घटनांवर अनेक कथा कादंबऱ्या सुद्धा आहेत.

अश्वत्थामा - एक शापित चिरंजीव
अश्वत्थामा

आपल्या धर्मशास्त्रानुसार एकूण सात व्यक्तींना चिरंजीव पद मिळाले आहे. त्यांची नावे अनुक्रमे अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम अशी आहेत. या सप्त चिरंजीवींपैकी अश्वत्थामा हे एक गूढ व्यक्तिमत्व. अश्वत्थामाच्या चरित्रावर व त्याच्या दर्शनाचा अनुभव घेतलेल्या घटनांवर अनेक कथा कादंबऱ्या सुद्धा आहेत.

या लेखात आपण अश्वत्थामा याचे चरित्र थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अश्वत्थामा हा गुरुवर्य द्रोणाचार्य यांचा पुत्र. त्याचे आजोबा म्हणजे महर्षी भारद्वाज. त्याच्या आईचे नाव होते कृपी व ती शरद्वन ऋषींची कन्या होती. 

अश्वत्थामा जेव्हा जन्मास आला तेव्हा त्याने घोड्यासारखा टाहो फोडला त्यामुळे त्याचे नामकरण अश्वत्थामा असे करण्यात आले याशिवाय द्रोणाचार्यांचा पुत्र असल्याने त्यास द्रोणी असेही म्हणायचे.

खुद्द वडील हे धनुर्विद्येचे गुरु असल्याने त्याचेही धनुर्विद्येचे शिक्षण उत्तम झाले होते याशिवाय तो वेद शास्त्र पारंगत सुद्धा होता. द्रोणाचार्य हे कौरव व पांडवांचे धनुर्वेदाचे गुरु होते त्यामुळे ते हस्तिनापूर येथेच असत त्यांच्यासोबतच अश्वत्थामा सुद्धा असे. 

भारतीय युद्धास जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी द्रोणाचार्य कौरवांच्या पक्षात सामील झाले व ओघानेच अश्वत्थामा सुद्धा त्यांच्यासोबतच होता. युद्धात द्रोणाचार्यानी योगधारण करून आपला प्राण त्यागण्याचा विचार केला व त्यांनी योगधारणा सुरु केली मात्र अचानक धृष्टधुम्नने द्रोणाचार्यांचा वध केला हे पाहून अश्वत्थामा अतिशय संतप्त झाला व त्याने पांडव सेनेवर नारायणास्त्राचा प्रयोग केला. हे नारायणास्त्र इतके बलाढ्य असते की जर त्याचा प्रयोग झाल्यास संपूर्ण सेना बेचिराख होऊ शकते मात्र ज्याच्या हाती शस्त्र तोच या अस्त्राने नष्ट होऊ शकतो हे कृष्णास माहित असल्याने त्याने सर्वाना शस्त्र खाली ठेवण्याची आज्ञा केली आणि अनेकजण नारायणास्त्राच्या तडाख्यातून बचावले.

द्रोणाचार्य व भीष्म जेव्हा युद्धात पडले त्यावेळी दुर्योधनाची पुढील गत याने ओळखली व त्याने त्यास उपदेशही केला होता मात्र दुर्योधनाने त्याचे ऐकले नाही. हळहळू या युद्धात अनेक आहुत्या पडू लागल्या. दुर्योधनाचे सर्व बंधू, कर्ण, शल्य असे महारथी सुद्धा रणात पडले. शेवटी दुर्योधन एकटाच शिल्लक राहिला व त्याने भीमासोबत द्वंद्व केले. या गदायुद्धात भीमाने दुर्योधनाच्या पोटऱ्यांवर प्रहार करून त्याला जमिनीवर जखमी अवस्थेत पाडले त्यावेळी चिरंजीव अश्वत्थामा त्यास भेटला व म्हणाला मित्र जर तू अजून मला सांगशील तर मी एकटा जाऊन सर्व पांडवांना मारून येतो. हे ऐकून दुर्योधनाने तसे करण्याची त्यास संमती दिली. 

यानंतर पांडवांना कसे संपवायचे याचा विचार करत हा एका वडाच्या झाडाखाली कृपाचार्य व कृतवर्मा यांच्यासोबत बसला होता. बोलता बोलता कृपाचार्य व कृतवर्मा यांना झोप लागली तेव्हा अश्वत्थामा एकटाच पांडवांच्या शिबीराकडे जाण्यास निघाला. कालांतराने कृपाचार्य व कृतवर्मा सुद्धा तेथे येऊन पोहोचले तेव्हा त्या दोघांना बाहेर खडा पहारा ठेवायला सांगून अश्वत्थामा एकटाच आत शिरला.

अश्वत्थामा शिबिराच्या अंतर्भागात आला तेव्हा त्यास पांडव दिसले नाहीत मात्र आपल्या पित्याचा वाढ करणारा धृष्टधुम्न व पांडवांचे पुत्र आणि इतर वीर तिथे आराम करताना दिसले. ते पाहून याने क्षणाचाही विलंब ना लावता सर्वांची मस्तके उडवण्यास सुरुवात केली. जी कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत त्यांचा समाचार कृपाचार्य आणि कृतवर्मा मारून टाकत होते. शिबिराची पूर्ण धूळधाण उडवून सर्वांची शिरे एका पोत्यात भरून ती मरणप्राय दुर्योधनास दाखवण्यास हे सर्व घाईघाईने गेले. आणि दुर्योधनास अश्वत्थामा म्हणाला की पाच पांडव आणि त्यांचे दोन सहकारी एकूण सात जण आणि आपण तीन जण असे राहून बाकी सर्व संपले.

दुर्योधन हे ऐकून आनंदित झाला मात्र त्याने जेव्हा पांडवांच्या निद्रित पुत्रांची डोकी पहिली तेव्हा त्याला खूप दुःख झाले. इकडे अर्जुनास शिबिरात अश्वत्थामाने केलेला संहार समजला व तो रथात बसून अश्वत्थामाच्या मागे लागला. हे समजल्यावर अश्वत्थामा आपल्या रथात बसून पळू लागला मात्र अर्जुनाने त्यास गाठून पकडले व कृष्ण आणि द्रौपदी समोर हजर केले. 

कृष्णाने त्यास मारण्यास असंमती दर्शवली व द्रौपदी सुद्धा म्हणाली की हा गुरुपुत्र आहे आणि आज जसा मी माझ्या मुलांसाठी शोक करत आहे तसा याच्या आईला करावा लागू नये म्हणून यास सोडणेच योग्य.

अर्जुनाने कृष्ण व दौपदीचे म्हणणे मान्य केले मात्र हे करताना त्याने अश्वत्थामाच्या कपाळातील दिव्यमणी काढून घेतला व अपमान करून त्यास शिबिराबाहेर घालवून दिले. आपला असा अपमान झाल्याचे पाहून अश्वत्थाम्याने पांडवांचा संपूर्ण विनाश करण्यासाठी ब्रह्मशिरस्त्र त्यांच्यावर सोडले मात्र कृष्णाने त्या अस्त्राची संहारकता कमी केली. यानंतर ते आजही अश्वत्थामा अपमानास्पद अवस्थेत या पृथ्वीतलावर भटकत असतो असे म्हटले जाते. अर्जुनाने त्याच्या कपाळावरील मणी काढून घेतल्याने त्याच्या कपाळातून एक ताजी जखम कायम भळाभळा वाहत असते व या जखमेवर इलाज व्हावा यासाठी तो अनेकांकडे तेलाची मागणी करतो अशा दंतकथा आजही ऐकण्यात येतात.