आनंदीबाईंनी ध चा मा खरंच केला होता का?

नारायणरावांच्या खुनाच्या कटात आनंदीबाईंचा उल्लेख हा ध चा मा करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ही घटना एवढी लोकप्रचलित आहे की ध चा मा करणे ही म्हण सुद्धा त्यानंतर प्रचलित झाली.

आनंदीबाईंनी ध चा मा खरंच केला होता का?
ध चा मा

मराठा साम्राज्याच्या मुख्य प्रधान या पदाची जबाबदारी सन १७१३ ते १८१८ अशी तब्बल १०५ वर्षे ज्या घराण्याकडे होती त्या भट घराण्याचा इतिहास अतिशय रंजक असाच आहे. जुन्या व नव्या इतिहासकारांनी या काळाचे वर्णन पेशवेकाळ असा केला आहे व या काळात ज्या नानाविध चांगल्या वाईट घटना घडल्या त्यापैकी एक अत्यंत मोठी घटना म्हणजे नारायणराव पेशवे यांची हत्या.

नारायणराव बल्लाळ उर्फ नारायणराव पेशवे हे थोरले बाजीराव यांचे नातू आणि नानासाहेब यांचे तृतीय पुत्र असून विश्वासराव आणि माधवराव यांच्यानंतर त्यांच्याकडे पेशवे पदाची जबाबदारी अल्पवयात आली मात्र पेशवेपदावर नजर ठेऊन असलेले त्यांचे काका रघुनाथराव उर्फ राघोबा यांनी नारायणरावांच्या विरोधात कटकारस्थाने सुरु केली आणि नारायणराव यांना याचा सुगावा लागल्यावर त्यांनी रघुनाथरावांना अटकेत ठेवले. 

आपल्या काकांना अटकेत ठेवल्यावरही नारायणराव हे सातत्याने रघुनाथरावांना समजावण्याचा प्रयत्न करत मात्र दुराभिमानी असे रघुनाथराव हे पेशवेपदासाठीच अडून बसले होते त्यामुळे नारायणरावांचा सुद्धा नाईलाज असे.

नारायणराव समेटाच्या गोष्टी करत असला तरी तो आपल्याला पेशवेपद निश्चितच देणार नाही हे रघुनाथरावांना ठाऊक असल्याने आता नारायणरावांना कैद करूनच आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो हा विचार करून त्यांनी आपल्या समर्थकांसोबत एक कट रचला.

या कटान्वये नारायणरावांना अटक करून म्हणजे धरून रघुनाथराव यांना मुक्त करून त्यांच्या नावाची द्वाही फिरवणे हा मुख्य उद्देश होता व यासाठी रघुनाथरावांनी गारद्यांशी संधान बांधले आणि यासाठी गारद्यांना त्या काळात तब्बल नऊ लाख रुपये देण्यात आले होते कारण एका राज्याच्या पंतप्रधानास धरण्याचा कट साधासुधा नव्हता.

यानंतर जे घडले ते आपल्याला माहित आहेच. गारद्यांकडून नारायणरावांची निर्घृण हत्या करण्यात आली व ही घटना पेशवाईच्या इतिहासातील एक काळी घटना म्हणून प्रसिद्ध आहे मात्र या कटात रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाई यांचा हात असल्याबद्दल जुन्या ग्रंथांतून अथवा लोककथांमधून आपण जाणून असतो.

नारायणरावांच्या खुनाच्या कटात आनंदीबाईंचा उल्लेख हा ध चा मा करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ही घटना एवढी लोकप्रचलित आहे की ध चा मा करणे ही म्हण सुद्धा त्यानंतर प्रचलित झाली. एक अक्षर सुद्धा अर्थाचा अनर्थ घडवू शकते म्हणून कुठल्याही पाताळयंत्री कारस्थानासाठी हि म्हण आजही वापरली जाते.

तरी सुद्धा ही ध चा मा करण्याची घटना इतिहासात घडली होती का? ती खरी होती की खोटी हे शोधण्यासाठी आपल्याला जुन्यात जुने संदर्भ शोधणे आवश्यक असते मात्र अशा कारस्थानांची नोंद इतिहासाच्या अस्सल साधनांत कधीच होत नाही कारण जर यांची नोंद अस्सल साधनांत घेतली गेली तरी ती कारस्थाने गुप्त तरी कशी राहतील?

अशावेळी आपल्याला इतिहासाच्या दुय्यम साधनांचा विचार करणे भाग असते व या साधनांमध्ये बखरी, काव्ये, वर्णने आदींचा समावेश होतो. ध चा मा हे प्रकरण काल्पनिक असल्याचा दावा काही इतिहास अभ्यासक करतात व याचे कारण देताना ते जुन्या पात्रांमध्ये जी मोडी लिपी वापरली जात असे त्यामध्ये ध हा शब्द खोडून त्या जागी मा करणे अशक्य आहे कारण ही दोन्ही अक्षरे एकमेकांशी मेळ खात नसल्याने त्यांच्यात अफरातफर करणे अशक्य आहे असे म्हटले जाते.

ही गोष्ट जरी सत्य असली तरी पेशवेकालीन इतिहासाचे एक चांगले साधन मानले जाणाऱ्या कृष्णाजी विनायक सोहनी लिखित पेशव्यांच्या बखरीत या घटनेची माहिती आली आहे आणि या माहितीवरून नक्की काय घडले होते यावर उत्तम प्रकाश पडतो.

मुळात ज्यावेळी अटकेत असताना रघुनाथरावांनी गारद्यांसोबत बाहेरून संधान बांधले त्यावेळी या कटात सखाराम बापू यांचे गुप्त अंग असल्याचा उल्लेख पेशव्यांच्या बखरीत असून आणखी काही जण या कटात सामील होते. गारद्यांना नऊ लाख रुपये देण्याचे ठरल्यावर गारद्यांना काय करावे हे सांगण्याची जबाबदारी आनंदीबाई यांना देण्यात आली कारण रघुनाथराव अटकेत असल्याने त्यांच्यावर कडक पहारा होता.

आनंदीबाई यांना मजकूर तयार करण्यापूर्वी नारायणरावास धरावे असा मजकूर तयार करण्याचे सांगण्यात आले होते मात्र आनंदीबाईंनी जो मजकूर तयार केला त्यात नारायणरावास मारावे असे लिहिण्यात आले यावरून लक्षात येते की मूळ मजकुरात खाडाखोड न करता पूर्ण नवा मजकूर आनंदीबाईंनी तयार केला होता आणि त्या इतक्या टोकास जाण्याचे कारण म्हणजे स्वतःच्या पतीवर जो अन्याय सुरु आहे याचा बदला घेण्याची भावना आणि आपला पती आणि आपल्याविरोधात जे कारस्थान सुरु आहे त्याच्यामागे गोपिकाबाई असल्याने त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची तीव्र भावना या निर्णयात होती आणि त्या काळात गोपिकाबाई आणि आनंदीबाई या दोघीही एक प्रसिद्ध राजकारणपटू स्त्रिया म्हणून प्रसिद्ध होत्या.

ज्यावेळी आनंदीबाईंनी ध चा मा केला तेव्हा ही गोष्ट खुद्द रघुनाथराव आणि सखाराम बापू यांना सुद्धा माहित नव्हती आणि हा मजकूर गारद्यांपर्यंत गेला आणि पुढील भयंकर प्रसंग घडला ज्याचा कुणी विचारही केला नव्हता. 

पेशव्यांच्या बखरीत वर्णित केलेला हा इतिहास वाचून ध चा मा ही घटना समजण्यास निश्चित मदत मिळते आणि एका शब्दाचा फरक किती मोठा अनर्थ घडवू शकतो याची प्रचिती सुद्धा येते.