मिठाचे महत्व व फायदे

मानवी जीवनात पाण्यासहीत मिठास एवढे महत्व का आहे हे लक्षात आलेच असेल. पाण्यासारखे मीठ सुद्धा निसर्गतः तयार होते मात्र निसर्गतः तयार होणारे मीठ प्रक्रिया करूनच खाता येऊ शकते.

मिठाचे महत्व व फायदे
मिठागरे

मनुष्याच्या आहारातील एक प्रमुख घटक म्हणजे मीठ. असे एकही अन्न नसेल ज्यामध्ये मिठाचा वापर होत नसेल. मिठाशिवाय अन्न कोणतेही असले तरी ते बेचव बनते.

मिठाचा उपयोग हा सर्वसाधारणपणे अन्नाला चव येण्यासाठी केला जातो अशी सार्वत्रिक समजूत आहे मात्र फक्त अन्नाला चव आणणे हेच मिठाचे काम नसून मीठ हे मनुष्यसहित सर्व प्राण्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारा प्रमुख घटक आहे हे लक्षात घ्यायला हवे.

मिठाच्या या उपयुक्तेमुळेच त्यास अनेक प्रकारच्या उपमा मिळाल्या आहेत आणि यावरूनच खाल्ल्या मिठास जागणे, नावडतीचे मीठ अळणी, नमक हराम, नमक हलाल आदी विशेषणे आणि म्हणी तयार झाल्या आहेत.

एखाद्याचे अन्न खाणे याससुद्धा एखाद्याचे मीठ खाणे असे म्हटले जाते प्रत्यक्षात मीठ हे अत्यंत खारट असले तरी अन्नात ते थोडेसे जरी घातले तरी अन्नास चव प्राप्त होते.

पूर्वी युद्धावर जाताना सर्व सैनिकांच्या हाती मिठाचा खडा देऊन त्यांस राजाप्रती प्रामाणिक राहण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितली जात असे. राजा हा पालनकर्ता असल्याने त्यांच्या कृपेने आपण जे मीठ खात आहोत त्यास जागणे हा या शपथेमागील प्रमुख उद्देश होता.

मानवी जीवनात पाण्यासहीत मिठास एवढे महत्व का आहे हे लक्षात आलेच असेल. पाण्यासारखे मीठ सुद्धा निसर्गतः तयार होते मात्र निसर्गतः तयार होणारे मीठ प्रक्रिया करूनच खाता येऊ शकते.

श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्वांचाच मिठाची आवश्यकता असण्याचे कारण म्हणजे मिठाने रक्त शुद्ध होते आणि मेंदू व शरीराची चांगली वाढ होते. मिठाने प्रकृती सुद्धा चांगली राहते. 

शरीरास मीठ नसेल तर शरीराचा ऱ्हास लवकर होतो मात्र हे मीठ कमी प्रमाणातच वापरणे योग्य कारण अति मिठाचे सेवन सुद्धा प्रकृतीस हानिकारकच असते. 

शरीराचा ऱ्हास होण्यापासून मीठ रक्षण करते त्याचप्रमाणे अन्नाचा ऱ्हास होण्यापासून सुद्धा मीठ रक्षण करते म्हणून अनेक टिकाऊ प्रकारांत मिठाचा वापर अनिवार्य असतो.

लोणचे, मासे, मांस, आदी अनेक पदार्थ टिकवण्यासाठी त्यांना मीठ लावले जाते.

मिठाची निर्मिती प्रामुख्याने समुद्रापासूनच होते. समुद्राच्या पाण्यात मिठाचे प्रमाण प्रचंड असते आणि हे मीठ थेट समुद्रातून काढले जात नाही तर समुद्रकिनाऱ्यावरील काही क्षारयुक्त प्रदेशांतून काढले जाते ज्यांस मिठागरे म्हणतात. कोकणात मिठागरांना खारेपाट असेही म्हणतात आणि कोकणात अनेक ठिकाणी मिठाची कोठारे असणारी खारेपाट आहेत.

समुद्राचे पाणी ज्या जमिनीत शिरते ती जमीन इतर प्रकारचे कृषीउत्पन्न घेण्यास नाकाम होते त्यामुळे अशा जमिनींमध्ये मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते आणि या जमिनींना खार जमीन असे म्हणतात.

ब्रिटिशकाळात जीवनावश्यक अशा मिठावर कर लावल्याने मोठे जनआंदोलन झाले होते. आजही इतर पदार्थ महाग असले तरी मीठ त्या तुलनेत स्वस्त आहे कारण देशातील प्रत्येक जीवास मीठ मिळाले नाही तर सुदृढ व उज्वल देश निर्माण तरी कसा होणार?