नवकलेवर विधी अर्थात रघुराजपूर चित्रकला

रघुराजपूर हे ओडिशा मधले कलाकारांचे गाव. या गावात १२० घरे आहेत. तीस सगळी घर कलाकारांची आहेत. प्रत्येक घरावर काही ना काही चित्रकारी, सजावट केलेली असते.​​​​​​​- आशुतोष बापट

नवकलेवर विधी अर्थात रघुराजपूर चित्रकला

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

जगन्नाथपुरीच्या सेवेसाठीच या कलाकारांना हे गाव तत्कालीन राजांनी वसवून दिले. जगन्नाथपुरी इथे होणाऱ्या ‘नवकलेवर विधी’ चे सुंदर चित्रांकन रघुराजपूर इथल्या घरावर केलेले आढळते.

हा विधि अगदी थोडक्यात इथे बघूया. जगन्नाथाच्या जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती तयार करण्याचा हा नवकलेवरविधी चैत्र महिन्यात सुरु होतो....चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंतच्या एका दिवसातील शुभ मुहूर्तावर विशिष्ट धार्मिक विधी करून श्री जगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती, तिन्ही देव आणि सुदर्शनचक्र यासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी प्रस्थान करतात. दैतापती या लोकांचा या संपूर्ण विधीमधे अतिशय महत्वाचा कार्यभाग असतो. कोण आहेत हे दैतापती ?...त्याची एक कथा आहे...असो....तर हे दैतापती देवासाठीच्या लाकडाच्या ओंडक्याच्या शोधार्थ....पुरीपासून ५० किलोमीटर वर असलेल्या काकटपूरला मंगळादेवीच्या दर्शनासाठी जातात. हे स्थान प्राची नदीच्या किनारी आहे. दैतापती किनाऱ्यावरील एका मठात वास्तव्य करतात. तिथे देवीची पूजा करून तिचा कौल मिळण्याची वाट पाहिली जाते. कालांतराने मुख्य दैतापतीला देवी स्वप्नात येऊन आदेश देते. या चारही मूर्तींसाठी ओंडके कुठे मिळतील हे देवी मुख्य दैतापातीला स्वप्नात येऊन सांगते. ही चारही झाडे चार वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. स्वप्नादेश प्राप्त झाल्यावर दैतापतींचे चार गट पाडले जातात आणि ते चार ओंद्क्यांच्या शोधासाठी आपापल्या मार्गाने रवाना होतात..... ही झाडे कडूलिंबाची असतात..... या झाडाला महालिंब असे संबोधले जाते.

हे कडूलिंबाचे झाड कसे असावे या बद्दल काही ठाम संकेत आहेत...त्यातले काही संकेत......झाडाच्या आसपास स्मशान असावे.... झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे आणि त्यात नाग असावा. त्या झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवरच असाव्यात.....झाडावर कोणत्याही पक्षाचे घरटे नसावे....आणि सर्वात महत्वाचे....त्या झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापैकी एखादे चिन्ह असणे अत्यावश्यक आहे !! असे सर्व लक्षणांनी युक्त झाड सापडले की....आजूबाजूची जागा साफ केली जाते..... होमहवन केले जाते....झाडावर असलेल्या विविध देवतांना झाड सोडून दुसरीकडे जाण्यासाठी विनंती केली जाते. जगन्नाथाच्या गळ्यातली पुष्पमाला आणून ती एका नारळावर ठेवलेली असते. पती महापात्र म्हणजे मुख्य पुजारी आणि दैतापती ती माळ झाडाला बांधतात आणि झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालतात.

आता सोन्याची आणि चांदीची अशा कुऱ्हाडी तयार केलेल्या असतात. त्या दोन आणि लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा केली जाते. होम संपन्न झाला की विद्यापती म्हणजे मुख्य पुरोहित सोन्याची, विश्वावसु चांदीची आणि विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर मग झाड कापणारे लोक कामाला लागतात. सगळे झाड उतरवले जाते......अशा रीतीने ओंडके (दारु) कापून झाले की ते लाकडाच्या गाडीतून पुरीला देवळात नेले जातात. त्या गाडीची चाके वडाच्या झाडाचीच केलेली असतात. गाडीचा दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. यापुढे सुद्धा अनेक बारकावे असलेल्या गोष्टी केल्या जातात. कुठल्या गावात कुठली झाडे मिळाली आहेत, याचा इतिहास पण गमतीशीर आहे. जुन्या मूर्तींचे काय केले जाते हे तर थक्क करणारे आहे....ते सगळं पुस्तकात...इथे जागा खूप कमी पडेल.....

एखाद्या प्रसंगी श्रद्धेचे किती बारकाईने आणि काटेकोरपणे पालन केले जाते ते पहायचे असेल तर पुरीला या नवकलेवर विधीसाठी मुद्दाम गेले पाहिजे. हे कशाला हवे..त्याऐवजी ते चालेल की..पूर्वी सगळं ठीक होतं..आता काय करायची इतकी कटकट.... असली कामचलाऊ पद्धत इथे कधीच वापरली जात नाही....ह्या सगळ्याचे शब्दशः चित्रांकन रघुराजपूर इथल्या घरावर केलेले दिसते.... काहीसा गूढ, अगम्य, आणि परंपरेने आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेला हा विधी प्रत्येकवेळी असाच केला जातो.

{इथे दिलेली माहिती जेमतेम २० टक्के आहे. हा विधी आणि याबद्दलची सविस्तर माहिती, तसेच जगन्नाथपुरी बद्दलच्या एकेक अफलातून लोककथा ‘सफर देखण्या ओडीशाची’ या पुस्तकात सविस्तर दिली आहे.}

- आशुतोष बापट