नंदादेवीच्या पायथ्याशी
उत्तराखंड या छोटेखानी परंतु निसर्गसौंदर्याने समृद्ध अशा राज्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. गाढवाल आणि कुमाऊँ. अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आणि असंख्य पदभ्रमण मार्ग यांची अक्षरशः लयलूट आहे इथे.
गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे सुप्रसिद्ध चारधाम याच गढवालमधे आहेत. केदारताल, घुत्तु-पवाली ट्रेक, गोमुख-तपोवन-वासुकीताल ट्रेक असे पदभ्रमण मार्ग सुद्धा इथे आहेत. तर नैनिताल, रानीखेत, कौसानी, अल्मोडा ही कुमाऊँ ची शान आहे. मिलम ग्लेशियर, पंचचुली, उंटाधुरा, नंदादेवी असे काहीसे अपरिचित पण अत्यंत खडतर असे पदभ्रमण मार्ग याच कुमाऊँमध्ये येतात. तात्पर्य काय तर गाढवाल असो किंवा कुमाऊँ, श्रद्धाळूंसाठी आणि भटक्यांसाठी उत्तराखंड राज्य हे खरोखर नंदनवन आहे.
असाच एक अपरिचित आणि तेवढाच खडतर असा ट्रेक - “नंदादेवी ईस्ट बेस कॅम्प ट्रेक”. तब्बल २० दिवसांचा भरगच्च कार्यक्रम. त्यातले तब्बल १४ दिवस निव्वळ चालायचे आणि ते ही हिमालयात १३००० फूट उंचीपर्यंत. मिलम ग्लेशियर हे सुद्धा या मोहिमेतील एक ठिकाण. दिल्ली ते मुन्सियारी हा ६०० किलोमीटरचा बस प्रवास. यासाठी सलग २ दिवस लागतात आणि साथीला असतो पहाडातला वळणावळणाचा न संपणारा रस्ता. नंतर नंतर कंटाळा पण येईनासा होतो. एवढा रटाळ प्रवास झाल्यावर मात्र आपण मुन्सियारीमधे पोचतो आणि मोठ्या डौलात उभी असलेली हिमाच्छादित पंचचुली शिखरे आपले स्वागत करतात. एका क्षणात सगळा शीण निघून जातो. पंचचुली ग्लेशियरपण इथून जवळच असल्याने हवा देखील थंडगार झालेली असते. इथे उतरल्यावर सुरुवातीला ढगात बुडालेले पंचचुली. काही वेळाने तो पडदा बाजूला होऊन संपूर्ण पंचचुली रांगेचे मोहक दर्शन होते. त्यातले सर्वात उंच ‘राजरंभा’ शिखर तर संध्याकाळच्या कलत्या उन्हात फारच उठून दिसते.
मुन्सियारी हे पिथोरागड जिल्ह्यातले तालुक्याचे गाव. खरे तर हे उत्तम हिलस्टेशन. पण फार दूरवर असल्याने आणि जवळपास फारशी ठिकाणे नसल्यामुळे काहीसे दुर्लक्षित गाव. ट्रेकचा पहिला मुक्काम ‘लीलम’ या गावी. लीलमची उंची मुन्सियारीपेक्षा २००० फुटांनी कमी आहे. आणि अंतर आहे १६ कि.मी. देवदारचे उंच वृक्ष, विविध फुले आणि असंख्य निर्झर यातून मार्ग काढत जवळजवळ ७ तासांनी लीलम येते. अगदी छोटेसे गाव. जेमतेम ५०-६० इतकीच वस्ती असेल. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसची (आय.टी.बी.पी.) एक चौकी आणि ७-८ घरं इतकाच काय तो गावाचा पसारा. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कमी उंचीवरच्या या गावात मुक्काम आवश्यकच असतो. नंतरचा पडाव ‘बुगदियार’ या गावी. इथेही वस्ती जेमतेमच पण उंची मात्र कालच्यापेक्षा २५०० फुटांनी जास्त. हा सगळा ट्रेक मार्ग ‘गोरीगंगा’ या नदीच्या काठाकाठाने होत असतो. गोरीगंगा नदी मिलम ग्लेशियरमध्ये उगम पावते आणि अत्यंत वेगात फुसांडत तिचा प्रवास चालतो. आश्चर्य म्हणजे बुगदियारच्या जवळ तिच्या प्रवाहात एका कडेला चक्क गरम पाण्याचे झरे आहेत. एक पाय गरम पाण्यात आणि एक गार पाण्यात ठेऊन उभे राहता येते. निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा हा ! अनेक धबधबे, पाण्याचे प्रवाह आजूबाजूच्या डोंगरावरून तिला येऊन मिळतात. कुमाऊँ मधल्या या तीन नद्या प्रसिद्ध आहेत. धारचुला जवळ असलेली धौलीगंगा, मग कालीगंगा आणि ही गोरीगंगा. प्रचंड वेगात वाहणाऱ्या या नदीचा धीरगंभीर आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो. बुगदियार नंतर रीलकोट, आणि मग गनघर असे पुढचे मुक्काम आहेत. गनघर गाव अत्यंत टुमदार आहे. १५-२० घरांचे गाव पण आता लोक इथे रहात नसल्याने उजाड झालेले. पूर्वी इथून मलारीमार्गे तिबेटशी व्यापार चालायचा. पण भारत-चीन युद्धानंतर हा व्यापार बंद झाला आणि ही गावे ओस पडली. उत्तराखंड सरकार आता मुन्सियारी ते मिलम असा गाडीरस्ता तयार करते आहे. तो झाला की पुन्हा ही गावे वसतील अशी आशा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये जनरल रिझर्व्ह इंजिनियरिंग फोर्स (ग्रेफ) चे जवान या रस्त्याचे काम करताना आढळतात. त्यांच्या चिकाटीची कमाल आहे.
गनघरमधे एकच घर चालू स्थितीत आहे ते या गावच्या मुखियाचे. इथून नंदादेवी पूर्व शिखराचे प्रथम दर्शन होते. अत्यंत लोभसवाणे आणि प्रसन्न दर्शन ते. संपूर्णपणे केशरी रंगात शिखर न्हाऊन निघते. इथून शिखराचा फक्त काहीच भाग दिसतो. इथून पुढचा मुक्काम नंदादेवी ईस्ट शिखराचा बेस कॅम्प. पावसाला सुरुवात आणि आता थंडी थेट हाडापर्यंत जाऊन भिडते. रात्री मात्र आकाश हळूहळू मोकळे होऊ लागते तरी नंदादेवी काही दिसत नाही. थंडीचा कडाका मात्र प्रचंड वाढलेला. तापमान उणे ३ अंश दाखवते. पण पहाटे साडेचार वाजता नंदादेवी पूर्व आणि नंदादेवी मुख्य शिखर अगदी काहीच अंतरावर अतिशय दिमाखात उभे दिसते. आपल्यापेक्षा अजून फक्त १३००० फूट उंच. सूर्योदयापूर्वीचा प्रकाश त्यांच्यावर पडल्यामुळे ती शिखरे उजळलेली दिसतात. समोर निरभ्र आभाळात घुसलेली ती दोन शिखरे सोनेरी रंगात चमकतात आणि बाकी सर्वत्र अंधार. केवळ अवर्णनीय घटना असते ती. त्या ईश्वरी सौंदर्यापुढे नतमस्तक व्हायला होते. इतक्या दिवसांचा खडतर प्रवास, हिमालयातले ते लांबलचक चालणे, दमणूक, सगळी संपते. आणि जिच्या दर्शनासाठी ही एवढी पायपीट झाली होती ती नंदादेवी प्रसन्न होऊन भरभरून दर्शन देते. आपली वारी सफल होते. स्थल-कालाचे भान जणू हरपते.
याच नंदादेवीच्या दर्शनाने जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी एक अमेरिकन गिर्यारोहक वेडा झाला होता. विली अनसोल्ड (Willi Unsoeld) हे त्याचे नाव. २२ मे १९६३ रोजी पश्चिम धारेवरून एव्हरेस्ट चढणारा हा वीर. नंदादेवी शिखराच्या दर्शनाने मोहित होऊन त्याने आपल्या मुलीचे नाव देखील ‘नंदादेवी’ ठेवले. १९७६ साली तो आणि ही नंदादेवी अनसोल्ड दोघेही नंदादेवी शिखराच्या मोहिमेवर आले. वाटेतल्या गावातील लोकांना त्याची मुलगी ही खरोखरीच नंदादेवी आहे असे वाटत होते. तिचे प्रत्येक गावात उत्स्फूर्त स्वागत केले गेले. तिला हार घालून तिची मिरवणूक काढली गेली. मात्र शिखर चढाई करत असताना दुर्दैवाने या नंदादेवी अनसोल्डची प्रकृती ढासळली. तिचा तिथेच नंदादेवीच्या कुशीत अंत झाला. अतिशय दुर्दैवी घटना. पण निसर्गापुढे सगळे सारखेच, तिथे कुणाचे काय चालणार ? हा विली अनसोल्ड देखील खचला नाही. त्याचे गिर्यारोहण सुरूच राहिले आणि त्याचा अंत देखील १९७९ सालच्या ‘माउंट रेनर’ या मोहिमेवेळी एका अॅव्हलॉंचमधे झाला. कालाय तस्मै नमः... दुसरे काय ?
परतीचा प्रवास मिलम ग्लेशियर मार्गे. मिलम गावी जायला गोरीगंगा नदी लाकडी ओंडक्याच्या पुलावरून ओलांडावी लागते. मिलम गेल्शियरच्या मागे ‘हरदेओल’ आणि ‘ऋषिखडक’ ही शिखरे मोठ्या डौलात उभी दिसतात. मिलम पण छोटेखानी गाव आहे. या गावचा एक सुपुत्र ‘लवराज धर्मसक्तू’ हा १९९८ च्या टाटा एव्हरेस्ट मोहिमेत सामील झालेला होता. आणि सुरेंद्र चव्हाण बरोबर यानेही एव्हरेस्ट सर केले होते. गावातले लोक मोठ्या अभिमानाने त्याचे नाव घेतात. मिलम हे भारत तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव. इथे इंडो-तिबेट बोर्डर पोलिसांचा मोठा तळ आहे. दोन हेलिपॅड आहेत. इथून पूर्वेकडे मलारी खिंड आणि मग तिबेट. आयटीबीपी चे जवान एवढ्या १२००० फुट उंचीवर अतिशय काटेकोरपणे आपले कर्तव्य बजावत असतात. मदतीसाठी कायम तत्पर असणारी ही माणसे. यांच्यात काही मराठी बांधव पण आहेत. या जवानांसोबतची संध्याकाळ चिरस्मरणीय ठरते. दुसरा दिवस परतीचा. पहाटे सव्वासहाला आयटीबीपीच्या चौकीवर तिरंगा फडकवतात. तेव्हा राष्ट्रगीत होते. १२००० फुटांवर चारही बाजूंनी उंचच उंच हिमशिखरांमध्ये ती चौकी आहे. कडाक्याची थंडी आणि बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र प्रश्वभूमीवर तिरंगा फडकतो. त्यावेळी राष्ट्रगीत गाताना अंगावर काटा येतो. काय वाटते ते सांगता येत नाही, ते तिथेच जाऊनच अनुभवावे लागेल.
मिलम नंतर बुर्फू, बिलजू मार्गे मार्तोली इथे मुक्काम. मार्तोली उंच डोंगरावर वसलेले गाव. इथे नंदादेवीचे मंदिर आहे. मार्तोलीमार्गे लवॉँफाटा वरून नंदादेवीच्या मोहिमा जातात. अनेकांनी देवीला अर्पण केलेल्या घंटा तिथे लटकावल्या आहेत. मार्तोली वरून बुगदियार-लीलम मार्गे पुन्हा मुन्सियारीत दाखल होतो.
खरंतर इथून पाय निघत नाही. आनंददायी अनुभव पाठीशी असतात. नंदादेवीचे भव्य दर्शन, आयटीबीपी चे आदरातिथ्य, मिलम चौकीवरचे ध्वजारोहण या गोष्टी हृदयावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. अजूनही डोळे बंद केले की नंदादेवी शिखर समोर प्रगट होते आणि त्यासमोर आपला राष्ट्रध्वज फडकताना दिसतो. कदाचित हीच ओढ वारंवार हिमालयात जायला प्रेरित करते. प्रवास, चालणे, थंडी, पाऊस या सर्वांचा विसर पडतो आणि पंढरीच्या वारकऱ्यांसारखे आम्ही पुन्हा त्या नगाधीराजाच्या अजून एका वेगळ्या रूपाच्या दर्शनासाठी तयारीला लागतो. पावले पुन्हा हिमालयाकडे वळतात !!
- आशुतोष बापट