अशी झाली उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई

१६६१ मध्ये औरंगजेबाने शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवून दिले. शिवाजी महाराजांकडून उत्तर कोकण जिंकून घेण्याच्या मोहीमेअंतर्गत शाहिस्तेखान याने मोहीम काढली.

अशी झाली  उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई
अशी झाली उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई

१६६१ मध्ये औरंगजेबाने शाहिस्तेखानला शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवून दिले, शिवाजी महाराजांकडून उत्तर कोकण जिंकून घेण्याच्या मोहीमेअंतर्गत शाहिस्तेखान याने नागोठण्यावर मोहीम काढली. मोगलांच्या सैन्याने यावेळी नागोठणे व पेण परिसरातली अनेक खेडी उध्वस्त करून मंदिरांची नासधूस केली. पूर्वी नागोठणे तर्फात असलेल्या कुर्नाड नामक खेड्यात आजही भग्न मूर्तीचे अवशेष सापडतात. शाहिस्तेखानापासून मूर्तींचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी मूर्ती तळ्यांमध्ये सुरक्षित ठेवल्या.

१६६१ च्या सुरुवातीस शिवाजी महाराजांच्या ताब्यातील कल्याण सुभ्यावर शाईस्तेखानाने मोहीम काढली मात्र या सुभ्यातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे ही महत्वाची शहरे मोगलांच्या ताब्यात आली नव्हती त्यामुळे शाईस्तेखानाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कारतलबखान नामक सरदाराची बलाढ्य सैन्यसह निवड केली.

मोहिमेपूर्वी शाईस्तेखानाने करतालबखानास एकांतात बोलावले व सांगितले की, तुझा वडील उजबेग वंशातील जसवंत ह्य प्रतापवान आहे व तू सुद्धा आपले वय युद्धातच घालवत आहेस. बलाढ्य गालीबास जिंकून स्वबळाने तू प्रचंडपूर मिळवून मला दिलेस मात्र अजिंक्य अशा सह्याद्रीचा अधिपती शिवाजी युद्धामध्ये किती तरबेज आहे हे सर्वांनाच माहित आहे. सह्याद्री मिळवल्याशिवाय तो अजिंक्य सह्याद्रीपती आपल्या ताब्यात मुळीच येणार नाही. म्हणून माझ्या आज्ञेने तू आजच सेनेसह लगेच सह्याद्री उतरण्याचा दृढ विचार कर. सह्याद्री ताब्यात घेऊन मोगलांना यश दे. शिवाजीच्या मुलुखातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे तू हस्तगत कर, महाबलवान व पराकमी कछप, चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन, सर्जेराव गाढे, रायबागीण, जसवंत कोकाटे, महाबाहू जाधव हे सर्व सेनापती तुझ्यासहित आहेत. करतालबखानानेही अभिमानाने शिवाजी महाराजांचा हा मुलुख तर मी ताब्यात घेईनच पण इतर भाग सुद्धा मी मोगलांच्या अधीन आणीन अशी फुशारकी मारून तो या मोहिमेच्या तयारीस लागला.

शाईस्तेखानाने जिंकण्यास सांगितलेल्या शहरांपैकी नागोठणे शहरावर करतालबखानाने सर्वप्रथम हल्ला करण्याचा निश्चय केला आणि त्याने पुण्याहून तळेगाव, वडगांव, मळवली, लोहगड पार करून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ज्या ठिकाणी नागोठण्याच्या आंबा नदीचा उगम होतो ती आंबेनळीची वाट धरली. हा मार्ग अतिशय दाट अरण्याचा, अडचणींचा, डोंगरकड्यांचा, अरुंद, निर्जन व भयानक होता.

छत्रपती शिवाजी महाराजांना करतालबखानाच्या मोहिमेची बातमी आधीच मिळाली असल्याने ते स्वतः या ठिकाणी आपल्या सैन्यासह आधीच दाखल झाले होते व सोबत नेताजी पालकर, तानाजी मालुसरे व इतर सेनानी आणि सैन्य होते. मोगलांचे सैन्य घाट उतरून उंबरखिंड नावाच्या एका दुर्गम खिंडीत आले. ही खिंड अशी होती की चारही बाजूस घनदाट अरण्य व दोन बाजूना कडे कपाऱ्या त्यामुळे मोगलांचे सैन्य या खिंडीत एखाया शिकारीसारखे अडकले आणि कडे कपारीत व झाडा झुडपात वाघ जसा लपून शिकारीची वाट पाहतो त्याप्रमाणे मराठ्यांनी मोगल टप्प्यात आल्यावर त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि आणि त्यांची दाणादाण उडवली.

मोगल सैन्यास या भागाची सवय नसल्याने मराठ्यांनी शेकडो मोगल सैनिकांना कापून काढले. यानंतर कारतलबखान व इतर सेनापती शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा विचार करू लागले आणि त्यांनी इनायत खान यास बोलणी करण्यास पाठवले. शिवाजी महाराजांनी सुद्धा शरणागती पत्करलेल्या मोगल सैन्यास जीवदान दिले आणि यानंतर सर्व साहित्य त्याच ठिकाणी ठेवून वाचलेले मोगल सैन्य पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने पळून गेले.

यावेळी लाखो रुपयांची संपत्ती मराठ्यांना प्राप्त झाली. शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकर यांना या कार्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल शाबासकी दिली. स्वराज्यातील महत्वाचे स्थान असलेल्या नागोठण्यास जिंकण्याचा कट अशा रीतीने महाराजांनी हाणून पाडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत मोगल सैन्याचा दारुण पराभव केला तेव्हा नामदार खान नावाचा मोगल सरदार दुसऱ्या बाजूने नागोठण्याला मुलुख ताब्यात घेण्यास येत होता मात्र उंबरखिंडीत कारतालबखानाचा जो पराभव झाला त्याची बातमी लागल्यावर आपली काही खैर नाही हे समजून त्याने पळून जाण्याचा बेत केला मात्र महाराजांनी मीरा डोंगरावर नाकेबंदी केली. दलपत राय याने ही माहिती नामदारखानास सांगितली तेव्हा नामदार खान कसाबसा नागोठणे बंदरावर येऊन तेथून त्याने पेणचे बंदर गाठले व तेथून तो कल्याणमार्गे पळून गेला.