पिंपळाच्या झाडाची माहिती व गुणधर्म

पिंपळाच्या झाडाचा विशेष गुणधर्म म्हणजे याचे आयुष्य खूप असते त्यामुळे यास अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते. अनेक ठिकाणी चारशे ते पाचशे वर्ष जुने पिंपळ आजही पाहावयास मिळतात.

पिंपळाच्या झाडाची माहिती व गुणधर्म

संपूर्ण भारतात आढळणारा प्रसिद्ध वृक्ष म्हणजे पिंपळ. पिंपळ हा एक अरण्यवृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचा विशेष गुणधर्म म्हणजे याचे आयुष्य खूप असते त्यामुळे यास अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते. अनेक ठिकाणी चारशे ते पाचशे वर्ष जुने पिंपळ आजही पाहावयास मिळतात.

पिंपळाच्या झाडास हिंदीत पिपल व इंग्रजीमध्ये sacred fig या नावाने ओळखले जाते. पिंपळाच्या आयुष्यमानासारखीच त्याची उंची व विस्तारही प्रचंड आहे. पिंपळाच्या काही झाडांचा विस्तार एवढा मोठा असतो की त्याखाली शेकडो माणसे सावलीसाठी बसू शकतात.

पिंपळ या झाडास धार्मिक महत्वही आहे. भारतीय संस्कृतीत पिंपळ हा एक पवित्र वृक्ष मानला गेला असून जे वृक्ष बिलकुल तोडू नयेत असा जो दंडक घालून दिला आहे त्यामध्ये पिंपळाचा सुद्धा समावेश आहे.

तथागत गौतम बुद्धांनी बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले तेव्हापासून पिंपळास बोधिवृक्ष या नावाने सुद्धा ओळखले जाते.

पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानला गेला असून श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा केली जाते.

पिंपळाचे झाड हे सहसा गावाच्या मध्यभागी व प्रशस्त जागेत लावले जाते कारण या वृक्षाची वाढ विस्तीर्ण असते.

पिंपळाच्या झाडास फळे सुद्धा येतात मात्र ती आकाराने लहान असतात. पिंपळाच्या झाडाचे सर्वात मुख्य महत्व म्हणजे त्याच्यापासून मिळणारी थंड छाया व शुद्ध प्राणवायू. उन्हाचा चटका अंगावर घेत एखादा मनुष्य जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली येतो तेव्हा आपल्या थंड छायेने व आसमंतात वाहणाऱ्या वाऱ्याने मनुष्यास त्वरित आराम मिळतो.

पिंपळाच्या झाडाच्या सालीत व पानांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असून त्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत केला जातो. पिंपळाच्या झाडास लहान फळे असण्याचे कारण असेही सांगितले जाते की जर पिंपळास मोठ्या आकाराची फळे येत असती तर पिंपळाच्या डहाळ्या जाड होऊन चांगली हवा निर्माण झाली नसती कारण पिंपळाचे मुख्य महत्व त्याच्या छायावृक्ष असण्यातच आहे.