कोल्हा - श्वानकुळातील एक देखणा प्राणी
कोल्हा हा श्वानवर्गातील एक सस्तन प्राणी असून त्याला इंग्रजीत फॉक्स (Fox) व हिंदीत लोमडी या नावांनी ओळखले जाते.
एक जंगलात राहणारा मात्र आपल्या सर्वांना परिचित असलेला प्राणी म्हणजे कोल्हा. लहानपणापासूनच आपल्याला कोल्ह्याचा गोष्टींतून परिचय झालेला असतो त्यामुळे या प्राण्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
कोल्हा हा श्वानवर्गातील एक सस्तन प्राणी असून त्याला इंग्रजीत फॉक्स (Fox) व हिंदीत लोमडी या नावांनी ओळखले जाते. कोल्हा हा प्रामुख्याने भारत व आशिया खंडातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात आढळतो व आफ्रिका खंडातही त्याचे वास्तव्य पाहावयास मिळते. कोल्हा व कुत्रा दोघेही श्वानकुलातील असल्याने दोघांच्या स्वरूपात खूप साम्य आढळून येते. कोल्ह्याची लांबी अदमासे अडीच फूट असून उंची सुमारे दीड फुटापर्यंत असते आणि त्याचा रंग पिवळसर असून पाठीवर काळ्या रंगाचे केस दिसून येतात. कोल्ह्याच्या कानांचा रंग तांबडा असून ते बाहेर झुकलेले असतात. कोल्ह्याची शेपटी लांब असते आणि तोंड चिंचोळे असते आणि त्याच्याकडे निरखून पहिले असता तो कायम चंचल व कावरा बावरा झाल्यासारखा दिसून येतो.
कोल्ह्याची घाणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असून तो खूप अंतरावरूनही शिकारीचा अंदाज घेऊ शकतो. कोल्हे हे दिवसा जंगलात एखाद्या खडकाच्या खबदाडीत किंवा बिळात लपून राहतात आणि रात्री शिकार शोधण्यास बाहेर पडतात. कोल्हा हा प्रामुख्याने समूहात राहणारा प्राणी असल्याने ते शिकारीस खूप मोठा समूह करूनच बाहेर पडतात. यावेळी त्यांचे जे ओरडणे होते त्यास कोल्हेकुई असे म्हणतात. कोल्ह्याच्या हा आवाज ऐकण्यास खूप वेगळा असून कोणीतरी मोठ्याने रडत आहे असे प्रथमतः वाटून येते आणि विशेषतः त्यांची ही कोल्हेकुई ही फक्त दिवस मावळून रात्र सुरु झाल्यावरच ऐकू येते. समूहातील एक कोल्हा ओरडू लागला की इतर कोल्हेसुद्धा ओरडू लागतात.
कोल्ह्यांचे मुख्य अन्न म्हणजे कोंबडी, शेळ्या आदी प्राण्यांचे मांस असून गरज पडल्यास ते पुरलेली प्रेतेसुद्धा उकरून खातात. कोल्ह्याची भूक ही अधिक असल्याने ताजे मांस न मिळाल्यास ते कुजलेल्या मासांवरही उदरनिर्वाह करू शकतात आणि तेही नाही मिळाले तर ते शाकाहार सुद्धा करतात आणि फळ भाज्या यांच्यावर आपली भूक भागवतात त्यामुळे कोल्ह्यास सर्वभक्षी म्हणूनही ओळखले जाते.
कोल्हा हा कुत्र्याप्रमाणे जरी पटकन पाळता येत नसला तरी त्यास लहानपणापासून माणसाची सवय लावल्यास तो सुद्धा पाळीव पशु होऊ शकतो. काही ठिकाणी कोल्हे पाळल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. पाळीव कोल्हे भाकरी सुद्धा आवडीने खातात असे दिसून आले आहे. कोल्ह्याच्या मादीस वर्षातून एकदाच गर्भ राहतो व तिला एका वेळेस चार ते पाच पिल्ले होतात. तर असा हा कोल्हा म्हणजे निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक प्रमुख घटक आहे.