वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व
हरित वनस्पती सूर्याची ऊर्जा ग्रहण करतात आणि त्या ऊर्जेच्या मदतीने कार्बन डायॉक्साईड आणि पाणी हा कच्चा माल वापरून कर्बोदके तयार करतात, नंतर त्यापासून जीवनोपयोगी इतर घटक म्हणजे प्रथिने, मेद तयार करतात.
आयुर्बलं यशो वर्च: प्रजा पशु वसूनि च ब्रह्मप्रज्ञाच मेधा च त्वं नो देहि वनस्पते (नारदपुराण भाग १ २७.२५) "हे वनस्पते. तू मला दीर्घायुष्य दे, त्यासाठी लागणारे बळ, शक्ती दे, यश दे, पशुधन दे, संतती दे, कीर्ती दे. बुद्धी दे."
वनस्पती आपल्याला काय काय देऊ शकतात याची ही जमी; ही यादी यपुराणकालीन असली तरी आजच्या वैज्ञानिक जगातही वनस्पतींच महत्त्व तिळमात्र कमी नाही; जो पर्यंत कृत्रिम रीत्या अन्नघटक निर्मिती करून 'कप्सूल घ्या' असा सल्ला दिला जात नाही, तो पर्यंत जीवसृष्टीतच काय पण मानवी समाजातही वनस्पतीचं स्थान अबाधितच आहे आणि भविष्यात जरी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांनी अशा कॅप्सूल किंवा गोळ्या तयार केल्या तरी 'पोट भरलं' असं मानसिक आणि भावनिक समाधान, तृप्ती त्यापासून नक्कीच मिळणार नाही हे एक सत्य आहे.
हरित वनस्पती सूर्याची ऊर्जा ग्रहण करतात आणि त्या ऊर्जेच्या मदतीने कार्बन डायॉक्साईड आणि पाणी हा कच्चा माल वापरून कर्बोदके तयार करतात, नंतर त्यापासून जीवनोपयोगी इतर घटक म्हणजे प्रथिने, मेद तयार करतात.
सर्व सजीवांना जगण्यासाठी प्रजननासाठी ऊर्जेचा अखंड पुरवठा असावा लागतो. तो शाकाहारी प्राणी वनस्पतीपासून घेतात, तर मांसाहारी प्राणी शाकाहारींना खाऊन आपलीउर्जेची गरज भागवतात. 'जीवोजीवस्य जीवनम्' या न्यायाने हा ऊर्जेचा प्रवाह जीवसृष्टीतून वाहात असतो.
पण माणूस नावाच्या प्राण्याला केवळ अन्न ही मूलभूत गरज नाही. त्याच्या वस्त्र, निवारा, औषधे, पेये, सौंदर्य प्रसाधने आणि इतर बरच काही यासाठी कोणे एके काळी तरी वनस्पती या स्त्रोत होत्या; आज त्यापैकी अनेकांची जागा कृत्रिम रित्या तयार केलेल्या पदार्थांनी, घटकांनी घेतली आहे.
तरी सुद्धा वनस्पतीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. याचं सद्यास्थितीतील महत्त्वाचं कारण महणजे पाश्चात्य जगावर आजमितीस दिसून येणारा आयुर्वेदीय उपचार प्रणालीचा प्रभाव! स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर दोन तीन दशकं आपला सूर्य पश्चिमेला उगवत असल्याने झाडपाल्याच्या औषधाने कोणताच परिणाम रोगावर पडत नाही तर साईड इफेक्टस म्हणजे दुष्परिणाम होण्याची बाब दूरच अशी टिंगल केली जात असे.
आता परिस्थिती अशी की हळदीच्या जंतुघ्न वृत्तीबद्दल अनिवासी भारतीयांनी स्वामीत्व मिळवलं. मग हे आमचं पारंपारिक ज्ञान आहे'. हे सत्य जागतिक पातळीवर सिद्ध करण्यासाठी आपल्याला लढावं लागलं. आज अशी कितीतरी पारंपारिक औषधं आपल्या समाजात रूढ आहेत. अगदी नेहमीच्या बोलण्यातून वाकप्रचारातून याची साक्ष मिळते. उदाः 'ज्याचं पोट दुखेल, तो ओवा मागेल,' 'सणाला श्रीखंड, सर्दीला वेखंड' किंवा नाई निर्गुडी माका, औषधांचा काका इ. आपल्याकडे वापरात असलेल्या काही वनस्पतींची नावही अर्थवाही आहेत.
उदा. अशोक म्हणजे अ-शोक अर्थात शोक नाहीसा करणारा, स्त्रियांचे रोग म्हणजे पर्यायाने त्यांचा शोक नाहीसा करणारा, ज्योतिष्मती अर्थात ज्योतिसारखी मनी तेजस्वी बुद्धी देणारी; हिरडा म्हणजे हरीतकी; हरस्य भवने जाता, हरीताच स्वभावतः। हरते सर्व रोगान् च तेन प्रोक्ता हरीतकी असं वर्णन करणारा श्लोक सांगतो की सर्व रोगांना पळवून लावणारी, हरवणारी ती हरीतकी.
औषधी वनस्पतींच ज्ञान वनचर, गोपालक, वनात राहणारे तपस्वी यांना अधिक असतं असं म्हटलेलं आहे. औषधी नामरूपाभ्यां जानते ह्यजपा वने अविपाव गोपाश्च ये चान्ये वनवासिनः गोपालास्तापस्त व्याधा ये चान्ये वनचारिणः। मुलाहाच ये जे भ्यो भेषज व्यतिरिष्यते सुश्रुत.
पूर्वीच्या काळातील विशेषत: पारतंत्र्यात देश जखडला जाण्यापूर्वी वैद्य लोक जंगलातून हिंडून स्वत: औषधी वनस्पती गोळा करत असत. काळाच्या ओघात अर्थातच हे वनस्पती ओळखण्याचं ज्ञान जवळजवळ लोप पावलं. याचं कारण भारतीयांची उदासिनता, पाश्चात्य उपचार पद्धतीचा जनमानसावर झालेला मानसिक प्रभाव. त्यामुळे वैद्यांच वनस्पतीविषयक ज्ञान संपुष्टात आलं. आयुर्वेद उपचार पद्धतीची पिछेहाट झाली.
असं झालेलं असलं तरीही परिस्थिती पालटली आहे. आयुर्वेदीय उपचार पद्धतीचं पुनरुज्जीवन झालं आहे. यात पारंपारिक औषधी वनस्पती जशा जगन्मान्य होत आहेत तशाच आदिम समाजाला ज्ञात असलेल्या काही वनस्पतींनाही त्यांच्या विस्मयकारक परिणामांमुळे महत्त्व प्राप्त झालं आहे.
वानगीदाखल इथे दोन वनस्पतींचा विचार करु पैकी एक सर्पगंधा अर्थात् चंद्रिका वा नाकुली कोकणात ही वनस्पती मुबलक, हिची मुळं सापासारखी वेडी वाकडी, वळणावळणाची आणि सर्पदंशावर उपयुक्त म्हणून ही सर्पगंधा अपस्माराचे झटके अनेकदा अमावस्या पौर्णिमेच्या आसपास म्हणजे चंद्राशी निगडीत स्थानिक लोक या झटक्यांवर इलाज म्हणून सर्पगंधाचा यशस्वी वापर करतात. म्हणून हिचं नाव चंद्रिक, दिवसभर अतीव ताणाला तोंड दिल्यावर महात्मा गांधीरात्री सर्पगंधाच्या मळाचा काढा करून पीत असत, मानसिक शांतता लाभण्यासाठी सर्पगंधेचा असा वापर स्थानिक मंडळींना माहिती होता.
१९५२ मध्ये सर्पगंधेच्या मुळांपासून रिसाईन नावाच अल्क्लॉईड काढलं. त्याचा वापर मग दुभंग व्यक्तीमत्वाचे बळी, मानसिक रुग्ण यांच्यासाठीच्या उपचार करण्यात येऊ लागला. रिसाईन मिळण्यापूर्वी अशा रोग्यांवर अघोरी पद्धतीचे उपचार होत असत.
स्थानिक मंडळींच्या ज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेलं दुसरं औषध म्हणजे आरोग्यपचा. जीवनी केरळमधील कानी जमातीला ट्रॅकिपस झेलॅनिकस् या वनस्पतीचा एक अनोखा उपयोग माहिती होता. या वनस्पतीचे सेवन केल्यास तणाव कमी होतो, थकवा दूर होतो असं त्यांच पारंपारिक ज्ञान होतं. आधुनिक प्रयोगातूनही ते सिद्ध झालं आणि ट्रॅकपिस वापरून 'जीवनी' हे औषध तयार झालं.
हे पारंपारिक ज्ञान कोणी जमातीचं. त्यांच्या या ज्ञानाचं स्वामित्व मान्य होऊन या औषधातून उपलब्ध होणारा आर्थिक फायदा प्रत्यक्ष काहींना मिळणार आहे. नोथोपोडायटिस् म्हणजे स्थानिक भाषेत नखऱ्या; ट्युमर म्हणजे कर्क रोगाशी सामना करण्यास उपयुक्त वृक्ष. मात्र त्याच्या या वापरामुळे त्याच्या स्वतःच्याच अस्तित्वाला धोका उत्पन्न झाला आहे.
संपूर्ण पश्चिम घाटातील सदाहरित वनसंपदा म्हणजे औषधी वनस्पतींची अलिबाबाची गुहाच, मात्र हल्ली. आयुर्वेदाला बरे दिवस असल्याने या संपदेची शब्दश: लुट सुरु आहे. त्यात त्यांच्या निवास स्थानांनाही धक्का पोचलेला आहे. या दुहेरी संकटांना तोंड देण्यासाठी कोकणातील काही भल्या मंडळींनी प्रयोग आहे. श्रीवर्धन जवळच्या ओम स्वामी समर्थ साधना केंद्र " पत्ता: मुक्काम पांगळोली , पोस्ट. वडघर , ता. श्रीवर्धन, जि. रायगड. या ग्रामी उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ आश्रम हा त्यापैकी एक महत्त्वाचा, या आश्रमाच्या परिसरात गेल्या वर्षापासून अनेक प्रकारच्या वृक्षांची झुडुपांची वेलींची लागवड सुरुआहे.
अशी लागवड अनेक ठिकाणी अनेक जण करीत असतात. मात्र या आश्रमाचं वैशिष्ट्य हेच की केवळ रोपं लावणं, त्याचं संगोपन करणं एवढाच साचेबंद कार्यक्रम येथे चालत नाही. पण आपल्या प्राचीन मंत्रोच्चाराच्या मंगल वातावरणात या वनस्पती वाढतात. त्यामुळे एक नुसतीच वनस्पती म्हणून नाही तर आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे या वनस्पतींना देवता समजले जाते. हा उपक्रम अभिनव!
अनेक औषधी वनस्पतींची लागवड इथे लागवड केली आहे. हे एक जिवंत वनस्पती संग्रहालय व्हावे ही यामागची संकल्पना, अनेक वेळा औषधी वनस्पतींचे प्रत्यक्ष दर्शनही आपल्याला झालेले नसते. उद्यानात सध्या वाढत असलेल्या औषधी वनस्पतींपैकी प्रमुख पुढीलप्रमाणे या मानवनिर्मित वनात करण्यात आलेले नक्षत्र उद्यानही इथली खासियत प्रत्येक व्यक्तीला जशी जन्मभरात असते, तसेच जन्मनक्षत्रही असते हे नक्षत्र एका आराध्यवृक्षाची जोड असते. नक्षत्र वृक्षाचा उपयोग त्या व्यक्तीने औषध म्हणूनही करायचा नाही असा दंडक आहे. वृक्ष जतन संवर्धन संरक्षणाचा हा एक प्रयोग आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी केला होता.
- डॉ. हेमा साने