शिवराई नाण्यांची एक अज्ञात टांकसाळ

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे चलन असावे यासाठी १६६४ सालापासून नाणी पाडण्यास सुरुवात केली.

शिवराई नाण्यांची एक अज्ञात टांकसाळ
शिवराई नाण्यांची एक अज्ञात टांकसाळ

१६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते अगदी १८३० पर्यंत स्वराज्याची नाणी प्रचलित होती. शिवरायांच्या नाण्यांमध्ये शिवराई व होन ही नाणी प्रमुख मानली जातात. 

होन हे नाणे सोन्याचे तर शिवराई ही तांब्याची असायची. शिवराई या नाण्यांचे सुद्धा खूप प्रकार प्रचलित होते. स्वराज्य जसजसे वाढू लागले त्यानुसार विविध ठिकाणी टांकसाळी स्थापन होऊ लागल्या व त्या त्या टांकसाळी मध्ये विविध प्रकारची नाणी पडली जात. सहसा होन व शिवराई या दोन्ही नाण्यांमध्ये एका बाजूस श्री राजा शिव व दुसऱ्या बाजूस छत्रपती असे शब्द लिहिलेले असत.

यामध्ये सुद्धा श्री व राजा शिव या दोन शब्दांमध्ये एक रेघ येत असे जी काही नाण्यांत एकच असे तर काही नाण्यांत त्या दोन असत. दोन रेघा असणाऱ्या नाण्यांना दुदांडी शिवराई असे म्हटले जाई. अशी नाणी शाहू महाराजांच्या काळात प्रचलित होती. शाहू महाराजांपूर्वी नाण्यांची टांकसाळ ही सरकारी असे मात्र शाहू काळात व्यापारास उत्तेजन मिळावे यासाठी टांकसाळीचे सुद्धा खाजगीकरण करण्यात आले. राज्यातील अनेक ठिकाणी नाणी पाडली जाऊ लागली.

अशीच एक टांकसाळ कोकणातील नागोठणे येथे सुरु करण्यात आली होती जिच्याबद्दल समकालीन कागदपत्रांत असलेल्या माहितीनुसार जाणून घेऊ.

१७४४ साली छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब उर्फ बालाजी बाजीराव हे पेशवे पदावर होते. त्या काळात नागोठण्याच्या बाळाजी बापूजी या गृहस्थास शिवराई हे नाणे पडण्याचा मक्ता देण्यात आला. यासाठी नागोठणे येथे टांकसाळ घालून दहा माशी वजन असलेली नाणी तयार करावी मात्र वजनात जर काही घट निघाली तर गुन्हेगारी घेतली जाईल असेही करारात नमूद करण्यात आले होते.

सदर कौलपत्र पुढील प्रमाणे 

"बाळाजी बापूजी यांस कौल लिहून दिला की कसबे नागोठणे येथे टांकसाळ घालून दहामाशी पैसा करणे. दसमाशी पैसा झाला तर उत्तमच झाले. उणा पैसा झाला तर गुन्हेगारी घेतली जाईल. सदरहुचा मक्ता तिसाला दुतर्फा देखील बाबती. येणेप्रमाणे सालमजकूर पन्नास व सन सीत पाऊणशे व सन सबा शंभर रुपये याप्रमाणे मक्ता तिसाला करार केला असे. तर सदरहूप्रमाणे सरकारांत उगवणी करून पावलियाचे कबज घेणे"

हा मक्ता अर्थात करार एकूण तीन वर्षांसाठी करण्यात आला होता. यासाठी सरकारात काही हफ्ते भरावयास लागणारे होते जे प्रत्येक वर्षाच्या माघ, वैशाख, श्रावण,  कार्तिक या महिन्यांना भरावे लागणार होते. 

१७४५ साली सुरु झालेली ही टांकसाळ आणखी किती वर्षे कार्यरत होती याची काही माहिती मिळत नाही मात्र रघुनाथराव यांच्या रोजनिशीत त्यांनी जेव्हा आनंदवल्लीस नाण्यांची टांकसाळ घातली त्याची नोंद केली होती मात्र याचवेळी त्यांनी नागोठण्यास पूर्वी असा कारखाना होता असा जो उल्लेख केला आहे त्यावरून लक्षात येते की १७६७ च्या पूर्वीच नागोठण्याची टांकसाळ बंद झाली होती.