चौल येथील कलावंतिणीचा महाल

कलावंतिणीच्या महालास कलावंतिणीचा वाडा या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा वाडा पाषाणी असून चुन्याचा वापर वाड्याच्या बांधकामात करण्यात आला आहे. 

चौल येथील कलावंतिणीचा महाल
चौल येथील कलावंतिणीचा महाल

रायगड जिल्ह्यातले चौल रेवदंडा म्हणजे पुरातत्वीय अवशेषांचे संग्रहालयच आहे. प्राचीन काळी चंपावती व रेवती क्षेत्र अशी नावे असलेल्या चौल रेवदंड्यात गेली हजारो वर्षे अनेक राजवटी नांदल्या व त्यांच्या पाऊलखुणा आजही येथे पाहावयास मिळतात.

चौल मध्ये असलेल्या असंख्य पुरातत्वीय अवशेषांपैकी एक म्हणजे कलावंतिणीचा महाल. हे स्थळ चौलच्या पूर्वेस असून सोमेश्वर शिवमंदिरापासून अदमासे पाचशे मीटर अंतरावर आहे. 

कलावंतीण महाल ज्या स्थळी आहे त्या ठिकाणास सराई या नावाने ओळखले जाते व परिसरात सराई नावाचे छोटेसे गावं आहे.

या ठिकाणी येण्यासाठी अलिबाग, मुरुड अथवा नागोठणेमार्गे रस्ते आहेत. यापैकी नागोठणे रोहा रस्त्यामार्गे मेढे येथून एक रस्ता चौलकडे जातो त्या रस्त्याने आल्यास चौल मध्ये प्रवेश करतानाच प्रथम कलावंतिणीचा महाल दिसून येतो. 

रस्त्यावरून प्रथमदर्शनीच या इमारतीचे स्थापत्य पाहून अवाक व्हायला होते. मध्ययुगीन इस्लामी पद्धतीचे हे स्थापत्य निजामशाही काळातील असावे असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

कलावंतिणीच्या महालास कलावंतिणीचा वाडा या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा वाडा पाषाणी असून चुन्याचा वापर वाड्याच्या बांधकामात करण्यात आला आहे. 

पूर्वी हा वाडा अतिशय भव्य असला तरी सध्या त्याचा फक्त दर्शनी भाग आणि पाठीमागील भाग सुस्थितीत असून मधील भाग नामशेष झाला आहे. वाड्याच्या दर्शनी बाजूस घडीव दगडाच्या तीन शिखर असलेल्या कमानी व तीन घुमट असून हे घुमट विटांनी बांधले आहेत. 

वाड्याच्या सभागृहास तीन घुमट आणि दोन बाजूस दोन मोठ्या देवळ्या आहेत. सभागृहाच्या पश्चिम दिशेस ५७ मीटर लांब आणि ४० मीटर रुंद मोकळी जागा असून तिच्या चहूबाजूस भिंत दिसून येते. फार पूर्वी या ठिकाणी लाकडी इमारत असावी असे परिसराच्या रचनेवरून जाणवते. 

पाठीमागील बाजूस १५ मीटर लांब आणि ७ मीटर रुंद मशीद दिसून येते. कलावंतिणीच्या महालाच्या पाठीमागे एक मोठे तळे असून तेथे जाण्याच्या मार्ग महालाच्या उजव्या बाजूने आहे. सदर वास्तूचे प्रयोजन काय होते याचे उत्तर मिळत नसले तरी प्राचीन काळापासून चौल वरून पश्चिम महाराष्ट्रात जाणारा मुख्य मार्ग येथूनच जात असल्याने या वास्तूस त्याकाळी खूप महत्व असावे हे स्पष्ट आहे.

चौल रेवदंड्याच्या पुरातत्वीय वैभवात भर घालणारी ही वास्तू एकदातरी पाहणे अगत्याचे आहे.