किल्ले राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी

राजगड हा किल्ला म्हणजे शिवरायांचे अतिशय महत्वाचे राजकीय केंद्र व स्वराज्याची पहिली राजधानी कारण शिवचरित्रातील अत्यंत प्रमुख ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या साक्षीनेच स्वराज्य फुलले व पुढे त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.

किल्ले राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी
किल्ले राजगड

१२ मावळांपैकी गुंजण मावळ खोऱ्याचा एक संरक्षक असलेला राजगड (First Capital of Swaraj) हा किल्ला शिवरायांनी जिंकलेला दुसरा किल्ला होय. तोरण्यावर मिळालेल्या खजिन्याचा उपयोग महाराजांनी राजगड हा किल्ला बांधण्यास केला व येथून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी यत्न केले.

पुरंदरावरून महाराजांनी १६५८ साली आपले ठाणे राजगड येथे हलवले व व स्वराज्याची पहिली राजधानी करून अनेक इमारतींची बांधणी या किल्ल्यावर केली.  या किल्ल्याने महाराजांच्या कार्यकाळातील अनेक महत्वाचे प्रसंग पाहिले.

सभासद बखरीत राजगडाविषयी पुढील उल्लेख आहे. 

"मुरबाद (मुरुंबदेव) म्हणोनी डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या."

मराठी साम्राज्याची छोटी बखर राजगडाबद्दल पुढील माहिती सांगते 

"त्याजवर राजगड, पद्मावती, संजीवनी व सुवेळा घेऊन किल्ल्याचे इमारतीचे काम लावले. त्या कामावर मोरो त्रिंबक पिंगळे चाकरीस ठेवले."

सभासद बखरीत राजगडाचा उल्लेख मुरबाद असा आला आहे याशिवाय किल्ल्यास पूर्वी मुरुंबदेवाचा डोंगर असे नाव होते. मुरंबदेव हा ब्रह्मदेव या शब्दाचा अपभ्रंश आहे. राजगडावर आजही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. 

शहाजी महाराजांची जहागीर ही भीमथडीत होती व या प्रांतातूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार सुरु केला अशावेळी त्या प्रांतात हालचाली करण्यास महाराजांना राजगड हा किल्लाच आपले मध्यवर्ती ठिकाण म्हणून योग्य वाटला.

राजगड या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल १३९४ मीटर उंच आहे. शिवचरित्र अभ्यासकांच्या मते राजगड हा स्वराज्याची उंची दाखवितो तर रायगड स्वराज्याचा विस्तार. राजगड हा किल्ला बांधताना राजधानीचे ठिकाण नजरेसमोर ठेवूनच किल्ल्यावरील इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे राजगडावरील प्रत्येक वास्तूचा एक स्वतंत्र इतिहास होऊ शकेल.

राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. मार्गासनी या गावातून वाजेघर येथे जाणारा ६ किलोमीटरचा पक्का मार्ग आहे जो साखर मार्गे जातो. या रस्त्यावरील विंझर गावाहून गुंजवणी नदी पार करून लागते ते गुंजवणे गाव. याच गुंजवणे गावातून राजगडावर जाण्याचा मार्ग आहे जो राजगडाच्या गुंजण दरवाज्यामार्गे माथ्यावर जातो याशिवाय पाबे या गावातून कानंदी नावाची नदी ओलांडून खरीव गावातून त्याच नावाची खिंड चालून वाजेघरात निघतो येथून जाणारा रस्ता पाली दरवाजा व चोर दिंडीमार्गे पद्मावती माचीवर दाखल होतो.

राजगड किल्ल्याचा आकार अद्भुत आहे. किल्ल्यास एकूण तीन माच्या असून त्यांची नावे पद्मावती, संजीवनी व सुवेळा अशी आहेत या तीनही माच्यांमध्ये प्रचंड असा सुळका आहे ज्यावर राजगडाचा सर्वोच्च असा बालेकिल्ला आहे. 

पाली दरवाजा व चोरदिंडी मार्गे आपण प्रथम पद्मावती माचीवर दाखल होतो. या माचीचे नाव याच ठिकाणी असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिरावरून पडले आहे. पद्मावती माची ही राजगडाची प्रमुख वस्ती कारण स्वतः शिवाजी महाराजांचा निवास हा पद्मावती माचीवरच होता. महाराजांच्या वाड्याशिवाय येथे, पद्मावती मंदिर, रामेश्वर, पद्मावती तळे, दिवाणघर, घोड्यांची पाग, अंबरखाना, ढालकाठीची जागा इत्यादी वास्तू आहेत.

पद्मावती माचीहून सदर पार करून पुढे गेलो की बालेकिल्ल्याकडे जाणारा सरळसोट मार्ग आहे. उभी चढण असल्याने हा मार्ग नवख्यांसाठी भीतीदायक वाटतो मात्र काही वर्षांपूर्वी या मार्गास लोखंडी रेलिंग बसवल्याने त्यांना धरून बालेकिल्ल्यावर जाता येते. 

बालेकिल्ल्यावर जाताना सर्वप्रथम नगारखान्याचे महाद्वार येते, नंतर जननीदेवीचे मंदिर व पुढे गेल्यास चंद्र तलाव आणि ब्रह्मदेवाचे मंदिर दिसते. येथून पुढे जाऊन आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो जेथे सरदारांचे वाडे, अंबरखाना, बाजारपेठ अशा अनेक इमारतींची जोती दिसून येतात. बालेकिल्ल्यावरून चोहो बाजूंचे विहंगम दृश्य दिसून येते.  उत्तरेस तोरणा व सिंहगड हे दोन किल्ले, खाली असणाऱ्या पद्मावती, संजीवनी व सुवेळा या माच्यांचे विहंगम दर्शन, पूर्वेस पुरंदर याशिवाय रोहिडा, रायरेश्वर पठार, भाटघर धरण, महाबळेश्वर, पांचगणी, प्रतापगड, मकरंदगड, कावळ्या, रायगड व लिंगाणा असे अनेक किल्ले व इतर स्थाने बालेकिल्लयावरून दिसू शकतात. 

किल्ल्याच्या पश्चिमेस संजीवनी माची आहे व या माचीस एकूण तीन टप्पे आहेत. संजीवनी माचीस अळू नावाचा एक दरवाजा असून या माचीवरून कोकणाचे विहंगम दर्शन होते. सुवेळा माची गडाच्या पूर्वेस आहे. याच माचीवर गडाचे किल्लेदार शिलीमकर व तानाजी मालुसरे यांचे वाडे होते. या माचीस एक बुधला व खडकात आरपार गेलेले भलेमोठे छिद्र आहे ज्यास नेढे असे म्हणतात. 

राजगड हा किल्ला महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत झालेला दुर्ग आहे. राजाराम महाराजांचा जन्म, सईबाईंचे निधन इत्यादी कौटुंबिक व फत्तेखाना वरील स्वारी, अफजलखानाचा पाडाव, शाहिस्तेखानाचा पराभव, आग्रा प्रकरण इत्यादी महत्वाच्या राजकीय घटना महाराज राजगड किल्ल्यावर वास्तव्यास असतानाच घडल्या.

अशा या शिवाजी महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत झालेला राजगड हा किल्ला गडांचा राजा म्हणून ओळखला जातो. रायगडास जसे दुर्गेश्वर म्हटले जाते तसेच राजगडास दुर्गराज म्हटले जाते. असा हा किल्ला याची देही याची डोळा पाहणे प्रत्येक दुर्गप्रेमीचे व शिवप्रेमीचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच असते.