अजातशत्रू छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र तसेच मराठा साम्राज्याने ज्यांच्या काळात समस्त हिंदुस्थानावर अमल केला ते म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज.

अजातशत्रू छत्रपती शाहू महाराज

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातल्या गांगवली या छोट्याशा गावात सन १६८२ साली जन्म झालेल्या शाहूंचे बालपण रायगडावर गेले पण संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मुघलांच्या सैन्याने रायगडावर कब्जा केला व शाहूंना त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाईंसहित कैद केले. 

यानंतरची अनेक वर्षे औरंगजेबाच्या छावणीत ते नजरकैदेत होते. शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव शिवाजी होते मात्र औरंगजेबाने कैदेत असताना त्यांचे शाहू असे नामकरण केले.

शाहू शब्दाचा अर्थ शत्रूचा पुत्र असा होतो असे उल्लेख काही अभ्यासक करतात मात्र औरंगजेब हा शहाजी महाराजांनासुद्धा शाहू (शहाजी नावाचा लघूल्लेख) असेच म्हणत असे व तोच प्रकार त्याने शहाजी महाराजांचे पणतू शाहू महाराजांच्याबाबतीत केला असावा. यासंदर्भात एक उदाहरण म्हणून १६५७ सालचे एक पत्र आहे ज्यात औरंगजेब म्हणतो.

"शाहूच्या मुलाने (शिवाजी महाराज) या दरबाराकडे एका  वकिलामार्फत असे विनंतीपत्र पाठविले आहे की, "विजापुरकरांच्या मुलूखापैकी जो प्रांत माझ्या ताब्यात आहे तो मजकडेच ठेवून मला जर मनसब देण्यात येईल विजापूरच्या विरोधात मी आपणास साहाय्य करून आदिलशाही प्रांत तुमच्या ताब्यात देईन." या पत्रास मी जे उत्तर पाठविले आहे त्यात काही अटी लिहील्या आहेत व शाहूसही (शहाजी महाराज) याविषयी कळविले आहे. शिवाजीकडून उत्तर आले म्हणजे मी (औरंगजेब) तुम्हास कळविन, त्याने माझ्या हुकुमातील अटी मान्य केल्या तर ठीक आहे, नाहीतर आमची सैन्ये त्यास नष्ट करून टाकतील."

शाहू महाराजांची वयाच्या २५ व्या वर्षी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटका होऊन २६ व्या वर्षी त्यांना आपल्या हक्कासाठी लढून राज्य मिळवावे लागले. शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक मातब्बर घराणी उदयास आली व मराठ्यांचा झेंडा अटकेपार रोवण्यात आला.

शाहू महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती - । श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

चिटणीस बखरीत शाहू महाराजांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्या स्वभावाची थोडक्यात माहिती करून देतात.

'विस्कळीत प्रसंग जाहला, याजमुळे चांगली माणसे मातबर लोग मोगलाईत व हबसाणात गेले ते प्रयत्न करुन सेवेत आणवले. त्यांचे बंदोबस्त करुन त्यांस खास चौकीस ठेवले, गोरगरिब अथवा दाद फिर्याद आहे म्हणुन उभे राहिले असता, स्वारीत पालखी उभी करु अगर मजालसीत ऐकुन समक्ष आज्ञा सांगावयाची असेल ती लागलीच सांगावी.'

छत्रपती शिवरायांचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा वारसा लाभलेले पण आजोबा व वडिलांच्या पराक्रमापुढे काहीसे झाकोळले गेलेले, समस्त भारतावर यांच्या कारकिर्दीत कब्जा होऊनही त्याचे योग्य श्रेय न मिळू शकलेले स्वराज्याचे दुर्लक्षित छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्राविषयी अधिक जागरूकता होणे गरजेचे आहे.