तळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती व तळजाई.

काही वर्षांपूर्वी पुणे शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विख्यात होते. समुद्रसपाटीपासून अदमासे ५६० मीटर उंच व सह्याद्रीच्या मुख्य धारेच्या पूर्व दिशेस खूप जवळ असल्याने पावसाचे प्रमाणही येथे खूप होते. पानशेतच्या महाप्रलयानंतर पुणे शहराने कात टाकली व बघता बघता ते महानगर झाले. पूर्वी शहराच्या चौफेर दिशांना असलेल्या छोट्या छोट्या टेकड्या व दाट राने पाहता पाहता शहराचाच एक भाग होऊन बसली. या टेकड्या म्हणजे पुण्याला ऑक्सिजन देणारी फुफ्फुसे असे पूर्वी म्हणायचे मात्र अनेक टेकड्या काळाच्या ओघात गुप्त झाल्या.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती व तळजाई. यापैकी तळजाई ही टेकडी भव्य आहे. नीट निरीक्षण केले असता हे देखील समजून येते की मुळात तळजाई व पर्वती या दोनही टेकड्या एकाच डोंगराचा भाग असून मूळ डोंगराचा एक निमुळता भाग उत्तरेस जेथे संपतो तो भाग म्हणजे पर्वती टेकडी.
तळजाई टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६७० मीटर असावी. या टेकडीवर येण्यासाठी चोहो दिशांनी वाटा आहेत मात्र मुख्य वाट पुण्याच्या अरण्येश्वर भागातील शिंदे हायस्कुल जवळून आहे. हा रस्ता प्रशस्त आहे. सुरुवातीस आपल्याला एक आधुनिक पॅगोडा सदृश बांधकाम दिसून येते ज्यास तळजाई पॅगोडा असे नाव आहे. याचा वापर सेल्फी पॉईंट म्हणून केला जातो.
तिथून एक वळण घेऊन थोडे पुढे गेल्यावर आपण काही वेळातच टेकडीच्या माथ्यावर येतो. उजव्या बाजूस नुकतेच निर्माण झालेले कै. सदू शिंदे स्टेडियम दिसून येते व बाजूलाच एक मोठे उद्यान तयार केले गेले आहे. येथून पुढे असलेल्या रस्त्याने सरळ गेल्यास तळजाई देवीचे मंदिर दिसून येते.
डाव्या बाजूस पार्किंग ची व्यवस्था असून उजवीकडून वर चढल्यास तळजाई मंदिर दिसून येते. या ठिकाणी असलेल्या प्रांगणात खूप मोठी खाऊ गल्ली आणि लहान मुलांसाठी मनोरंजन पार्क उभे राहिले आहे.
तळजाई देवी हे जागृत देवस्थान असून तिच्या बद्दल जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार ब्रिटिशकाळात पुण्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेल्या रावबहादूर ठुबे यांच्या स्वप्नात एकदा देवीने दृष्टांत दिला व म्हणाली की मी टेकडीवरील तळ्यात आहे. तेथून काढून तू माझी स्थापना तळ्याजवळ कर. त्यानुसार रावबहादूर ठुबे यांनी तळ्यातून देवीची मूर्ती तळ्याबाहेरच एका मंदिरात केली. रावबहादूर ठुबे यांना मुळात तळ्यात पद्मावती, तळजाई व तुळजाभवानी यांच्या मूर्ती सापडल्या कालांतराने गणपत विठोबा थोरात यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तळजाई देवी मंदिरामागे दाट जंगल असून ते संरक्षित वने या प्रकारात असल्याने सुरक्षित आहे. सामान्य नागरिकांना जॉगिंग साठी येथे प्रवेश असतो त्यामुळे सकाळी व सायंकाळी अनेक पुणेकर तळजाई टेकडीवर क्रीडाप्रकार करण्यास येत असतात. तळजाई टेकडीवर सध्या जिथे क्रीडांगण आहे तिथेच टेकडीच्या एका टोकास रावबहादूर ठुबे यांचा ब्रिटिशकालीन बांधणीचा बंगला होता. काही ब्रिटिश अधिकारी या बंगल्यात भाड्याने राहत असल्याचा उल्लेख सुद्धा मिळतो. आज या वाड्याची पुरती दुर्दशा झाली असून अनेक दंतकथांचे मळभ या वाड्याभोवताली निर्माण झाले आहे.
आपली व्याप्ती व सोबतीस हिरवा निसर्ग यामुळे तळजाई टेकडी की पुण्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करणारे फुफ्फुस आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.