मणिकापट्टण - दही विकणारीचे गाव

पुरीच्या जवळ असलेल्या चिलिका सरोवराजवळ एक गाव आहे. त्याचे नाव मणिकापट्टण. या गावाचे नाव आणि तिथे मिळणारे दही याच्याशी एक सुंदर कथा जोडलेली आहे. आणि ती कथा अगदी जगन्नाथाच्या रथयात्रेशी जाऊन मिळते.- आशुतोष बापट

मणिकापट्टण - दही विकणारीचे गाव

लोककथा, दंतकथा, आख्यायिका यांना आपल्या देशात तोटा नाही. कुठल्याही प्रांती गेले तरी तिथल्या देवतेशी, त्या स्थानाशी, त्या गावाच्या नावाशी एखादी सुंदर आख्यायिका जोडलेली असतेच असते. त्या कथनामुळे त्या विशिष्ट स्थानाला खास महत्त्व प्राप्त होते. कुठलीही लोककथा ही काही निव्वळ सांगोवांगी आलेली गोष्ट नसून कधी कधी त्यात इतिहासाचा एखादा धागासुद्धा जोडला गेलेला असतो. तो प्रसंग फुलवण्यासाठी एखादी छान आख्यायिका तयार झालेली असते.

ओडिशामधील कोणार्कचे सूर्यमंदिर, पुरीचा जगन्नाथ यांच्याशी अक्षरशः हजारो कथा निगडीत आहेत. पुरीची रथयात्रा, तिथला नवकलेवर विधी आणि खुद्द देव जगन्नाथाशी निगडीत असलेल्या आख्यायिका फार सुंदर आहेत. पुरीच्या जवळ असलेल्या चिलिका सरोवराजवळ एक गाव आहे. त्याचे नाव मणिकापट्टण. या गावाचे नाव आणि तिथे मिळणारे दही याच्याशी एक सुंदर कथा जोडलेली आहे. आणि ती कथा अगदी जगन्नाथाच्या रथयात्रेशी जाऊन मिळते.

जगन्नाथाची रथयात्रा सुरु करण्याचा मान पुरीच्या गजपती राजाचा असतो. पुरीचा हा राजा सर्वप्रथम रथासमोरची आणि आजूबाजूची जागा स्वतः सोन्याच्या झाडूने साफ करतो, त्यानंतर त्या रथांवर चंदनाचा शिडकावा करतो आणि मग ही रथयात्रा सुरु होते. परंपरेनुसार पुरीचे राजघराणे हे श्रीजगन्नाथाचे प्रथम सेवक मानले गेलेले आहेत. त्यामुळे ही राजघराण्यातील मंडळी रथयात्रेच्या वेळी या रथांवर विराजमान होतात.

रथयात्रेच्या सुरुवातीला राजा हा रस्ता झाडून साफ करतो म्हणून दक्षिण भारतातील कांचीच्या राजाने ओडिशाच्या राजाची चांडाळ असे संबोधून हेटाळणी केली. ओडिशाचा राजा पुरुषोत्तम देव याच्या कानावर ही बातमी गेली. तो संतापला आणि त्याने कांचीवर स्वारी करायचे ठरवले. नेहमीप्रमाणे जगन्नाथाचे आशीर्वाद घेऊन राजा पुरुषोत्तमदेव मोठे सैन्य घेऊन तेव्हाची ओडिशाची राजधानी कटकहून निघाला. चिलिका सरोवरापाशी तो येताच मणिका नावाची एक वृद्ध दही विकणारी स्त्री त्याला भेटली. त्या स्त्रीने राजाला रत्नजडीत सोन्याची अंगठी दिली आणि राजाला म्हणाली “हे राजन तुझे दोन शिपाई काळ्या आणि पांढऱ्या घोड्यावर बसून मगाशी इथे आले होते. त्यांना खूप तहान लागली होती म्हणून त्यांनी माझ्याकडचे दही घेतले आणि मला ही अंगठी दिली. त्यांनी सांगितले की राजा पुरुषोत्तमदेव थोड्याच वेळात इथे येईल, त्यावेळी त्याला ही अंगठी दे आणि तुझे पैसे त्याच्याकडून घे. त्याप्रमाणे राजन ही अंगठी घ्या आणि माझे दह्याचे पैसे मला द्या.” ती अंगठी खुद्द जगन्नाथाची असल्याची खूण राजाला पटली आणि मग सर्व गोष्टी त्याच्या चटकन ध्यानात आल्या. त्याला जाणवले की ते दोन सैनिक म्हणजेच देव जगन्नाथ आणि बलराम. हे दोघे युद्धात आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठीच कांचीकडे गेलेले आहेत. त्याने मनोमन जगन्नाथाचे स्मरण केले, देवाचे आभार मानले. या घटनेच्या स्मरणार्थ राजा पुरुषोत्तमदेव याने चिलिका सरोवर इथे एक गाव वसवले आणि त्याला नाव दिले मणिकापट्टण. मणिका हे त्या दही विकणाऱ्या वृद्ध स्त्रीचे नाव होते. तिच्या आणि या प्रसंगाच्या आठवणीप्रित्यर्थ तेच नाव त्याने इथे वसवलेल्या नवीन गावाला दिले. आजदेखील मणिकापट्टण हे गाव तिथे मिळणाऱ्या उत्तम प्रतीच्या दह्यासाठी प्रसिद्ध आहे.

हा प्रसंग ओडिशामधील कलाकारांमध्येसुद्धा खूप लोकप्रिय आहे. रघुराजपूर इथल्या घरांवरील रंगीत चित्रे असोत किंवा ब्राँझ धातूच्या पट्टिका असोत, ओडिशामध्ये विविध ठिकाणी विविध कलेमधून या प्रसंगाचे चित्रण किंवा शिल्पांकन केलेले आजही बघायला मिळते. लोककथा, संस्कृती, परंपरा या अशा कलेतून जपलेल्या आपल्याला आजही ओडिशामध्ये बघायला मिळतात. ती कथा माहिती असेल तर या कथेचे असे कलेतील सादरीकरण बघताना आपला अनुभव अजून समृद्ध होतो.

- आशुतोष बापट