पंढरपूर येथील विठ्ठलाची उत्सवमूर्ती येथे स्थानापन्न आहे
भारताच्या पश्चिमेकडील गोवा हे एक चिमुकले राज्य. पण आज ते भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षणस्थान बनले आहे.
सिंधुदुर्ग सोडुन जेव्हा आपण गोव्यात प्रवेश करतो. तेव्हा लागणारे दुसरे रेल्वे स्थानक म्हणजे थिवीम, या थिवीम पासून ५ की. मी वर साखळी हे निसर्गरम्य व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथे जाण्यासाठी थिवीम पासून दर ५ मिनिटांनी खाजगी बसेस उपलब्ध आहेत.या गावाचे नाव साखळी असण्याचेही एक कारण म्हणजे, गावात भव्य व पुरातन अशा मंदीरांची एक साखळीच आहे. सांखळीतील पहिले आकर्षण आहे स्वातंत्र्यसेनानी राण्यांच्या व तसेच याच घराण्यातले माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या घराशेजारी असलेले विठ्ठलाचे एक पुरातन मंदीर, मुळचे राजपुत व मध्ययुगात गोवा येथे स्थायिक झालेल्या राणे यांचे हे कुलदैवत, या मंदीराचे प्रांगण अतिशय भव्य आहे, आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. लाल माती व निळे आकाश हे यांच्या मधोमध या मंदीराचे दर्शन अवर्णनीय आहे.
अभ्यासक अनिरुद्ध बिडवे यांच्या मते, सांखळीच्या विठ्ठल मंदीरातली ही मुर्ती म्हणजे मुळची पंढरपुर येथील उत्सवमुर्ती, उत्सवमुर्ती म्हणजे मुळ मुर्तीची हानी न होण्याकरीता तिच्या ऐवजी तिच्या सारखीच दिसणारी व फक्त उत्सवात वापरली जाणारी दुसरी मुर्ती. फार पुर्वी राण्यांच्या एका पुर्वजाने साक्षात विठोबाचा दृष्टांत झाला म्हणुन पंढरपुरास जाऊन ही उत्सवमुर्ती गोव्यास आणली व तिथेच तिची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून मुळ पंढरपुरात उत्सवमुर्ती नाही. कालांतराने या राण्याचे पुर्वज तिथेच स्थायिक झाले व गोव्याचे राणे झाले, विट्ठलाचे मुळ मंदीर सन १४८८ साली बांधण्यात आले मात्र सध्या दिसून येणारे मंदीर हे सन १९४२ साली ग्व्हालेरच्या राजमाता गजराराजे यांनि बांधले व या मंदीरावर ग्व्हाल्हेर वास्तुशैलीची छाप आहे. या गजराराजे म्हणजे राणे घराण्याच्या कन्या व सध्याचे शिंदे घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य यांच्या पणजी. गोव्याच्या राण्यांची पोर्तुगिजांच्या जुलूमी राजवटीविरोधात केलेलि अनेक बंडे प्रसिद्ध आहेत.
येथून पुढे असणारे, दत्त मंदीर गोव्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदीर कसे असावे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या मंदिरातील काही क्षणच मनातील सर्व क्षीण घालवणारे ठरतात. अतिशय शांतता असणार्या या मंदिरातील दत्तमुर्तीही अतिशय सजीव आहे. येथुन थोडे पुढे लागते राधा- कृष्ण मंदीर, या मंदिराचे स्वरुप हे दत्त मंदीरासारखेच आहे.
साखळी पासून एक कि. मी. वर असलेल्या अरवेलम या छोट्यास्या गावात काजू, कोकम, फणस व आंब्याच्या जंगलात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दिसते अरवलेम येथील पांडवलेणी, हा परिसर पूर्वी दंडकारण्य परिसराचाच एक भाग म्हणुन ओळखला जायचा. अतिशय निबीड असलेल्या या अरण्यात निवासासाठी म्हणून पाडंवांनी ब-याच ठीकाणी काही लेण्या खोदल्या असाव्यात असा स्थानिक प्रवाद आहे , सहापैकी पाच खोल्या मोठ्या असून त्यांत प्रत्येकी एक शिवलींग आहे व सहावी खोली छोटी असून ती द्रौपदीची खोली म्हणून ओळखली जाते, जांभ्या दगडात कोरलेल्या या लेण्या जणू पाच पांडवांचे व द्रौपदीचे प्रतिनिधीत्व करतात.
संधोधनाअंती मात्र या लेण्या ७ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते व या लेण्यांमध्ये ब्राम्ही लिपीतील काही शिलालेखसांखळी - एक धार्मिक पर्यटनस्थळ असून ते शंकर व सुर्याचे प्रतिक आहेत. येथून पाच मिनीटे पुढे चालत गेल्यावर लागते पुरातन रुद्रेश्रर मंदीर, महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते. मंदीराच्या परीसरात आर्य नामक जमात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिराच्या बाजुला डोंगरातील पाय-या चढून गेल्यावर दिसतो येथील प्रसिध्द अरवेलम धबधबा ! अतिशय नयनरम्य असा हा जलप्रपात अगदी मे मध्येही अखंडपणे वाहत असतो. जांभा खडकास मधोमध खड्डा पाडून खाली कोसळणा-या या धबधब्या जवळ जाण्यासाठी पाय-या आहेत व परीसरात बसण्यासाठी आसनांची सोयसुध्दा करण्यात आलेली आहे. नैसर्गिक सौंदर्यांचा येथे पर्यटन विकासासाठी पुरेपुर वापर करून घेतला आहे. साखळी गावातील नागरीकांनी आपली संस्कृती आजही जपली आहे. पुर्वेकडचा हा गोवा आपल्या कोकणाशी तंतोतत साम्य दाखवतो. अगदी नवख्या छायाचित्रकाराने देखील फोटो काढला तरी त्यास पहीले बक्षीस मिळेल असा हा परीसर मे महिन्याच्या सुट्टीतही खरोखर पाहाण्यासारखा आहे.
रस्त्यावर पडलेले कोकम टिपत ती खात फिरताना भर उन्हाळ्यात सुध्दा हिरवेगार असे डोंगर पाहताना कसे वाटते हे शब्दात खरेच सांगता येण्यासारखे नाही. त्यासाठी प्रत्यक्षात साखळी येथे जायला हवे. हा परिसर पाहून माणूस परततो ते परत कधी यायचे हा विचार करतच!