पानिपतचा बदला आणि मराठ्यांचे दिल्लीवर वर्चस्व

दिल्लीचे तख्त राखल्यावर मराठ्यांनी रोहिल्यांवर मोहीम काढली. १७७२ साली मराठ्यांनी जाबीतखानावर हल्ला केला तेव्हा त्याने प्रथम शुक्रतालचा आश्रय घेतला.

पानिपतचा बदला आणि मराठ्यांचे दिल्लीवर वर्चस्व
पानिपतचा बदला आणि मराठ्यांचे दिल्लीवर वर्चस्व

 पानिपतचे युद्ध म्हणजे मराठ्यांच्या हृदयातील भळभळती जखम मात्र १७७१ साली थेट दिल्लीवर कब्जा करून मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा बदला घेतला.

२७ डिसेंबर १७७० साली मोगल बादशहाने मराठ्यांची मदत घेऊन दिल्लीत स्वतःस पुनर्प्रस्थापित केले. या बदल्यात बादशहाने मराठ्यांना दहा लाख रुपये खर्चास द्यावे, मराठ्यांनी राजास दिल्लीच्या तख्तावर बसवावे आणि दिल्लीचा कारभार मराठ्यांनी पाहून मराठ्यांनी धोरणे ठरवून बादशाहने संमती द्यावी. 

पानिपतच्या युद्धापूर्वी मराठ्यांकडे ज्या ज्या जहागिरी होत्या त्या पुन्हा सुरु कराव्यात, चौथाईची बाकी द्यावी, बादशहाच्या शत्रूंचे मराठ्यांनी पारिपत्य करावे आणि पुढील सर्व मोहिमांमध्ये मिळालेली लूट दोघांनी समसमान वाटून घ्यावी.

करार झाल्यानंतर बादशाह प्रयागहून दुआवात फारुकाबाद येथे आला. १७७१ फेब्रुवारी मध्ये बादशाह दिल्लीजवळ पातपरंग येथे दाखल झाला. महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण हे मराठयांचे प्रतिनिधी होते. ९ फेब्रुवारीस मराठ्यांनी दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि जाबीतखानास पळवून लावले. 

नोंव्हेबर १७७२ मध्ये महादजी शिंदे यांनी मराठ्यांच्या वतीने दिल्लीच्या तख्तावर बादशहाची स्थापना केली. 

दिल्लीचे तख्त राखल्यावर मराठ्यांनी रोहिल्यांवर मोहीम काढली. १७७२ साली मराठ्यांनी जाबीतखानावर हल्ला केला तेव्हा त्याने प्रथम शुक्रतालचा आश्रय घेतला. तेथून मराठ्यांनी त्याला घालवून लावले तेव्हा त्याने चंडीघाट मार्गे गंगा गाठली. या ठिकाणी मराठ्यांनी त्यास गाठून त्याच्या सैन्यावर तोफांचा मारा करून त्याच्या सैन्याची धूळधाण केली.

यानंतर पराभूत जाबीतखान नाजीबाबाद येथे गेला तेथे सुद्धा मराठ्यांनी आक्रमण करून नाजीबाबाद ताब्यात घेतले आणि नजीबउद्दौला याची कबर उध्वस्त केली. मराठ्यांनी नंतर फत्तरगड येथे वेढा घातला आणि तो किल्ला घेऊन नजीबउद्दौला याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांची लुटलेली संपत्ती याच किल्ल्यातून मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतली.

फत्तरगड येथे जाबीतखानाची बायका मुले होती मात्र मराठ्यांनी त्यांस सुखरूप दुसरीकडे पोहोचवले आणि नंतर घोसगड ताब्यात घेऊन जाबीतखानाची पूर्ण जहागिरी ताब्यात घेतली आणि सर्व रोहीलखंड भर मराठ्यांची सेना पसरली. मराठ्यांनी यानंतर संपूर्ण रोहीलखंड उध्वस्त करून पानिपतच्या युद्धाचा खऱ्या अर्थी बदला घेतला. 

पानिपतचा बदला घेऊन मराठ्यांनी दिल्लीवरही वर्चस्व निर्माण केल्याने दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही म्हण खऱ्या अर्थी रूढ झाली.