तोकापालचा प्रसिद्ध आठवडा बाजार

जगदलपूरवरून दंतेवाड्याला जाताना वाटेत ‘तोकापाल’ नावाचं अगदी छोटसं गाव लागतं. या गावात आठवडी बाजार भरला होता.

तोकापालचा प्रसिद्ध आठवडा बाजार
तोकापालचा प्रसिद्ध आठवडा बाजार

निसर्गसौंदर्य आणि बहरलेली आदिवासी संस्कृती यांनी छत्तीसगड नटला आहे. त्यातही बस्तर प्रांत म्हणजे या सगळ्याचा मुकुटमणी म्हणायला हवा. गर्द हिरवाईने नटलेला हा प्रदेश तेवढाच समृद्ध आहे तो आदिवासी कला आणि संस्कृतीने. यावेळी बस्तर प्रांत हिंडताना आदिवासी संस्कृतीचा निराळा पैलू बघायला मिळाला. जगदलपूरवरून दंतेवाड्याला जाताना वाटेत ‘तोकापाल’ नावाचं अगदी छोटसं गाव लागतं. या गावात आठवडी बाजार भरला होता. बाजार म्हणजे अनेकविध वस्तू, विविध रंग, आणि निरनिराळी माणसे यांनी भरलेली जणू जत्राच असते. मुद्दाम तिथे थांबून यावेळी सगळेजण बाजारात गेलो.

महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाकडचा आठवडी बाजार असतो तसाच हा सुद्धा बाजार होता. मात्र इथे आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू बघायला मिळाले. मुख्य म्हणजे त्यांच्या भाज्या, त्यांची वस्त्रे, आणि निरनिराळ्या आदिवासी जमातींचे लोक यांचा एक मेळाच तिथे भरला होता. नेहमीच्या भाज्या तर तिथे विकायला होत्याच त्याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची, आदिवासी वापरतात त्या वस्तूंची, आणि मोहाच्या फुलांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती. मोहाची वाळलेली फुले, आदिवासी देवतांना अर्पण होणारी वस्त्रे. चवरी सारख्या वस्तू, कवड्यांनी मढवलेल्या टोप्या, सुट्ट्या कवड्या, मध, हळद, आलं, लसूण, विड्याची पानं, सुके मासे, बांगड्या, निरनिराळी खेळणी, कपडे, बांबूच्या पट्ट्यांपासून केलेल्या टोपल्या, रोवळ्या, मोठमोठे लाल भोपळे, यापासून तयार केलेल्या वस्तूंना ‘तुंबा’ म्हणतात, अशा असंख्य वस्तूंनी तो बाजार सजला होता. गिऱ्हाईक आणि विकणाऱ्या बायका यांची दरावरून चाललेली घासाघीस असा सगळा कलकलाट इथेसुद्धा होता.

विक्रेत्यांमध्ये सर्वाधिक स्त्रियाच दिसत होत्या. पुरुष बहुदा मोहाच्या मोहात तल्लीन झालेले असावेत. अगदी मणिपूर, कंबोडिया इथल्या बाजारातसुद्धा सर्वाधिक विक्रेत्या या स्त्रियाच बघितल्या आहेत. या सगळ्या वस्तूंसोबत एक निराळा पदार्थ जो कधी दिसत नाही तो इथे दिसला, आणि तो म्हणजे ‘लाल मुंग्या !’ झाडाच्या पानाचा मोठा द्रोण केला होता आणि त्यात लाल मुंग्या खच्चून भरल्या होत्या. बस्तरचे आदिवासी लाल मुंग्या मोठ्या आवडीने खातात. त्या नुसत्यासुद्धा खातात आणि त्याची चटणी तर या प्रदेशात फार लोकप्रिय आहे. यात प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणावर असते म्हणे.. असेलही...पण ही चीज पहिल्यांदाच बघितली. याच बरोबरीने बस्तरची कला म्हणून प्रसिद्ध असलेल्या धातूच्या वस्तू, मूर्ती, घंटा हेसुद्धा बाजारात विकायला ठेवले होते. आजूबाजूच्या गावातून लोक वडाप करून बाजाराला आले होते. सगळ्यांची खरेदी झाल्यावर आपापल्या वडापमध्ये बसून मंडळी आपापल्या पाड्यांवर परतत होती. आजूबाजूला हिरवी शेतं आणि त्याच्याच मध्ये गावात भरलेला हा बाजार फारच सुंदर होता.

कोंबड्यांची झुंज इथे बाजारात बघायला मिळते. ती काही दिसली नाही. कोंबडे मात्र मोठ्या संख्येने विकायला होते. रंगीबेरंगी कपडे, डोक्यावर विशिष्ट रीतीने बांधलेली फडकी, आणि इथल्या स्त्रियांच्या दोन्ही हातांवर क्वचित काहींच्या कपाळावर गोंदून काढलेली नक्षी हे सगळे दृश्य फार सुंदर होते. बस्तरच्या प्रत्येक आदिवासी जमातीची कपड्यांची आणि गोंदण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यानुसार त्यांची जमात ओळखली जाते. इथे बाजारात सगळ्या जमातींचा मेळावा भरलेला होता. बस्तरच्या या सांस्कृतिक ठेव्याची अकस्मात भेट झाली. बरोबरच्या मंडळींनी जमेल तशी खरेदी करून घेतली. बाजाराचे आकर्षण कुणाला नसते ? आणि त्यातून बस्तरच्या अशा दूरवरच्या एका छोट्याशा आदिवासी बाजारात जाण्याची संधी मिळाली तर मग काय विचारता ! बाजारात खरेदी दुय्यम होती, पण तो बाजार अनुभवणे, तिथल्या लोकांच्यात मिसळणे, त्यांची न समजणारी भाषा ऐकणे आणि त्या आदिवासी संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे हेच खूप मोठे समाधान तोकापालच्या बाजारात सगळ्यांना मिळाले. अकस्मात झालेली ही आदिवासी संस्कृतीची ओळख कायम लक्षात राहणारी ठरली.

- आशुतोष बापट