शिवरायांच्या भवानी तलवारीचा खरा इतिहास | Bhavani Sword History in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे समस्त महाराष्ट्रीयांचे श्रद्धास्थान आहेत त्याचप्रमाणे महाराजांशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी उदा. किल्ले, ऐतिहासिक साधने, शस्त्रास्त्रे यांच्यासोबत सुद्धा सर्वांची भावनिक नाळ जुडली आहे. ज्या तलवारीच्या योगे महाराजांनी अनेक मोहीमांत अतुलनिय पराक्रम गाजवले अशी महाराजांची लाडकी तलवार 'भवानी' हिचा अर्थात या सर्वांमध्ये अग्रक्रम लागतो.

शिवरायांच्या भवानी तलवारीचा खरा इतिहास | Bhavani Sword History in Marathi

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

१६५६ साली मुहम्मद आदिलशाचा मृत्यू झाला व त्याची पत्नी बडी बेगम हिने मुहम्मद आदिलशहाच्या अली आदिलशाह या एका अनौरस पुत्रास गादीवर बसून राज्यकारभार स्वत:च्या हाती घेतला. मोहम्मद आदिलशहाचा मृत्यू, सुभेदार मुल्ला अहमदची अनुपस्थिती अशी अनुकूल परिस्थिती पाहून १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण सुभ्यावर मोहिमा सुरु केल्या व एक एक करून कल्याण सुभ्यातील मोठा प्रदेश स्वराज्यात आणला, कल्याण सुभ्यातील विजयामुळे आदिलशाही जोखडातून मुक्त झालेल्या कल्याण सुभ्यातील जनतेकडे पाहून सिद्दीच्या ताब्यात असलेल्या सुभ्यातील जनताही स्वराज्यात सामील होण्यास आतुर झाली आणि सिद्दीच्या अनेक सरदारांनी शिवाजी महाराजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. 

सिद्दीच्या मुलखात तळ गड व घोसाळगड हे महत्वाचे किल्ले होते व या किल्ल्यांची जबाबदारी सोंडवळकर आणि कोंडवळकर या दोन सरदारांकडे होती. कल्याण सुभ्यातील जनता स्वराज्यात सामील झाल्याने शिवाजी महाराजांची सत्ता येथेही व्हावी, या इच्छेने त्यांनी महाराजांशी संपर्क केला आणि सांगितले की, आम्हास हबशांच्या ताबेदारीचा अत्यंत वीट आला आहे. तो आम्हास अनेक प्रकारे छळतो. आपली स्वारी कोकणात यावी म्हणजे आम्ही तळा व घोसाळा हे किल्ले स्वतःहून आपल्या स्वाधीन करतो. हे किल्ले हाती आल्यास आपणास या मुलुखातील पुष्कळ प्रांत साधता येणे शक्य होईल व यवनांची ताबेदारी जाऊन आम्हाला आपल्या सेवेची संधी मिळेल. 

सोंडवळकर आणि कोंडवळकर या दोन सरदारांनी जी विनंती महाराजांना केली ती ऐकून व सिद्दीच्या मूलुखातील प्रजेची स्वराज्यात सामील होण्याची इच्छा व अनुकूलता पाहून महाराजांनी या मुलुखात मोहीम काढली व तळगड आणि घोसाळगड हे किल्ले किल्ले स्वराज्यात घेतले यावेळी त्यांनी अवचितगड आणि सुरगड हे दोन महत्वाचे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले आणि बघता बघता या किल्ल्यांच्या आसमंतातील एक विस्तीर्ण मुलुख स्वराज्यात आला. 

अशाप्रकारे सिद्दीच्या सुभ्यातील एक मोठा भाग महाराजांच्या ताब्यात आला असला तरी त्यावर कायमचे नियंत्रण बसवणे गरजेचे होते कारण सिद्दी संधी पाहून पुन्हा एकदा हा भाग परत मिळवण्याचा प्रयत्न नकी करील हे महाराज ओळखून होते त्यामुळे त्यांनी बिरवाडी येथे एक चांगली मेट पाहून एक डोंगरी किल्ला बांधला. जंजिरेकर सिद्दीसाठी ही धोक्याची घंटा होती कारण कल्याण सुभा जिंकल्यावर शिवाजी महाराज आपले लक्ष साहजिकच आपल्या भागावर चळवणार अशी भीती त्यास पूर्वीपासून होती आणि तळगड घोसाळगड हे सिद्दीच्या मुलुखातील अत्यंत महत्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणल्याने सिद्दीची भीती खरी ठरली. 

सिद्दीच्या सुभ्यात जे विविध उपविभाग होते त्यापैकी गोवेले नामक विभागावर सावंत घराण्याचा अमल होता. सावंत हा सामंत या पदवाचक आडनावाचा अपभ्रंश असून या आडनावाची अनेक घराणी कोकणपट्यात विपुल संख्येने पाहावयास मिळतात. गोवेले विभागाचे त्या काळातील प्रमुख काय सावंत हे होते व त्यांच्याकडे सरदारपद होते. महाराजांनी तळगड व घोसाळगड हे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा ते परत मिळवण्याची जबाबदारी आदिलशाही सुभेदार सिद्दीने काय सावंत यांना दिली त्यानुसार काय सावंत यांनी आपला जमाव घेऊन तळगड घोसाळगड येथे हल्ला केला व तो मुलूख पुन्हा आदिलशाही राज्यात घेतला. 

शिवाजी महाराजांना ही बातमी मिळाल्यावर त्यांनी बाजी पासलकर या मोसेखोरे मावळच्या देशमुखांसोबत २,००० मावळे देऊन काय सावंत यांच्यावर पाठवले. बाजी पासलकर तळगड व घोसाळगड परिसरावर चालून आल्याची खबर काय सावंत यांना मिळताच त्यांनी आपले हजार स्वार घेतले व उभय सैन्याची गाठ तळगड-घोसाळगडाच्या परिसरात पडली व भयंकर रणसंग्राम झाला. दोन्ही बाजूनी प्रचंड जीवितहानी झाली. दोन्ही बाजूच्या सैन्यात युद्ध सुरू असताना बाजी पासलकर व काय सावंत हे दोन बलाढ्य सेनानी समोरासमोर आले आणि एकमेकांवर तुटून पडले. यावेळी दोघांचे जे द्वंद्व युद्ध झाले ते पाहून दोन्ही बाजूंकडील सैन्य काहीकाळ स्तब्ध झाले. ही लढाई बराच काळ सुरू होती. अंगावर २५-२५ वार होऊनही कुणीही माघार घेण्यास तयार नव्हता. दीर्घकाळ सुरू असलेल्या या लढाईत अखेरीस बाजी पासलकर आणि काय सावंत यांनी एकमेकांवर शेवटचा प्रहार केला आणि दोघेही रणांगणात कोसळले. 

बाजी पासलकर धारातीर्थी पडल्याचे दुःख काही काळ विसरून त्यांचे सैन्य जोमाने लढले आणि त्यांनी ह्य मुलुख पुन्हा एकदा स्वराज्यात आणला. युद्धसमाप्ती झाल्यावर दोन्ही बाजूच्या सैन्याने आपल्या सरदारांची पार्थिवे उचलली व आपापल्या तळाकडे परतून त्यांच्यावर यथोचित अत्यंसंस्कार केले. बाजी पासलकर धारातीर्थी पडल्याचे वर्तमान महाराजांना समजले तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झाले आणि आपला जिवलग व इमानी मित्र सिद्दीविरोधातील युद्धामुळे आपण गमावला हे मनात येऊन त्यांनी सिद्दीला धडा शिकवण्याचा निर्धार केला.

या घटनेनंतर काही काळ सरल्यावर शिवाजी महाराजांचा या प्रांतात जाण्याचा योग आला. याचे कारण असे झाले की, त्या दरम्यान महाराजांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे त्यांनी दक्षिण काशी म्हणून प्रख्यात असलेल्या हरिहरेश्वर येथे जाऊन व्यथेचा परिहार करावयाचा विचार केला व या कारणास्तव महाराज काही काळ हरिहरेश्वर येथे वास्तव्यास होते. गोवेले या गावापासून हरिहरेश्वर हे अंतर सध्या ४६ किलोमीटर आहे. हरिहरेश्वर येथील वास्तव्याच्या काळात महाराजांना गोवेलेच्या सावंत घराण्याकडे असलेल्या एका ३०० होन किमतीच्या नामी धोप (फिरंग) तलवारीची माहिती त्यांच्या माणसांकरवी मिळाली. ही तलवार विलक्षण असून जर ती आपणाकडे असेल तर खूपच उत्तम होईल, असा सल्ला महाराजांना त्यांच्या माणसांनी दिला. मात्र, छत्रपती महाराजांनी या विनंतीस नम्रपणे नकार दिला व म्हणाले, खऱ्या मर्द पुरुषाने कोणा संभावित मनुष्यापाशी एखादी वस्तू असली तर तिचा अभिलाष धरू नये, स्यमन्तक मण्याची गोष्ट पुराणांतरी आहे ती तुमच्या लक्षात असेलच, त्यामुळे उपस्थित झालेले वैर भगवंतांनाच निभावता आले. आपण मानवांनी असल्या क्षुलक गोष्टींसाठी वैर माजवू नये. शिवरायांचा हा निःस्पृहपणा पाहून सर्वच थक्क झाले मात्र ही बातमी पाहता पाहता गोवेले येथे जाऊन पोहोचली. 

काय सावंत यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पदभार त्यांचे पुत्र माल सावंत सांभाळत होते. महाराज हरिहरेश्वर येथे आले आहेत ही बातमी माल सायंत यांना त्यांच्या माणसांकरवी मिळाली. या वेळी माल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक झाली व अनेक जाणत्यांनी मान सावंत यांना सल्ला दिला की, छत्रपती शिवाजी महाराज सध्या हरिहरेश्वर येथेच आहेत तेव्हा त्यांच्यासारख्या प्रतापी पुरुषाबरोबर सख्य करण्याची नामी संधी गमावू नका. त्यांची भेट घेऊन त्यांस तुमच्याकडील तलवार नजर करा आणि त्यांची मर्जी संपादा. 

माल सावंत यांनाही शिवाजी महाराजांशी सख्य करण्याचा सल्ला पटला व त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि ती विलक्षण धोप (फिरंग) तलवार त्यांना प्रदान केली. माल सावंत यांनी ही तलवार महाराजांना नजराणा म्हणून दिली होती मात्र, ही विलक्षण तलवार पाहून महाराज अत्यंत प्रसन्न झाले व या तलवारीचे जे वर्णन ऐकले होते ते खरेच होते अशी त्यांची खात्री झाली त्यामुळे त्यांनी स्वत:हून या तलवारीची मूळ किंमत म्हणजे ३०० होन माल सावंत यांना दिली व पोषाख आणि हजारी मनसबदारी देऊन माल सावंत यांना स्वराज्याच्या कार्यात सामील करून घेतले. या प्रसंगानंतर माल सावंत व त्यांच्या मुलखातील लोक स्वराज्याचे पाईक झाले. शिवरायांनी या तलवारीचे भवानी असे नामकरण केले व तिला आपल्या शस्त्रागारात प्रमुख स्थान दिले. 

संदर्भ - इतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - AmazonFlipkart । Notion Press