कोकणातले गणपती - एक वेगळा अनुभव

गणपती उत्सव हा काही फक्त माणसांसाठी उत्साहाचा असतो असं नाही तर निसर्ग सुद्धा या दिवसात एकदम जोरात असतो. भरपूर हिरवाई, असंख्य फुलं, आणि सर्वत्र फक्त उत्साह आणि उत्साह भरलेला जाणवतो.- आशुतोष बापट

कोकणातले गणपती - एक वेगळा अनुभव
कोकणातले गणपती

गणपती उत्सव सगळीकडे मोठ्या दणक्यात साजरा होत असला तरी कोकणातले गणपतींचे दिवस हे जगात कुठेही दुसरीकडे अनुभवता येणार नाहीत. भले हा अभिमान वाटेल, गर्व वाटेल, काहीही वाटू देत पण कोकणात जर गणपतीच्या दिवसात राहायची संधी मिळाली तर आयुष्य १० वर्षांनी तरी नक्की वाढतं.

मधु मंगेश कर्णिक याबद्दल म्हणतात की, “आमच्या मुलखात गणपतीचे दिवस म्हणजे मंतरलेले दिवस, या दिवसांना एक वेगळे रूप असते. या दिवसांना सुवास असतो; नाद असतो, रंग असतो. मळ्यामळ्यांतून हळवी भाते पिकू लागतात त्यांच्या केसरांचा सुगंध दशदिशांत भरून राहिलेला असतो. रात्र होताच टाळमृदुंगाच्या गजरात 'अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र' सुरू होते नि सारी रात्र त्या नादात डोलत राहते. हिरवीगार शेते, हिरवेपिवळे माळ, स्फटिकासारखे प्रवाह, लाल-पांढरी आणि निळी-पिवळी फुले, यांनी वातावरण गजबजून जाते, मग हलकेच 'गणेशचतुर्थी'चा दिवस उजाडतो, 'सुखकर्त्या' मोरयाच्या आगमना बरोबर सगळीकडे जादू पसरू लागते आणि दिवस 'मंतरलेले' होतात. माणसांना भूल पडते आणि त्यांना भुकेचा विसर पडतो. माणसे एका तंद्रीतून वावरू लागतात. आरत्या आणि भजने, अभंग आणि गवळणी, टाळ आणि मृदुंग, आवाज आणि आलाप याशिवाय त्यांना काही सुचत नाही की समजत नाही.”

गणपती उत्सव हा काही फक्त माणसांसाठी उत्साहाचा असतो असं नाही तर निसर्ग सुद्धा या दिवसात एकदम जोरात असतो. भरपूर हिरवाई, असंख्य फुलं, आणि सर्वत्र फक्त उत्साह आणि उत्साह भरलेला जाणवतो. सगळ्या जगातून कोकणी मंडळी या दिवसात गावी आलेली.... घरीदारी नुसती धमाल.... गणपतीची सजावट..मग ती मंडपी सजवणे..गणपतीची पूजा...खिरापत...घरोघरी जाऊन दणक्यात केलेल्या आरत्या...गावात यष्टी जिथे थांबते तिथल्या हाटलात चाय चिवडा खाता खाता केलेल्या गजाली.... नातलगांच्या जुन्या घरी दिलेल्या भेटी...त्यांची ती चौसोपी घरे...नक्षीदार खिडक्या...सगळं सगळं वातावरण नुसतं आनंदाचं झालेलं असतंय. आमच्या गावी तर मोबाईलला अजिबात रेंज नाही त्यामुळे ते एकदा घरी गेल्यावर बंद करून ठेऊन द्यायचे की गाव उंडारायला आपण मोकळे. हिरवीगार भातशेती...माडाची झाडे...गावदेवीचे सुंदर देऊळ...त्या देवळात मारलेल्या गप्पा....शेजारच्याच गावी निर्मनुष्य रस्त्यावरून चालत जाणे...मधेच लाल परी येऊन जाणारी.... खरोखर स्वर्ग अनुभवायचा असेल तर गणपतीत कोकणात जावे....नातलग...सगे...सोयरे...यांच्या सोबत बाप्पाचे गुणगान करावे....वर्षभराची उर्जा घेऊन परत यावे.....एक वर्ष कसे सरते समजतच नाही....परत वेध लागतातच कोकणात जायचे......कोकणातले गणपतीचे दिवस हे अक्षरशः स्वर्गीय दिवस..... ते अनुभवण्याचे सुख ज्यांच्या नशिबी आहे त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून कोकणात जावे....गणपतीच्या दिवसात सगळे विसरून जावे....प्रचंड उर्जा आणि आनंद घेऊन घरी परतावे..!!!

- आशुतोष बापट