श्री भुवनेश्वरी देवी - भिलवडी
नरसोबावाडी, खिद्रापूर आणि औदुंबर इथे भटकंती करताना भिलवडीच्या भुवनेश्वरीदेवीबद्दल माहिती कळली आणि तिथे प्रत्यक्ष जायचा योग आला.
खरंतर भुवनेश्वरी देवी म्हटल्यावर सर्वप्रथम ओडिशाची देवी डोळ्यासमोर आली. महाराष्ट्रात अशी देवी असल्याचं माहिती नव्हतं, आणि ती सुद्धा सांगलीच्या इतकी जवळ असेल हे ही माहिती नव्हतं. नरसोबावाडी, खिद्रापूर आणि औदुंबर इथे भटकंती करताना भिलवडीच्या भुवनेश्वरीदेवीबद्दल माहिती कळली आणि तिथे प्रत्यक्ष जायचा योग आला. औदुंबर या श्रीदत्तस्थानाच्या बरोबर समोर कृष्णा नदीच्या काठावर वसली आहे देवी भुवनेश्वरी. इथे जायचा रस्ता भिलवडी गावातून जातो. देवीच्या मंदिरापर्यंत छान रस्ता आहे.
गुरव मंडळी या देवीचे पुजारी आहेत. श्री. मकरंद गुरव स्वतः भेटले. देवीचे मूळचे मंदिर बरेच जुने, पण जीर्णोद्धार झाल्यामुळे जे काही होते ते सगळे छान झालेले दिसते. देवळासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहेत. मंदिर प्रांगण अगदी प्रशस्त. नवीन बांधलेला सभामंडपसुद्धा अगदी औरसचौरस. काही पायऱ्या चढून आपण मुख्य सभामंडपात जातो. हा मंडप मात्र दगडी खांबांनी नटलेला. दगडी खांब, त्यावरच्या दगडी तुळया, त्या तोलून धरण्यासाठी असलेली ब्रॅकेट्स सगळं काम एकदम मजबूत आहे. बांधकाम चार पाचशे वर्षांचे वाटते. गाभाऱ्याच्या ललाटावर गणपती विराजमान. गाभाऱ्यात श्री भुवनेश्वरीची देखणी मूर्ती. देवीला सुंदर मखर केलेले. देवीच्या हातातली चक्र आणि शंख एवढीच आयुधे दिसतात. बाकी देवीची मूर्ती वस्त्राने आणि फुलांनी झाकलेली. ही मूर्ती महिषासुरमर्दिनीची आहे असे गुरव म्हणाले. मात्र तिचा कुठलाही साधा फोटो उपलब्ध नाही. पूजा करतानासुद्धा दार लावून पूजा करतात, त्यावेळी पण फोटो काढत नाहीत. देवीचे सोवळे ओवले कडक आहे.
ही देवी अनेकांची कुलदेवता आहे असे समजले. सांगली, जमखंडी, कर्नाटकातून इथून अनेक मंडळी आपल्या कुलादेवीला येतात. हे देवीस्थान औदुंबरइतके जुने आहे हे नक्की. यासंबंधीची एक सुंदर कथा गुरुचरित्रात आली आहे. त्यानुसार करवीर प्रांतीच्या कुणा विद्वान पंडितांचा मुलगा अत्यंत मंदमती निपजला. त्याचे मातापिता निवर्तले. त्यामुळे आपल्या आजोळी तो मुलगा वाढत होता. मौजिबंधन झाले तरी त्याला कुठलीही विद्या आत्मसात होईना. लोक त्याची अतिशय निंदा करू लागले. विद्येविना त्याचे जीवन असह्य झाले होते. शोकग्रस्त अवस्थेत, मनी वैराग्य धरून, तो प्राण त्यागण्यासाठी घर सोडून अरण्यात निघाला. फिरता फिरता तो भिलवडी स्थित श्रीभुवनेश्वरी देवीच्या अतिप्राचीन स्थानास आला. अन्नपाणी त्यागून तीन दिवस तो भुवनेश्वरी मंदिरात धरणे धरून बसला. देवीकडून त्याला कोणताही दृष्टांत झाला नाही त्यामुळे आक्रोशाने त्याने शस्त्र घेऊन आपली जीभ कापून देवीच्या चरणी वाहिली. आणि यापुढे माझी उपेक्षा केलीस तर माझे शिर तुझ्या चरण कमलावर वाहीन अशी प्रतिज्ञा केली, परिणामतः त्या रात्री देवीने त्यास दृष्टांस दिला व त्याला नदीच्या पलीकडे असलेल्या अवतार पुरुषास म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना शरण जाण्यास सांगितले.
देवीचे हे शब्द ऐकताच जागृत होऊन हर्षाने देहभान विसरून तो बालक त्वरीत कृष्णेच्या डोहात उडी घेऊन पोहत ऐलतीरावर आला. अत्यंत तेजःपुंज अशा स्वामींचे दर्शन होताच त्याचे मस्तक स्वामींच्या चरणी कोसळले. जगत्पालक जगदोध्दारक स्वामींनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवताच तात्काळ त्याची जिव्हा पूर्वव्रत झाली आणि तो पूर्णज्ञानी झाला. असे इथले स्थानमहात्म्य.
कृष्णेच्या काठावर विसावलेले हे निवांत स्थळ. इथली शांतता, साथीला संथ वाहणारी कृष्णा, समोरच्या काठावर वसलेले औदुंबर हा सगळाच परिसर अतिशय रम्य आहे. मनाला शांतता इथे नक्कीच लाभते. औदुंबरला असलेला नारायण स्वामी भक्त निवास तर कमालीचा सुंदर आहे. स्वच्छता, शांतता आणि पावित्र्य इथे आले की मनोमन जाणवते. सांगली परिसरात भटकंती करताना इथे मुक्काम करावा आणि अगदी एकीकडे सातारा औंध पासून दुसरीकडे नरसोबावाडी खिद्रापूरपर्यंतचा प्रदेश मनसोक्त हिंडावा.
- आशुतोष बापट