छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या कोकणातील गांगोलीचा एकदंत

गणपती ही अशी देवता आहे, जिचे पूजन आपण अनेक रूपांत करतो. अनादी काळापासून गणपती हा विविध स्वरूपांत पूजला जात आहे. गाणपत्य पंथात गणेश ही मुख्य देवता असल्याने त्याची लिंग स्वरूपातही प्रार्थना केली जाते.

छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या कोकणातील गांगोलीचा एकदंत
गांगोलीचा एकदंत

या स्वरूपास 'गणेशलिंग' असे म्हटले जाते. या प्रकारची गणेश लिंग दुर्मीळ आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात गांगोली हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. या गावात अशा प्रकारचे गणेशलिंग पाहावयास मिळते.

शिवलिंगाप्रमाणे गणेशाच्याही लिंगमुर्तीचे पूजन करण्याची प्रथा पूर्वी होती. या मूर्तीस गणेश लिंग अथवा गाणपत्य लिंग असे म्हटले जाते. या मध्ये काही स्वयंभू लिंगे सुद्धा आहेत व ती लिंगे महासिद्धिदायक असतात असे म्हटले जाते. गणेश लिंगास सहसा शेंदूर चढवलेला असतो व अशी लिंगे हि डोंगर,पर्वत, माळराने अथवा नदीकिनारी असतात. काश्मीर मध्ये या प्रकारची स्वयंभू गणेश लिंगे विपुल प्रमाणात आहेत. 

या गांगोली गावाचे आणखी एक महत्त्व म्हणजे, येथे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आहे. गांगोली गावातील नदीच्या काठावर असलेल्या वैजनाथ शिवमंदिराच्या सभागृहातील डाव्या बाजूच्या कोनाड्यात ही मूर्ती स्थानापन्न असून, मूर्तीस लाल रंगाचा लेप देण्यात आला आहे. मूळ मूर्ती ही कुठल्या पाषाणात घडविली आहे, हे सध्या समजू शकत नाही. मात्र, गणेश लिंगाच्या निर्मितीसाठी उपयुक्त असा पाषाण हा लाल रंगाचाच असावा, असे सुचवले गेले आहे. सदर गणेश मूर्ती ही चतुर्भुज असून, एकदंत आहे. एका चौकोनी योनीपीठावर हिची स्थापना करण्यात आली असून, योनीपीठावर फुलांच्या सदृश नक्षीकाम केल्यासारखे आढळते. या मूर्तीची स्थापना कुठल्या काळात झाली असावी, हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, गांगोली गावाचे मराठेशाहीतील महत्त्व पाहता हिचा निर्मितीकाळ सतराव्या शतकातला असावा.

गांगोली हे गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. माणगावपासून हे गाव आठ किलोमीटर अंतरावर आहे. माणगाव-महाड या रस्त्यावरील ढालघर गावावरून गांगोली गावाला जाण्यासाठी फाटा फुटतो. चतुर्भुज अशा या मूर्तीच्या तीन हातांत परशू, पाश आणि मोदक आहेत, तर एक हात वरदहस्त आहे. याची सोंड डाव्या बाजूस वळलेली असून, हातातील मोदकावर स्थिरावलेली आहे. वैजनाथ शिवमंदिर परिसर आणि एकूणच गांगोली हे गाव अतिशय निसर्गसमृद्ध आहे. शिवकाळात ते कसे असेल, याची कल्पनाच आपल्याला त्या काळात नेते. या निसर्गसमृद्ध गावाला भेट देऊन, या आगळ्यावेगळ्या बाप्पाचे दर्शन नक्की घ्या.