मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी

'मुरुड्-जंजिरा' हे आज पर्यटकांचे आवडते 'पर्यटन केंद्र' म्हणून नावारुपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी पर्यटक 'वीकएन्डला' या पर्यटनस्थळाला आवर्जून येत असतात.

मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी
मुरुड जंजिरा

'मुरुड-जंजिरा' हे शब्द कानी पडताच डोळ्यासमोर उभा रहातो तो सागर लाटांशी लाडिवाळपणे खेळणारा निळाशार अरबी समुद्र, हळुवारपणे बागडावी अशी सोनेरी वाळूमय चौपाटी, नम्रपणे गगनाचे वेध घेणार्‍या हिरव्या नारळी पोफळीच्या बागाम आपण मुरुडला भेट दिल्यची साक्षीदार असलेली लालभडक माती, माणिकमोत्यांनी भरलेली पिवळीशार शेतजमीन आणि त्याच्यापलिकडे सदाहरित असणार्‍या डोंगरकड्या व त्याच्या उरापोटावर बागडणारे शुभ्रधवल धबधबे!

या सप्तरंगाप्रमाणे येथे भेट देणार्‍या पर्यटक पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारी मुरुडची माणसे देखील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्यामध्ये पटाईत आहेत, बव्हे तर या निसर्गाने त्यांना हे वरदानच दिले आहे.

'मुरुड्-जंजिरा' हे आज पर्यटकांचे आवडते 'पर्यटन केंद्र' म्हणून नावारुपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी पर्यटक 'वीकएन्डला' या पर्यटनस्थळाला आवर्जून येत असतात, मुंबईपासून मुरुडला येण्यासाठी इ.स.१५३० मध्ये पोर्तुगिजांनी बांधलेल्या चौलच्या किल्ल्याच्या भिंतीदरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर मुरुड दर्शनाला सुरुवात होते. प्राचीन काळी आपल्या देशांचा परराष्ट्रांशी सागरी व्यापार ज्या खाडीतून चालत असे ती नागोठण्याची खाडी आपले पाय धुण्यासाठी सज्ज असते. मुरुडमध्ये घेऊन जाणारा या खाडीवरील सेतू म्हणजे अधुनिक रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पहिला आदर्श सेतू होय. हा सेतू पार केल्यावर साळावच्या प्रसिद्ध विक्रम विनायक दर्शन घेऊन मुरुडकडे जाताना पोर्तुगिजांच्या उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेला कोर्लईचा 'अभेद्य किल्ला' हा तर किल्ला प्रेमींचे मोठे आकर्षण आहे. त्या किल्ल्यावर चढताना आजही मुंबईकरांची दमछाक होते.

तेथून पुढे जाणारा नागमोडी रस्ता उजवीकडे पश्चिम लाटांचे तुषार झेलित आणि पूर्वेकडील कडेकपारीच्या दर्शनाने पुढे सरकतो. काशिदची सागरपट्टी ही तर पर्यटकांची पंढरी समजली जाते. तेथून पूर्वेकडे उंचच उंच डोंगरकडे दिसतात. त्या निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर 'केसोली' हे संस्थानाच्या उन्हाळी राजधानीचे ठिकाण (मुरुडचे माथेरान) दृष्टीस पडते.

काशिद सर्व्हे सोडून एक अवघड वळण पार केल्यानंतर जागृत देवस्थन सिद्धिविनायकाचे नांदगाव हे ठिकाण आपले स्वागत करते. तेथे दर्शन घेऊन पुढे मजगावमर्गे टाळदेवाची प्रसिद्ध खिंड पार केल्यानंतर मुरुडचे विहंगम दृश्य नजरेस पडते. सातासमुद्राची आठवण करुन देणार्‍या सागरावरुन दृष्टी ढळते न ढळते तोच नजरेस पडतो मुरुडचा शिरोमणी  असलेला संस्थानाचा राजवाडा जो पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे.

राजवाडा सोडून १०० फुटांवर आल्यावर मुरुडला विजेचा पुरवठा करणार्‍य पहिल्या केंद्राचे अवशेष दिसतात. त्या पॉईंटवरुन पूर्वेकडे दोन डोंगरांवर दत्तमंदिर आणि इदगाह आपल्याला येथील सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवतात. पुढे येताच पोलीस ठाण्यापासून दरबार रोड सुरु होतो. शासकीय कार्यालये एकाच रस्त्यावर दुतर्फा असणारे मुरुड हे बहुदा एकमेव ठिकाण असावे.

मुरुड शहरामध्ये प्रवेश केल्यावर येथील माणसांच्या सागरासारख्या खोल मनाने आणि माडासारख्या उंच आदरातिथ्याने येथिल पर्यटक भारावून जातो. त्याचे अधिक वर्णन करण्यापेक्षा येथे पाहुणचार घेतलेल्या पर्यटकांकडूनच त्याची महती ऐकावी.

प्रशस्त  सागरकिनारा, हिरव्यागार नारळी-पोफळीच्या बागांमध्ये समरस झाल्यानंतर आपण एकदरा खाडी ओलांडून डोंगरीमार्गे काळकायच्या खोर्‍यात पोहोचतो. सागरी प्रवासाच्य काळातील उत्कृष्ट म्हणून नावाजलेले हे ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे समजले जात असे.

काळकायच्या खोर्‍यातून दंडराजपूरीकडे डोंगरमाथ्याच्या अवघड रस्त्यावरुन जाताना श्रीनगरवरुन लेहकडे जाणार्‍या रस्त्यांची आठवण होते. पश्चिमेकडे पाताळाचा वेध घेणारे समुद्रदर्शन घेत घेत आपण राजपुरीमध्ये पोहोचतो. म्हणजेच आपल्या पश्चिम किनार्‍यावरील अभेद्य जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो.

येथुन जंजिरा किल्ला, कासा किल्ला (पद्मदुर्ग) पलिकडे श्रीवर्धन तालुक्यातील नानवेलची बत्ती, राजपुरीची खाडी आदी पाहिल्यानंतर निसर्गाने या भागाला झुकते माप दिल्यची कल्पना येते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीतून जात असतानाच 'खोकरी' येथील 'गोल घुमट' आपल्याला विजापुरच्या साम्राज्याची आठवण करुन देत १०व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातात.

संभाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेण्यासाठी रचलेल्या बांधावरुन पलिकडे आगरदांड्याकडे जाताना उजवीकडे कन्याकुमारीच्या सागराचे तर डावीकडे हिमालयासारख्या उंचच उंच पर्वतरांगाचे दर्शन आपल्याला घडून येते. हा सुखद प्रवास करीत सागर किनार्‍याने निसर्गरम्य 'भालगांव' या ठिकाणी येतो. तेथून गोपाळवट आणि आराळी येथुन येणार्‍या आकाराच्या दर्‍यांचे दुर्मिळ दर्शन होते.

येथून खाडीतून पलिकडे गेल्यावर बूध्दकालीन कुडे-मांदाडची जगप्रसिद्ध लेणी पहावयास जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक गर्दी करत असतात. या ठिकाणाहून आपणास शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत असलेले 'तळागड' आणि 'घोसाळगड' यांचे दर्शन होते. या गडांच्या पलिकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुरु होऊन रायगड किल्ल्याच्या क्षितिजाला जाऊन भिडतात.

डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या या निसर्गदर्शनाने पर्यटकांना मुरुड-जंजिरा येथे आल्याचे चीज झाल्याचे समाधान मिळते. हे दर्शन करुन परत मुरुड येथे जाताना शिघ्रे गावाजवळ मुरुडला पाणी पुरवठा करणारे ब्रिटीशकालीन गारंबी आणि नवेदरचे धरण हे पर्यटकांच्या वनभोजनाचे प्रसिद्ध स्थळ आहे. अशा प्रकारे दोन दिवसांमध्ये साठवून घेतलेल्या या परिसराच्या इतिहासाबाबत देखिल पर्यटकांना मोठी उत्सुकता वाटते.

मुरुड परिसरातील इतर पाहण्यासारखी स्थळे

  • भोगेश्वर मंदिर- मुरुडच्या पुरातन मंदिरांपैकी एक जागृत देवस्थान. सुमारे ४०० वर्षापूर्वी बांधलेले पश्चिमाभिमुख देवस्थान.
  • श्री सिद्धीविनायक देवस्थान- श्री सिद्धीविनायक हे जागृत देवस्थान. अष्टविनायकाची यात्रा या देवस्थानाचे दर्शन घेतल्याखेरीज पुर्ण होत नाही. माघ वद्य चतुर्थीला मोठी जत्रा भरते.
  • सर एस ए हायस्कुल- जंजिरा संस्थानाचे नवाब सर सिद्दी अहमदखान यांनी संस्थानाच्या राजधानीत 'जंजिरा स्कुल' या नावाने इ.स.१८७१ मध्ये शाळा सुरु केली.
  • फणसाड अभयारण्य- जंजिरा नवाबांचे पारंपारिक शिकारक्षेत्र म्हणजे केसोली जंगल तेच सध्य फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाते. अभयारण्य सुमारे ५४ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात अनेक दुर्मिळ वृक्षराजी, पक्षी, सरीसृप व प्राण्यांचा वावर आहे. दुर्मिळ समजली जाणारे शेकरु सुद्धा येथे पहावयास मिळते.
  • श्री दत्त मंदिर- प.पू.ब्रह्मेंद्रस्वामी यांनी इ.स.१७५० च्या सुमारास जंजिरा मुरुडमधील निसर्गरम्य डेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानातील उंबराच्या झाडापाशी श्री दत्तगुरुंच्या पादुकांची स्थापना केली. संस्थानाचे तत्कालीन न्यायाधीश मा.राजाध्यक्ष यांनी १९०७ मध्ये लहानसे मंदीर उभारले तर १९२७ मध्ये कळस तथा सभागृहाचे बांधकाम पुर्णत्वास आले. १९९७ मध्ये जिर्णोद्धार करुन भव्य मंदीर उभारण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५० मी. उंचावर असलेल्य या ठिकाणी ३०९ पायर्‍या चढून जावे लागते. मुरुडचे मनोहारी रुप येथून न्याहाळता येते.
  • इदगाह- मुरुडच्या सौंदर्यस्थळामध्ये इदगाहचे स्थान अव्वल दर्जाचे. मुस्लिम धर्मियांचे हे पवित्र स्थान. मुरुड शहरापासून उत्तरेस दोन कि.मी. अंतरावर सुमारे ४०० फुट समुद्रसपाटीपासून उंचावर ही वास्तू आहे. याच पर्वतराजीवर साबीक रियासतचे नवाब वलिये अफशान सर अहमद खान शाह यांनी १९३८ मध्ये इदगाहची पायाभरणी करुन प्रारंभ केला. इदगाहच्या व्यवस्थापन तथा देखरेखीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. मुस्लिम समाज रमझान ईद व बकरी ईद या सणांच्या दिवशी इदगाहवर आवर्जून नमाज करतात.
  • कोटेश्वरी देवी- मुरुडच्या हद्दीत प्रवेश करतानाच दर्शन होते ते कोटेश्वरी ग्रामदेवतेचे. मंदीरासमोर अथांग सिंधूसागर दिसतो. तर याच सागरात घट्ट पाय रोवून उभा असलेला इतिहासाचा मूक साक्षीदार पद्मदुर्ग खुणावतो. कोटेश्वरी देवीची मूर्ती कासा किल्ल्या होती. या मुर्तीची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती अशी अख्यायिका बुजूर्ग सांगतात.

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press