अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे

विक एन्ड कुठे घालवायचा हा प्रश्न पडल्यावर मुंबई आणि पुण्यातल्या नागरिकांचा शोध सुरु होतो तो पर्यटनस्थळांचा. असेच एक पर्यटनस्थळ म्हणजे मुंबई पुण्यापासून जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूका. अलिबाग तालुक्याला निसर्गाने इतके भरभरुन दिले आहे की एकदा येथे येणारा परत परत येतच रहातो. चला तर मग या निसर्गसंपन्न अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळांविषयी (Alibaug Tourist Places) जाणुन घेऊयात.

अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे
अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे

अलिबाग हे शहर रायगड जिल्ह्याचे प्रमुख शहर असून अलिबागच्या दक्षिणेस साखर ही प्रसिद्ध खाडी आहे. अलिबागवरून मुरुडच्या दिशेने जायचे असल्यास साखर खाडीवरील पूल ओलांडून जावे लागते.

अलिबाग बिच

१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवलेले अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून  हे समुद्रकाठचे उत्तम विश्रांती स्थळ आहे. अली नावाच्या बेने इस्त्रायली धनिकाच्या बागांमुळे अलिबाग नाव पडले. या स्थानी बऱ्याच समुद्री लढाया गाजल्या.  कुलाबा जलदुर्ग, चुंबकीय वेधशाळा, गणपती, मारुती व महादेवाची भव्य मंदिरे, मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी, किनाऱ्याजवळ कुलाबा जलदुर्ग आणि सर्जेकोट (या किल्ल्यावर ओहोटीच्या वेळी चालत जात येते), हिराकोट किल्ला.  यांच्या भोवताली रेवदंडा, कनकेश्वर, सागरगड, पेण रस्त्यावर रामदरणे दुर्ग (३१५ मी.), तेथून उत्तरेस कनकेश्वर (३८४ मी.) व कनकेश्वर देऊळयाच्या माथ्यावरून महत्त्वाच्या गडांचे व खांदेरी व उंदेरी या जलदुर्गांचे  दृश्य दिसते. ही प्रेक्षणीय स्थळे असून चौल हे भारतीय इतिहासाचे म्युझियम व डोंगरावर प्राचीन दत्तमंदिर व आगरकोट फक्त १६ कि.मी. अंतरावर आहे. किहीम (१२ कि.मी.), नागांव सासवणे (शिल्पकार करमरकर यांचे जन्मस्थान-शिल्पप्रदर्शन) व मांडवा येथील समुद्रकिनारे रमणीय ओहत. १३ कि.मी. अंतरावर कनकेश्वर  येथे डोंगरावर महादेव मंदिर.  किहिम - सागर किनारी प्रवासी केंद्र. डॉ. सलिम अलींची बंगली. राष्ट्रीय केमिकल्स व फर्टीलायझर्स, गेल, एलपीजी, रीलायन्स पेट्रोकेमिकल्स यासारखे औद्योगिक प्रकल्पही येथे आहेत.

सासवणे बिच

अष्टागरातल्या या सासवणे गावावर जणू निसर्गाने सौंदर्यांची वृष्टीच केली आहे. सासवण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेला सुंदर समुद्र किनारा. शुभ्र वाळूने आच्छादलेला आणि पश्चिमेकडून घोंघावणार्‍या वार्‍यावर डोलणार्‍या उंच माडांची झिलर या किनार्‍यावर पहावयास मिळते. सायंकाळी येथे फिरताना अरबी समुद्राची घनगंभिर गाज एका वेगळ्याच विश्वात नेते. संध्याकाळी मावळणारा सुर्यनारायण पाहण्याचे दृश्य तर केवळ अप्रतिमच. परिसरात अनेक पुरातन देवस्थाने सुद्धा आहेत आणि येथिल मुख्य आकर्षण म्हणजे कै. विनायक पांडुरंग करमरकर या जगप्रसिद्ध शिल्पकार यांचे करमरकर शिल्पालय.

आवास बिच

देवांचा वास ज्या ठिकाणी  आहे म्हणुन या सुंदर गावास आवास हे नाव पडले. याला कारणही तसेच आहे. इतर कुठेही नसतील इतकी मंदिरे आवास मध्ये आहेत यामध्ये सिद्धेश्वर, खंबाळेश्वर, मारुती, जोगेश्वरी, वक्रतुंड गणपती, राम, पाणबादेवी, शांतेश्वरी आणि नागोबा अशी अनेक मंदिरे आहेत. आवासचा समुद्र्किनारा देखिल आल्हाददायक आणि निसर्गरम्य आहे, लांबवर पसरलेली चांदेरी पुळण, काठावर सुरुबनाची दाट सावली, त्या सवलीत कवडशांची रांगोळी आणि आकाशाचे प्रतिबिंब मिरवत शुभ्र लाटांनी किनार्‍याकडे धाव घेणारा समुद अशी अनेक सौंदर्य दृश्ये येथे पहावयास मिळतात. येथे राहण्यासाठी अनेक कॉटेज, हॉटेल इत्यादींची सोय आहे.

किहीम बिच

अष्टागरांपैकी एक असलेला आणि स्वच्छ, निसर्गरम्य आणि लांबलचक समुद्रकिनार्‍याची झालर लपेटून घनदात झाडीत लपलेले किहिम गाव पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यातले प्रसिद्ध पर्यटन असल्याने येथे हॉटेल्स, हॉलिडे होम्स भरपुर आहेत. येथिल पक्ष्यांची सृष्टी तर केवळ बघणीय, येथे असलेल्या अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या निवार्‍यामुळे पक्षिमित्र सलिम अलि किहिमला रहात सुद्धा होते. गावात भिल्लेश्वर हे प्राचिन मंदिर आणि इतर पंधरा मंदिरे आहेत. समुद्रात सहा सात मिटर अंतराव एक पाषाणाचे शिवलिंग आहे मात्र हे शिवलिंग फक्त श्रावण महिन्यातच वाळूची जेव्हा धुप होते तेव्हा दर्शन देते. असे म्हणतात कि पुढे एक नंदी सुद्धा आहे मात्र पाणि खुप खोल गेले कि तो दिसतो. फार पुर्वि बेने इस्त्रायली लोक समुद्रमार्गे येथे आले मात्र त्यांचे जहाज प्रथम किहिम किनार्‍याला लागले. जे वाचले त्यांनी पुढे किहिम येथे वस्ती केली. जे दगावले त्यांची थडगी किहिम किनार्‍यावर आजही पहायला मिळतात.

मांडवा बिच

मांडवा बंदराकडे जाणार्‍या शेवटच्या वळणानंतर उजवीकडे सुरुबनातून चमचमणारे निळे पाण, त्यातील वॉटर स्पोर्ट्स च्या रंगित बोटी, खोलवर गेलेली जेटी असे दृश्य दिसते. पार्किंगच्या डाव्या बाजुस सागरतर आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथुन कॅटमिरान बोट सर्व्हिस द्वारे सुमारे ३० ते ४५ मिनिटात आपण मांडवा बंदरामध्ये येतो. पि.एन्.पी., मालदार आणि अजंठा या कंपन्या कॅटमरान सेवा पुरवितात याशिवाय मांडव्यावरुन अलिबाग येथे याच कंपन्या बस सेवा सुद्धा पुरवतात. अलिबागच्या एस्.टी.स्टॅन्ड समोर या कंपन्यांची कार्यालये असून येथून आपणास दोन्ही वेळची तिकिटे मिळतात. मांडव्याच्या एल आकाआच्या जेट्टीवरुन गेल्यावर उजवीकडे करंजा बेट दिस्ते आणि समोर मुंबई शहरातल्या उत्तुंग इमारती दिसून येतात याशिवाय बाजुला रेवस बंदर, द्रोणागिरी किल्ला, खांदेरी इत्यादींचे दर्शन होते. मांड्व्यामध्ये श्रीवर्धन गढी, टाकादेवी इत्यादी प्रेक्षणिक स्थळे आहेत.

वरसोली बिच

अलिबाग शहराला चिकटूनच असलेला वरसोली बीच जेवढा सुंदर तेवढाच शांत आणि स्वच्छ आहे. काठावर सुरुच्या बनांची गर्द सावली आणि समोर पसरलेला विस्तीर्ण समुद्र. अलिबाग बसस्थानकानजिकच्या महेश चित्रमंदीरास वळसा घालून थेट रस्त्याने वरसोली बिच गाठता येतो. अलिबाग बिच जवळच असूनही सिमेटंच जंगल न बनलेल वरसोली गावही नारळि पोफळीच्या सानिध्यात विसावलेलं आहे. अलिबागपासून फक्त २ कि.मी. अंतरावर असणारा वरसोली बिच बर्‍याच पर्यटकांना माहित नव्हता त्यामुळे निवांत क्षण घालवण्यासाठी येणार्‍या मुंबई पुण्यासारख्या शहरातील पर्यटकांना वरसोली बिच म्हणजे शांतता मिळवण्याची पर्वणीच असायचा. मात्र आता विक एन्डला येथे सुद्धा पर्यटकांची गर्दी वाढत चालली असली तरी येथील शांतता अबाधित आहे. वरसोली किनार्‍यचे आता नुतनीकरण होत असून निवांतपणा प्रिय असणारे बरेचजण हल्ली वरसोली किनारा पसंत करतात. येथील सुरूंचे बनही  त्यामानाने बरेच दाट आहे.

अक्षी बिच

अलिबाग-रेवदंडा रोडवर अलिबाग स्थानकापासून सुमारे ५ किमी. अंतरावर अक्षीचा किनारा आहे. येथे जाण्यासाठी अक्षी स्थानकाजवळ असलेल्या स्तंभाजवळून आतमध्ये एक ते दीड किमी. जावे लागते. स्वतचे वाहन असल्यास थेट किनार्‍यापर्यंत आपण जाऊ शकता. किनारा स्वच्छ सुंदर प्रदुषणविरहित असून सुरूच्या बनांनी नटलेला आहे. या किनार्‍यावरून आपल्याला अलिबाग बीचचे तसेच तसेच कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते. निसर्गरम्य समुद्रकिनार्‍याबरोबरच या गावात एक शिलाहारकालिन आणि यादवकालिन असे दोन शिलालेख आहेत. यातला शिलाहारकालिन शिलालेख हा मराठीतला पहिला शिलालेख म्हणुन प्रसिद्ध आहे. श्री कालिकादेवी आणि श्री सोमेश्वर महादेव हि ग्रामदैवते प्रसिद्ध आहेत.

चौल बिच

चौल म्हणजे रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग ते रेवदंडा मोटार रस्त्यावर आहे. टॉलेमी, ह्युएनत्संग, अरबी आणि रशियन प्रवासी इत्यादींच्या वृत्तांतात याचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे. श्रीकृष्णाच्या काळात याला चंपावती (रेवतीक्षेत्र) म्हणत. हे यादव, आदिलशाह, पोर्तुगीज, मोगल, मराठे आणि शेवटी इंग्रज यांच्या अंमलाखाली होते. सुती व रेशमी कापड विणणे, लाकडाच्या सुबक पेट्या, पलंग वगैरे बनविणे इ. कलांत वाकबगार कारागीर येथे होते. त्यामुळे व्यापाराची खूप भरभराट झाली होती. शिवाजी महाराजांनी येथे आरमाराचे एक ठाणे वसविले होते. येथील शितळादेवीचे देवस्थान पुरातन आहे. जवळच्या डोंगरातील बौद्ध लेणी व रेवदंडा (पूर्वीचे खालचे चौल) येथील पोर्तुगीज अवशेष लक्षणीय आहेत. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे येथील कारागिरांना मुंबईस स्थलांतर करणे सोयीचे वाटले.

रेवदंडा बिच

रायगड जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध बंदर.हे अलिबाग तालुक्यात चौलच्या नैऋत्येस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले असून पूर्वी ‘खालचे चौल’ म्हणून ते ओळखले जात होते. सांप्रत रेवदंडा व चौल ही दोन वेगवेगळी गावे आहेत. पूर्वीच्या अष्टागरांपैकी हे एक असावे असे मानले जाते. इ. स. सहाव्या शतकाअखेरील बादामीच्या चालुक्यांपैकी मंगलेश राजाने रेवतींद्वीप जिंकल्याचा उल्लेख ऐहोळेच्या शिलालेखात आढळतो. ते द्वीप म्हणजेच रेवदंडाक्षेत्र अथवा चंपावती (चौल) असावे असे म्हणतात. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला होता. परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे, तसेच धरमतर खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंड्याचे व्यापारी महत्व कमी झाले. सांप्रत याला जिल्ह्यातील मोठ्या गावाचा दर्जा देण्यात आला असून येथून लहान नावा व होड्या यांमधून वाहतूक चालते. या बंदरातून मुख्यतः नारळ व मासे यांची निर्यात होते. येथील ‘आगरकोट’ नावाचा किल्ला प्रसिद्ध आहे. 

नागाव बिच

विक एन्ड कुठे घालवायचा हा प्रश्न पडल्यावर मुंबई आणि पुण्यातल्या नागरिकांचा शोध सुरु होतो तो ठिकाणांचा. असच एक मुंबई पुण्यापासून जवळ असलेला नागाव बिच. अलिबागपासून जवळच असलेला नागाव बिच म्हणजे एक सुंदर अनुभव आहे जो येथे आल्यावरच मिळतो. कुटुंबासह समुद्रकिनारी फिरायला मिळालं कि मन ताजतवान होत याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. पुणे-मुंबईच्या धाकधुकीच्या जिवनापासून अलिप्त आणि फार लांब नसलेले हे एक शांत आणि रम्य ठिकाण असून राहण्यासाठी विपुल हॉटेल्सच्या सोयी आहेत. त्यामुळे नागाव हे आता हॉट पर्यटनस्थळ म्हणुन मुंबई पुण्याच्या पर्यटकांमध्ये चर्चेत आहे.