मुरुड जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे

मुरुड-जंजिरा म्हटला की अभेद्य व अजिंक्य जंजिरा किल्ला व शहराचा अडीच कि.मी. अंतरापर्यंत पसरलेला अवर्णनीय समुद्रकिनारा असे केवळ पर्यटकच नव्हे तर निसर्गाशी जवळीक न साधलेले, इतिहासात जाणीवपूर्वक न डोकावलेल्या सर्वांना तसेच वाटते. परंतू मुरुडच्या अवतीभवती पाहिल्यास इथे सगळा परिसर मनसोक्त फिरण्यास किमान एक आठवडा लागेल.

मुरुड जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे
मुरुड जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे

मुरुड-जंजिरा

हिरवीगार वनराई, अथांग निळाशार अरबी समुद्र, रुपेरी-चंदेरी-वाळू-नारळी पोफळीच्या बागांना लागून मुरुडचा किनारा खुपच लक्षवेधी आहे. नवाबाच्य राजवाड्यापुढे वळणावर रात्रीच्यावेळी प्रवेश करतांना समुद्रकिनारी हायमास्ट दिव्यांची सोनेरी रोषणाई व तिन डोंगराच्या कवेतील मुरुड म्हणजे नैसर्गीक शांतीचा रात्रीच्या काळोखातही सुंदर भासतो.

सकाळच्या कोवळ्य किरणांमध्ये चकाकणारी वाळू निळेशार पाणी सुमारे अडीच कि.मी. लांबीचा हा किनारा पर्यटकांना मोहून टाकतो, समुद्रस्नानासाठी इतका उत्तम व सुरक्षीत किनारा शोधून सापडणार नाही. गोव्यापर्यंत पाहील्यास असे नैसर्गिक सौंदर्य चुकून एखाद्या सागरतटास मिळालेले दिसेल. म्हणून हा किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

गावाप्रमाणे समुद्रकिनारा स्वच्छ असलेला दिसतो. किनार्‍यावरील सुरुची बने, उजव्या हाताकडील प्रेक्षणीय राजवाडा, नवाबकालीन टुमदार इमारती यामुळे सगळे वातावरण आल्हाददायक भासत राहते. सोनेरी वाळू, चिंबोर्‍यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या, लाटांबरोबर वाहून येणारे शंख-शिंपले यासाठी पर्यटकांनी नेहमी हा किनारा गजबजलेला असतो, मुरुड समुद्रकिनारी सुर्यास्त अनुभवण्यास हजारो पर्यटक सुट्टीत या किनारी ठाण मांडून असतात.

अभेद्य जंजिरा

दहाव्या शतकात कोकणपट्टीवर शिलाहारांचे राज्य होते आणि त्यांची राजधानी मुरुड जवळी वैभवशाली राजपुरी होती. त्यांचे शिलाखंड राजपुरी खोकरीच्या दरम्यान अजुनही साक्ष देतात. दमण ते कारवा हा पश्चिम किनारपट्टीचा भाग आजही किल्ल्याच्या रुपाने दिमाखाने उभा आहे. त्यांना जंजिरे किंवा सागरातील किल्ले म्हणता येईल, असे किल्ले थोडेच आहेत. वसई, जंजिरा, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अग्वादा, सदाशिवगड, अंजनदीव अशा मोजक्याच किल्ल्यांच्या इतिहासात जातिवंत सागरी लढाया झाल्या. अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेला बलाढ्य, अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजेच जंजिरा.

मुरुड पासून राजपूरी गाव अवघ्या ५ किमी. अंतरावर. राजपूरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी होडीचा वा मचव्याचा प्रवास करावा लागतो. किल्ल्याचा पाया मुळी पक्क्या कातळावर आहे. पूर्ण भरतीच्या वेळी समुद्रपातळीपासून तटाची उंची पंधरा मीटर सहज भरते. किल्ल्याचा आकार लांबून घुबडासारखा वाटतो. किल्ल्याला दोन दरवाजे असून महादरवाजा पूर्वेस असला तरी लांबून दिसत नाही. ३०० वर्षापूर्वी बांधलेला जंजिरा किल्ला हा वास्तुशिल्पाचा एक चमत्कार वाटतो. मुख्य दरवाज्यावर दोन्ही दुर्गद्वार शिल्प असून किल्ल्यत दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. शस्त्रागार व दारुगोळ्याचे कोठार उंचावर आहे. किल्ल्याचा तट दगडी व मजबूत असून चिरे झिजले तरी सांध्यांमध्ये भरलेला चुना, शिसे अभंग आहे. किल्ल्याची २२ बुरुजांची, तटांमध्ये गुंफलेली माळ केवळ बुलंद, बळकट आणि बेलाग आहे.

श्री विक्रम विनायक मंदीर

मुरुडपासून रोह्याच्या रस्त्यावर अलिबागकडे जाताना विक्रम इस्पातचा कारखाना लागतो. या ठिकाणी बिर्ला उद्योग समुहाने त्यांच्या परंपरेप्रमाणे मंदिर उभारले. ओबडधोबड टेकडी जेव्हा गणेश मंदिराचे रुप घेत होती तेव्हा कुणाला या ओसाड रानात काही निर्मिती होईल हे अशक्यच वाटले असेल.

परंतू पांढर्‍या शुभ्र रंगाचा संगमरवर व टेकड्यांच्या नैसर्गिक उताराचा खुबीने वापर करुन झालेले बगीचे, कारंज्यासह प्रकाश योजना यामुळे विक्रम विनायक मंदिर म्हणजे पर्यटकांचे नंदनवन व गणेशभक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. पॉलिकॉर्पशिटचे छत व चारी बाजूने मोकळा सभा मंडप मंदिरच्या मध्यवर्ती जागी सजीव भासणारी गणेशमुर्ती, बाजूला छोट्या मंदिरात राधा-कृष्ण, शंकर-पार्वती, देवी दुर्गामाता व सुर्यदेवांच्या नेत्रसुखद मुर्ती आहेत.

आदित्य बिर्ला यांच्या स्मृती जतन करणारा पुर्णाकृती पुतळा बागेची शोभा वाढवतो. पर्यटकांची नेहमी कायम गर्दी असणारे हे ठिकाण प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. सकाळी ९.०० व सायं. ७.१५ वा. मंदिरात आरती व पुजाअर्चा होते. सकाळी ६.०० ते ११.३० व सायं. ४.३० ते रारी ९.०० वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश मिळतो. रेवदंडा एस.टी. स्थानकापासून एस.टी. गाडीसह व खाजगी वाहतुकीची सोय आहे.

काशिद बिच

गोव्यातले लांबच लांब पसरलेले बीच सर्वांनाच माहिती आहेत. असाच गोव्याची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिद बीच आहे. मुरूडच्या उत्तरेस १८ कि.मी.वर हा सुंदर समुद्रकिनारा आहे. सध्या देशी विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किनार्‍यावरील सुरूच्या नयनमनोहर बागांतून थांबलेल्या पर्यटकांच्या गाड्या आणि लाटांवर खेळणारी माणसे पाहूनच या बीचचे महत्त्व लक्षात येते. शनिवार रविवार सुटीच्या दिवशी मुंबईतून शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. अनेक वेळा इथे मॉडेलिंग, सिरियल व सिनेमांचे शूटींग होत असते. सुरूबनात असलेल्या स्टॉल्सवर सर्व प्रकारची खान - पान सेवा असल्याने पर्यटक मजेत असतात. काशिद बीचच्या समोरच्या डोंगर उतारावर अनेक हॉटेल्स, रिसॉर्टस् आहेत. 

पद्मदुर्ग (कांसा) किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दित जंजिर्‍याचा लढा देत असताना शिवरायांच्या दर्यासारंग दौलतखान याने १६६१ मध्ये जंजिर्‍यापासून काही अंतरावर मुरुड शहराच्या समुद्रकिनार्‍यासमोर कासा खडकावर एक किल्ला बांधला तो 'पद्मदुर्ग किल्ला' यास कासा किल्ला सुद्धा म्हणतात.

ऐतिहासिक वास्तुंबाबत प्रेम असणारे पर्यटक या किल्ल्याच आवर्जुन भेट देतात. जंजिरा किल्ल्यात असणार्‍या चावरी, लांडाकासम, कलालबांगडी या तोफेच्या मार्‍यामुळे कासा किल्ल्याचा जंजिर्‍याच्या दिशेचा भाग काही अंशी फुटला होता. अरबी समुद्राच्या मुख्य प्रवाहात असणारा हा किल्ला ३५० वर्षे पाण्याचा मारा खात आता अर्धाअधिक राहिला आहे. किल्ल्यामध्ये पोलादी तोफा गंजुन गेल्या आहेत. गोड्या पाण्याचा पाच खणी पक्का तलाव  या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. मुरुड शहराच्या वेशीवर असणारी ग्रामदेवता कोटेश्वरी माता हिचे मुळस्थान या किल्ल्यात होते असे म्हटले जाते. सिद्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवरायांचा आरमारी प्रमुख दौलतखन याने उभारलेला हा किल्ल कालांतराने सिद्दीने जिंकून त्याचा तुरुंग म्हणून वापर केला. पर्यटकांना खाजगी बोटीने किल्ला पाहण्यास जाता येते.

खोकरी घुमट

सिद्दींचे धर्मगुरु सय्यद अली नजीर व सिद्दी नवाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरी घुमट म्हणून हे ठिकाण पर्यटकांना ठाऊक आहे. इतिहासकाळात दंडा-राजपुरी बंदराजवळचे खोकरी हे एक छोट्या वस्तीचे गाव होते. भारतीय व अरबीपद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना म्हणून या घुमटांचे शिल्पकाम पाहण्यास चोखंदळ पर्यटक येतात. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियत व सिद्दी याकुतखान यांच्या कबरीसुद्धा याच ठिकाणी आहेत.

गारंबी धरण

जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणारे सर सिद्दी अहमदखान यांनी विक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील धरणास "विक्टोरिया ज्युबीली वॉटर वर्क्स" हे नाव दिले. विपुल वनसंपत्ती नैसर्गिक पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबी धरण म्हणुन प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरुन पुर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करुन केले जाते.

पावसाळ्यात पर्यटक पाण्याच्या प्रवाहांत डुंबण्यासाठी हमखास या ठिकाणी जातात. वनभोजनासाठी हे ठिकाण आदर्श आहे. पाण्याचा मुळ प्रवाह दुषित न करण्याचे सामंजस्य बाळगुन निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट, चहुबाजूस प्रचंड वृक्षराजी मोठ मोठे खडक, वाहत्या पाण्याची गाज, पक्ष्यांची किलबिल यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातो.

कोर्लई किल्ला

रेवदंडाखाडीच्या तोंडाजवळ साळाव पुलाजवळ ऐतिहासिक कोर्लई किल्ला आहे. सन १५२१ मध्ये दियोगू लोपिस दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकार्‍याने हा किल्ल बांधला असल्याचे नमुद आहे. लहानशी तटबंदी व कुस उभारलेला हा किल्ल बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्राच्या बाजूस आहे. यठिकाणि 'लढल्याशिवाय आत प्रवेश नाही' असा इशारा दगडावर कोरलेला दिसतो. किल्ल्यास सात दरवाजे आहेत. आता मोडकळीस आलेला चर्च आहे. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराजवळ समुद्रास खेटुन जुने दिपगृह आहे. अत्यंत प्रेक्षणीय वातावरणातील या किल्ल्यावरुन साळव खाडीपुल सुंदर दिसतो.

गायमुख

शहरास लागून पुलाच्या दुसर्‍या टोकास  जंजिर्‍याकडे जाताना एकदरा गाव लागते. एकदरा गाव डोंगर्‍याच्या पुर्वेस वसले आहे. पूर्वी हि कोळी वस्ती जंजिरा किल्ल्यात रहात असे. डोंगराच्या माथ्यावर संभाजी महाराजांनी शामराजगडाचे अवशेष आहेत. या  डोंगराच्या कपारीमध्ये गायमुख हे शिवस्थान आहे. दक्षिणकाशी समजल्या जाणार्‍या हरीहरेश्वराचे मुळस्थान गायमुख असल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. फारपूर्वी कुणी तरी वृषभ हत्या या ठिकाणी केल्याने महादेवाने पलिकडच्या श्रीवर्धनच्या डोंगरावर स्थालांतर केले तेच ठिकाण हरिहरेश्वर असल्याच्या शिवभक्तांना विश्वास आहे. पर्यट्क अध्यात्मीक शांतीसाठी याठिकाणी फेरफटका मारण्यास श्रध्दापूर्वक जातात.

क्षेत्रपाल शिवमंदिर

दत्तमंदिराच्या टेकडीवरुन जंजिरा हँगीग व्हॅलीपरिसरांत पुरातन शिवमंदिर आहे. क्षेत्रपाल शिवमंदिर शाळांमधील मुलांना वनभोजनासाठी ठाऊक आहे. जंजिरा हँगीग व्हॅलीच्या विकासामुळे आता शिवमंदिरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते. काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मंदिराजवळ असणारी दगडी विहीर वेगळ्या पुरातन धाटणीची आहे. निसर्गासह एक वेगळीच अध्यात्मीक अनुभूती देणारे हे 'शिवस्थळ' निसर्गाच्या कुशीत आपले वेगळेपण टिकवून आहे. ध्यान धारणा करण्यासाठी येथील वातावरण अत्यंत उपयुक्त आहे.

खोरा बंदर

जंजिरा संस्थानाचा इतिहास अरबी समुद्राशी निगडीत आहे. खोरा बंदरात पुर्वी भाऊच्या धक्क्यावरुन रत्नागिरीस जाणारी बोट थांबत असे. मुंबईहून एस.टी. वाहतुक नव्हती तेव्हा हा एकमेव जलमार्ग होता. या ठिकाणावरुन जंजिरा किल्ला समोरच दिसतो. पर्यटक जेव्हा यदाकदा येत असत तेव्हा याच बंदरातून जंजिरा किल्ला पाहण्याची सोय होती. येथून किल्ला पाहण्यास गेले तर अर्ध्याअधीक तासाची समुद्रसफर घडते.

कुडे लेणी

कुडे, मांदाड लेणी, खाजणी, भालगांव पुलामुळे मुरुड शहरापासून केवळ २५ कि.मी. दक्षिण दिशेस, मुंबई गोवा महामार्गापासून २१ कि.मी. अंतरावर कुडे, मांदाड लेणी पाहण्यास पूर्वी मुरुड मधून खाजगी होडीने जावे लागत असे. आता भालगांव-खाजणी मांदाड पुलामुळे शहरापासून रस्तामार्गे केवळ २५ कि.मी. अंतरावर लेणी आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून २१ कि.मी. असलेल्य या लेण्या पाहण्यास स्वतःचे वाहत असेल तर थेट लेण्यांपर्यत पोहोचता येते.

कुडे लेणी बौद्धकालीन लेणी आहेत. माणगांव प्रांतावर महाभोज राजवंशाची सत्त असतांना या लेण्यांची निर्मिती झाली आहे. १८४८ साली डोंगरांच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. २६ लेण्या या ठिकाणी आहेत. सगळा परिसर पश्चिमाभिमूख आहे. समोर अथांग अरबी समुद्र, पूर्वेस तळा, उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. दोन मजली लेण्यांमध्ये खालच्या लेण्यापैंकी बहुतांशी प्रेक्षणीय आहेत. एकसंघ दगड कोरुन निर्माण झालेल्या लेण्या पाहतांना आश्चर्यमिश्रीत भाव सहज उमटतात. तळ मजल्यावर पंधरा लेण्या व वरच्या बाजूस अकरा लेण्या आहेत.

पावसाच्या तडाख्याने मुख्य लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळील अजस्त्र दगडी हत्ती ध्वस्त झाले आहेत. काही शिलालेख स्पष्ट आहेत. भिक्षुकांच्या ध्यानधारणा व निवासासाठी असणार्‍या या लेण्यांखाली बारमाही स्वच्छ पाणी भरलेले असते.