पिसवा अथवा पिसू कीटकाची माहिती

संस्कृतमध्ये रक्तपायी, तल्पकीट, देहिका अशी नावं असणारा, इंग्लिशमध्ये फ्ली (Flea) आणि मराठीत पिसू या नावाने ओळखला जाणारा हा कीटक आकारात बऱ्यापैकी लहान असल्याने चटकन् नजरेस पडत नाही. - सिद्धार्थ अकोलकर

पिसवा अथवा पिसू कीटकाची माहिती

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

चौदावं शतक! इ.स. १३४०च्या सुमारास समस्त पृथ्वीची लोकसंख्या होती सुमारे ४७ कोटी! या शतकात मंगोल आक्रमकांनी प्राचीन ‘सिल्क रूट’मार्फत युरोपभर पोचवलेल्या किंवा त्याकाळच्या व्यापारी जहाजांमधून ठिकठिकाणच्या जमिनीवर पोचलेल्या ‘काळ्या मृत्यू’च्या (bubonic plague) महामारीने जगाची लोकसंख्या धाडकन् खाली म्हणजे जेमतेम पस्तीस कोटींवर आणली होती. युरोपला स्वतःची गेलेली जनसंख्या भरून काढायला पुढची दोनशे वर्षं लागली, तर इटलीमधल्या फ्लॉरेन्ससारख्या चिमुकल्या शहराला एकोणिसावं शतक उजाडलं तरीही गतकाळात झालेली मनुष्यहानी भरून काढता आलेली नव्हती. मध्ययुगीन इतिहासातील हा प्रचंड मोठा जनसंहार केवळ एका कीटकाच्या ‘नैसर्गिक उद्योगांमुळे’ झालेला होता आणि त्या कीटकाचं नाव आहे - पिसू..!!

संस्कृतमध्ये रक्तपायी, तल्पकीट, देहिका अशी नावं असणारा, इंग्लिशमध्ये फ्ली (Flea) आणि मराठीत पिसू या नावाने ओळखला जाणारा हा कीटक आकारात बऱ्यापैकी लहान असल्याने चटकन् नजरेस पडत नाही. पिसू हा एक पूर्णतः परजीवी आणि पंखहीन जीव आहे. ज्या कीटकांना पंख नसतात, ज्यांची मुखांगं प्राण्याची त्वचा भेदून रक्त पिण्यासाठी अनुरूप असतात, अशा सर्व कीटकांचा समावेश कीटक वर्गाच्या ‘सायफनॅप्टेरा’ गणात केला जातो. हे नाव प्राणीशास्त्रीय लॅटिन/ ग्रीक भाषेमधील सायफन (एका प्रकाराची ट्यूब) आणि ऍप्टेरा म्हणजे पंखरहित या शब्दांपासून आलेलं आहे. गंमतीचा भाग म्हणजे या गटातल्या सगळ्या कीटकांना मराठी भाषेत सरसकटपणे ‘पिसू’ असंच म्हटलं जातं. पिसू ही मुख्यत: कुत्रा, मांजर, उंदीर, माणूस, माकड अशा जवळजवळ प्रत्येक केसाळ सस्तन प्राण्यांच्या आणि क्वचित प्रसंगी पक्ष्यांच्या शरीरावर आढळते, पूर्णतः त्यांच्या रक्तावर जगते.

पिसवा लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. अनुवांशिक पुराव्यांनुसार त्या परजीवी विंचू माशीचे ‘सेन्सु लाटो’चे खास वंशज आणि नॅनोकोरिस्टिड या जातीशी संबंधित वा त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. सर्वात जुन्या पिसूचा माग, मध्य-ज्युरासिक काळापर्यंत मागे गेलेला आहे. त्यावेळच्या पिसवा अर्थातच हल्लीपेक्षा फार वेगळ्या होत्या आणि त्यांना त्यांचं आजचं रूपडं सेनोझोइक काळात म्हणजे सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी प्राप्त झालेलं आहे. वनस्पतींचे रस शोषणाऱ्या आदीम कीटकांपासून त्यांची उत्पत्ती पुढे सस्तन प्राण्यांचे रक्तभक्षी म्हणूनच झालेली असली तरी नंतरच्या काळात त्यांनी काही पक्ष्यांनाही आपलंसं केल्याची नोंद आहे. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या मोठ्या प्राण्यांच्या जीवाश्मांवर ममीफाय झालेल्या पिसवा आढळलेल्या आहेत.

जगभरात पिसवांच्या तब्बल दोन हजार जातींची ओळख पटलेली आहे. इथे पिसवा कोणत्या प्राण्याचं रक्त प्राशन करतात त्यावरून त्यांची प्रवर्गवारी केलेली आहे. उदा. ‘टिनोसेफॅलिडिस कॅनिस’ ही कुत्र्याचं रक्त पिणारी, ‘झेनोप्सायला केओपिस’ ही उंदरावरची, ‘टिनोसेफॅलिडिस फेलिस’ ही मांजरावर दिसणारी, आणि ‘प्युलेक्स इरिटान्स’ ही माणसाचं रक्त ओढणारी, अशा पिसवांच्या काही प्रमुख जाती आहेत. याच प्रमाणे, ‘मालाकोप्सिलिडिस’ फक्त आर्माडिलोवर आढळतात, ‘इश्नोप्सीलिडिस’ केवळ वटवाघुळांवर, ‘सेरॅटोफायलस नायजर’ सामान्य कोंबडीवर आणि ‘चिमेरोप्सिलिडिस’ फक्त हत्तींवरच वावरताना दिसतात. ही काही नावं फक्त उदाहरणांदाखल दिलेली आहेत.

निरनिराळ्या जातींनुसार पिसूचं गडद तपकिरी शरीर सुमारे १·५ ते ३·५ मिमी. लांब असतं. ते दोन्ही बाजूंना चपटकं असल्याने ती वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत, प्राण्यांच्या केसांमधून आणि पक्ष्यांच्या पंखांमधून सहजपणे फिरू शकते. पिसूचं तोंड केवळ ‘कराल’ म्हणावं असंच असतं. उत्क्रांतीमध्ये पिसवांच्या तोंडाचं रूपांतर रक्त शोषून घेणाऱ्या अवयवात झालेलं आहेच पण या कीटकाला चक्क एक जबडा असतो आणि तो त्याच्या आकाराच्या मानाने भलता लांबलचक असून करवतीसारख्या दातांनी सजलेला असतो. आपण या आधी पाहिलेल्या रक्तशोषक कीटकांसारखी तिला सुई-सोंड नसते. पिसू तिच्या करवती दातांनी प्राण्यांची त्वचा फाडून, त्यांच्या शरीरात स्वतःचा अख्खा जबडा खुपसून त्यांचं रक्त पिते.

पिसवांचं बलस्थान म्हणजे त्यांचे सर्वात मागचे पाय! हे पाय उंच आणि लांब उडी मारण्यासाठी अनुरूप होत गेलेले आहेत. पिसू आकाराने छोटी असली, तरी तिच्या आकाराच्या पन्नास पटींहून जास्त, साधारण २० सेंमी. उंच आणि ३५ सेंमी. लांब उडी एका दमात मारू शकते. मानवाला पिसूसोबत उडी मारायची शर्यत लावायची असेल तर त्याला एका जागेवरून २५० फूट उंच किंवा ४५० फूट लांब उडी मारून दाखवावी लागेल आणि तरीही तो ती शर्यत नक्कीच हरेल. सर्वात लांब किंवा उंच उडी मारणाऱ्या कीटकांमध्ये पिसवा, ‘फ्रॉगहॉपर’ गणाच्या खालोखाल, दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या पुढच्या पायांच्या जोड्यांना बळकट नख्या असतात, जेणेकरून त्या भक्ष्याच्या शरीरांवर चांगली पकड मिळवू शकतात.

पिसूची उडी इतकी वेगवान आणि जबरदस्त असते की ती तिच्या स्नायूंच्या एकूण क्षमतेपेक्षा काही पटींनी जास्त ठरते आणि त्याचमुळे थेट स्नायूंच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता, पिसू स्वतःचं शरीर वेगाने हवेत सोडून देण्यापूर्वी रेसिलिन नावाच्या लवचिक प्रोटीनच्या पॅडमध्ये साठवलेली स्नायूंची ऊर्जा वापरते. उडी मारण्याच्या थोडंसं आधी हे स्नायू आकुंचन पावतात आणि रेझिलिन पॅड्सचा पुरेपूर वापर करून घेतात. वापरली गेलेली शक्ती पुन्हा (हळूहळू) साठवली जाते जी पुढच्या उडीसाठी वापरली जाते. आपल्या जगातलं उदाहरण द्यायचं तर धनुष्याची ताणलेली प्रत्यंचा म्हणजे प्रोटीन पॅड आणि सोडला जाणारा बाण म्हणजे पिसू, असं कदाचित म्हणता येईल.

पिसू हा एक मुलखाचा चपळ कीटक असून तिच्या शरीराचा कडकपणा आणि शरीरावर असलेल्या लहान राठ केसांमुळे ती प्राण्यांच्या शरीरावर विद्युतवेगाने सहज हालचाल करू शकते. निसर्गाने तिचं रक्षण करण्यासाठी तिला खवल्यांनी सजलेलं आणि बऱ्यापैकी कडक असं शरीर दिलेलं आहे. त्यामुळे पिसू मोठ्या प्रमाणावर दाब सहन करू शकते. उदा., दोन बोटांमध्ये तिला चिरडलं तरी तिच्यावर परिणाम होत नाही मात्र अंगठ्याच्या दोन नखांमध्ये तिला चिरडून मारता येतं, जर तुम्हाला जमलं तर! त्यापेक्षा पिसू पकडून तिला पाण्यात टाकलं तर ती काही मिनिटांत बुडून मरते. पूर्वी आमच्याकडील चारपायींवरच्या पिसवांना मारण्यासाठी हा नामी उपाय आम्ही बरेचदा केलेला आहे.

पिसूच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात; जे कीटकाच्या पूर्ण जीवनचक्राचं एक नामी उदाहरण आहे. पिसूची मादी अनेकदा अंडी घालते आणि एका वेळी किमान ८ ते १२ अंडीतरी घातली जातातच. ही अंडी गोलसर आणि पांढुरक्या रंगाची असतात. आश्रयी प्राण्याच्या अंगावर घातली जाणारी अंडी चिकट नसल्यामुळे अनेकदा त्या प्राण्याच्या शरीरावरून घसरून खाली जमिनीवरही पडतात. अंड्यातून साधारणत: १२ ते १४ दिवसांच्या कालावधीत अळी बाहेर पडते. पाळीव प्राण्यांचा वावर असलेल्या जागी ओल किंवा दमटपणा असल्यास तिची वाढ झपाट्याने होते.

अळीच्या डोक्यावर एक कठीण काटा-वजा-शिंग असतं. त्याचा वापर करून ती अंड्याचं कवच भेदून बाहेर पडते. हा काटा काही काळानंतर नाहीसा होतो. अळी अर्धपारदर्शक आणि निस्तेज फिकट रंगाची असते. तिला डोळे नसतात. सर्व शरीरावर लहान राठ केस असतात. ती वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांवर आणि मोठ्या पिसवांच्या विष्ठेतल्या सुकलेल्या रक्तांशावर जगते. अन्नाची उपलब्धता आणि वातावरण यांनुसार अळीची अवस्था ५ ते १५ दिवस टिकते. त्यानंतर ती रेशमासारख्या लवचिक धाग्याच्या साहाय्याने कोश तयार करते. ३ ते ५ दिवसांत या कोशातून २ ते ३ मि.मी. लांबीची प्रौढ पिसू बाहेर पडते.

पिसू हा एक भलता उपद्रवी कीटक आहे. प्राण्याच्या शरीराची कंपनं, निर्माण होणारी उष्णता आणि उत्सर्जित होणारा कर्बवायू यांद्वारे पिसूला भक्ष्याचा ठावठिकाणा अचूक समजतो. एकदा पिसू प्रौढ झाली की प्रजनन करणं, हे तिचं मुख्य काम असतं. कोशातून बाहेर पडल्यावर पहिल्या आठवड्याभरात अन्न म्हणून तिला प्राण्याचं रक्त पिणं गरजेचं असतं. त्यानंतर ती अन्नाशिवाय बराच काळ काढू शकते.

पिसू फक्त आश्रयीच्या ताज्या रक्तावर जगते. तिच्या चाव्याने लालसर गोल अशी गांधी उठते आणि त्या जागी सूज येऊन जळजळ होऊ लागते. बहुतेक वेळी या गांधी एका सरळ रांगेत उठताना दिसतात. तिच्या चावण्यामुळे आणि होणाऱ्या खाजेमुळे त्वचेवरचे केस गळतात आणि अती प्रमाणात खाजवल्याने क्वचित रक्तक्षयही होऊ शकतो. पिसवांच्या लाळेमुळे काही जणांना अधिहर्षतेचा (ॲलर्जी) त्रास होतो. पिसूच्या जीवनक्रमातील तीन-चतुर्थांश काळ एखाद्या आश्रयीच्या शरीरावर जातो, म्हणून त्या प्राण्यावर उपचार करण्याबरोबरच त्याच्या आसपासचा परिसर निर्जंतुक आणि प‍िसुमुक्त ठेवणं अत्यावश्यक ठरतं.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात/ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पिसवांनी पसरवलेल्या तिसऱ्या महामारीचा अर्थात् प्लेगचा उद्रेक झाला. व्यापार आणि लोकांच्या स्थलांतरांमुळे (पिसवा) प्लेग मोठ्या प्रमाणावर पसरला गेला. पिसवांचे वाहक उंदीर, ते मेल्यानंतर त्यांनी माणसांकडे मोर्चा वळवला. खास करून शहरांमध्ये या प्लेगने लक्षणीय प्रादुर्भाव दाखवला. त्या काळात हिंदुस्थानातल्या ब्रिटीश सरकारने लोकांच्या विलगीकरणाच्या नावाखाली इथल्या गरीब जनतेवर केलेले अनन्वित अत्याचार, त्यांचा छळ, अत्यंत घृणास्पद पातळीपर्यंत पोचलेला होता. सन १८५५ पासून सुरू झालेल्या या महामारीने चीन आणि हिंदुस्थानात बारा दशलक्ष तर आशिया खंडामध्ये इतरत्र तीस लाख मृत्यू घडवले. या प्लेगच्या काळातच पुण्यातलं साथीच्या रोगांसाठी विशेष करून ओळखलं जाणारं डॉ. नायडू रूग्णालय स्थापन करण्यात आलं, जे आजतागायत रूग्णसेवा करीत आहे.

उंदरांवरील पिसवा प्लेगच्या ‘यर्सिनिया पेस्टिस’ नामक जीवाणूंच्या वाहक आहेत. अलीकडच्या काळात या प्लेगची लागण आढळलेली नाही. भारतातल्या उंदरांवरच्या पिसू, पाश्चुरेला पेस्टिस नामक सूक्ष्मजंतूंच्या वाहक असतात आणि त्या चावल्या तर मानवामध्ये ज्वरसदृश्य लक्षणं दिसून येतात. ट्रेंच फीवरचा जीवाणू ‘रिकेट्सिया टायफी’ याच्याही वाहक या पिसवाच असतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या हायमेनोलेप्सिस या चपटकृमींचा प्रसारसुद्धा पिसवांमार्फतच होतो. म्यूरिन टायफस, ट्युलॅरिमिया, अतिशय घातक असा मिकझोमॅटोसिस, रशियाच्या सैबेरियात आढळणारा मस्तिष्कशोष असे अनेक रोग या दुष्ट पिसवांमार्फत पसरवले जातात.

पिसवांनी कविता, साहित्य, संगीत, चित्रकला अशा कला क्षेत्रांमध्येही कधीचाच प्रवेश केलेला आहे. यामध्ये रॉबर्ट हूकने १६६५ साली प्रकाशित केलेल्या मायक्रोग्राफिया या अग्रगण्य पुस्तकात समाविष्ट असलेलं मायक्रोस्कोपखालील पिसूचं प्रसिद्ध रेखाचित्र, जॉन डोने आणि जोनाथन स्विफ्ट यांच्या पिसवांवर आधारलेल्या कविता, ज्योर्जिओ फेडेरिको गेडिनी आणि मॉडेस्ट मुसॉर्गस्की यांचं फ्ली-संगीत, जॉर्जेस फेड्यू यांचं नाटक, चार्ली चॅप्लिनच्या काही चित्रपटांमध्ये दिसणारी ‘फ्ली सर्कस’ आणि ज्युसेप्पे क्रेस्पी, जियोव्हानी बॅटिस्टा पियाझेटा आणि जॉर्जेस डी ला टूर यांसारख्या कलाकारांची चित्रं यांचा समावेश आहे. गणितज्ज्ञ ऑगस्टस डी मॉर्गन यांनी १९१५ साली लिहिलेली ‘सायफनॅप्टेरा’ ही मजेदार कविता मोठ्या आणि लहान पिसूंमुळे तयार झालेल्या परजीवींच्या अनंत साखळीचे वर्णन करणारी आहे.

वर वर पाहता मामुली वाटणारा हा कीटक जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय आर्थिक प्रभाव पाडत असतो. एकट्या अमेरिकेतच पिसू संबंधित पशुवैद्यकीय बिलांवर दरवर्षी अंदाजे २.८ अब्ज डॉलर्स खर्च केले जातात. पाळीव प्राणी पाळणारी मंडळी प्राण्यांच्या आणि स्वतःच्या उपचारांसाठी वार्षिक १.६ अब्ज डॉलर्स खर्च करतात, तर फ्ली पेस्ट कंट्रोलसाठी तब्बल ३४८ दशलक्ष डॉलर्सचा अपव्यय होत असतो. या उपद्रवी कीटकास आळा घालण्यासाठी आधुनिक कीटकनाशकांच्या वापराव्यतिरिक्त घरांची/ तबेल्यांची स्वच्छता ठेवणं, उंदरांचा नायनाट करणं, कुत्रे, मांजरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या हे पाळीव प्राणी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं.

डीडीटी, क्लोरडान, लिंडेन, मॅलॅथिऑन, पायरेथ्रिन, लेथेन, थानाइट यांसारख्या कीटकनाशकांचा घरांच्या भिंती आणि छतांवर फवारा मारल्यास पिसवांचा नाश होतो. मेंथॉलयुक्त मलमं, कार्बोलेटेड व्हॅसेलीन, कापराचं तेल, डायमिथिल थॅलेट, बेंझिल बेंझोएट किंवा डाय-एथिल टोल्युमाइड यांसारखी रसायनं पायांवरील कपड्यांच्या भागाला किंवा त्वचेला लावल्यास जवळ येऊ पाहणाऱ्या पिसवांना दूर पिटाळणं सहज शक्य होतं. मात्र या वा इतर कुठल्याही रसायनांचा वापर करण्याआधी तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणं, सुरक्षेसंबंधीचे नियम पाळणं विसरता कामा नये.

अनेक प्राणघातक रोगांचा वाहक असल्याने, संसर्गजन्य रोगांचा फैलाव करून मानवजातीस घातक ठरणाऱ्या या कीटकावर नियंत्रण मिळवणं वा त्याचा नाश करणं हे अलीकडे फार-फार महत्त्वाचं मानलं जाऊ लागलेलं आहे. पिसवांमुळे गेल्या सहस्त्रकात तीन वेळा झालेला अपरिमित मानवसंहार या एकाच गोष्टीवरून खरं तर पिसूचं महा-उपद्रवमूल्य समजून घेता येण्यासारखं आहे.

- सिद्धार्थ अकोलकर