तरस - एक हिंस्त्र पशु

तरस हा श्वानवर्गातील म्हणजे कुत्र्यांच्या वर्गातीलच एक प्राणी असून पहिल्या प्रजातीच्या तरसाची उंची खांद्यापर्यंत एकोणीस इंचापासून पंचवीस इंचापर्यंत असते आणि लांबी तोंडापासून शेपटीपर्यंत अदमासे सव्वा तीन फूट इतकी असते.

तरस - एक हिंस्त्र पशु
तरस

जगाच्या बहुतांशी भागात आढळणारा एक वन्य पशु म्हणजे तरस. तरसाचे रूप पाहून त्याच्याविषयी आपल्या मनात एक भीती असते कारण हा पशु मुळात एक हिंस्त्र पशु आहे. तरसाच्या एकूण तीन प्रजाती आढळतात त्यापैकी एक प्रजाती आफ्रिका खंडातील काही प्रदेशात आणि आशिया खंडातील सीरिया, इराण, भारत या देशात प्रामुख्याने आढळते व त्यांच्या अंगावर पट्टे व ठिपके असतात आणि त्यांची केस भिसाळ असतात. तरसाची दुसरी व तिसरी प्रजाती आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात केप ऑफ गुड होप नावाचे ठिकाण आहे त्याठिकाणी विपुल प्रमाणात आहेत. 

तरस हा श्वानवर्गातील म्हणजे कुत्र्यांच्या वर्गातीलच एक प्राणी असून पहिल्या प्रजातीच्या तरसाची उंची खांद्यापर्यंत एकोणीस इंचापासून पंचवीस इंचापर्यंत असते आणि लांबी तोंडापासून शेपटीपर्यंत अदमासे सव्वा तीन फूट इतकी असते. रंग पांढरट असून त्यावर राखाडी रंगाचे आडवे पट्टे असतात. तरसाच्या पाठीच्या पुढच्या भागावर राठ, मजबूत आणि लांब असे केस असतात. तरसाचे शरीर हे पुढील बाजूस अत्यंत बळकट असले तरी तेवढेच कमजोर मागील बाजूस असते. तरस चालताना आपले डोके खाली करून चालत असतो. 

दुसऱ्या प्रजातीचा तरस बऱ्यापैकी पहिल्या प्रजातीच्या तरसासारखाच मात्र आकाराने थोडा लहान असतो आणि त्याच्या शरीराचा रंग पिवळट असून त्यावर काळे ठिपके असतात. तिसऱ्या प्रजातीच्या तरसाच्या शरीरावर लांब, राठ आणि भिसाळ केस विपुल असतात. असे म्हणतात की या प्राण्याने कितीही खाल्ले तरी हा कायम उपाशी असतो त्यामुळेच कायम शिकारीसाठी तरसलेला म्हणून यास तरस असे म्हणत असावेत किंवा तरसलेला या शब्दाची उत्त्पत्तीच तरसापासूनच झाली असावी.

तरस प्राण्याचा स्वभाव हा खादाड, हिंस्त्र व क्रूर असून तो शरीरानेही अतिशय ताकदवान असतो आणि त्याचे रूपही भयानक असते. तरस हा प्राणी स्वतंत्रपणे वावरणारा असून त्याला प्रतिबंध मानवत नाही. तरसाचे आणखी एक वैशिट्य म्हणजे स्वतः शिकार करण्यासोबत तो दुसऱ्याने केलेली शिकार लुटण्यासाठीही प्रसिद्ध आहे. 

अनेकदा तर तरस आपल्यापेक्षा ताकदीने कितीतरी अधिक अशा वाघ सिंहादि पशूंनी केलेली शिकारही लुटून नेतो. तरस हा समूहात राहत असल्याने व त्याच्यात विलक्षण धैर्य असल्याने तो कधीकधी आपल्यापेक्षा बलवान अशा प्राण्यासोबतही लढू शकतो. काही तरस मिळून एखाद्या सिंहासही जायबंदी करू शकतात. तरसाची नजर ही दिवसा कमजोर मात्र रात्री अतिशय तीक्ष्ण असते आणि त्याचा मागील भाग पुढील भागातून कमजोर असल्याने तो पळत असला की लंगडतोय असे वाटते. तरस प्राण्याचा आवाजही अतिशय विचित्र व भय निर्माण करणारा असतो. तो ओरडू लागला की कोणी तरी रडत आहे किंवा उलटी करत आहे असे वाटते.

पहिल्या व दुसऱ्या प्रजातीच्या तरसांचा निवास गुहांमध्ये, बिळांमध्ये अथवा खडकाच्या खबदाडीत असतो तर तिसऱ्या प्रजातीचे तरस समुद्रकिनारी राहतात आणि परिसरातील कुजलेल्या मांसावर आपली गुजराण करतात. तरसाची नजर रात्री तीक्ष्ण असल्याने ते सहसा रात्री शिकारीस बाहेर पडतात आणि हरण, गायी, मेंढ्या आदींना मारून खातात. तरस हे मेलेल्या जनावराचे कुजलेले मांस सुद्धा खाऊ शकतात व कधी कधी त्यांनी मनुष्याची पुरलेली प्रेतेही उकरून खाल्ल्याची उदाहरणे आहेत. तरसाचा निसर्गास होणारा प्रमुख फायदा म्हणजे ते कुजलेली प्रेते खात असल्याने रोगराईचा धोका कमी होतो.