इतिहास भवानी तलवारीचा
इतिहास भवानी तलवारीचा या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऐतिहासिक संदर्भ असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऐतिहासिक व्यक्तीरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे इतिहास अभ्यासकांमध्ये असल्याने ती आजही एक रहस्य बनून राहिली आहे. भवानी तलवारीच्या इतिहासावरील गूढ वलय दूर व्हावे या प्रामाणिक भावनेतून ऐतिहासिक साधने व विविध इतिहास संशोधकांच्या लेखनाचा सूक्ष्म अभ्यास करुन इतिहास भवानी तलवारीचा हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.
या पुस्तकाचे वेगळेपण हे आहे की, हा विषय इतरांपेक्षा खूपच निराळा आहे. शिवछत्रपतींनी वापरलेल्या तलवारींपैकी सर्वात प्रसिद्ध अशा भवानी तलवारीबद्दल ऐतिहासिक साधनांमधून व भारतीय तसेच विदेशी इतिहास संशोधकांच्या लेखांतून आलेल्या उल्लेखांचे हे संकलन आहे. या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऐतिहासिक संदर्भ असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत.
परंतु हे पुस्तक म्हणजे निव्वळ संकलनच नाही, तर कोकणातील सावंतांसारख्या अपरिचित ऐतिहासिक घराण्याचा परिचय देखील या पुस्तकात करून दिलेला आहे. ऐतिहासिक साधनांतील काय सावंत व त्यांचा मुलगा माल सावंत यांच्या उल्लेखांची सांगड शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीशी जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच भारतीय आणि विदेशी लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या लेखांमधील भवानी तलवारीविषयीचे वेचे एकत्र दिले आहेत. त्यामुळे हे नुसते लेखांचे व संदर्भाचे संकलन झालेले नाही, तर त्यातून एक विचार समोर आला आहे. अशा पद्धतीने पुस्तकाद्वारे एखाद्या ऐतिहासीक शस्त्रावरील माहितीचे संकलन करणे ही काळाची गरज आहे.
शोध घेत संकलन करून एका ऐतिहासिक वलयांकित तलवारीची कहाणी या पुस्तकात मांडली मांडली आहे. संशोधनातील परिमाण वापरून दस्तावेज, प्रत्यक्ष फिरून भेटून त्याचे मुद्दे मांडून, योग्य गरजेचे आणि नेमके लिहून, मोहित करणारा इतिहास अन् ऐतिहासिक वस्तू वर गोष्टी न रंगवता, अभ्यासपूर्ण स्वतः चा नजरेस जे दिसते ते अंग संकलित करून हे पुस्तक वाचकांसमोर आणले गेले आहे.
भवानी तलवारीचा इतिहास नेमकेपणाने मांडलेल हे पुस्तक वाचकांसाठी नक्कीच संग्राह्य असे आहे. या विषयावर नेमकंच लिखाण झालं आहे, मात्र जे आहे त्यात लेखकाने आपली प्रतिभा, लेखन आणि अभ्यासून केलेलं संकलित गाभा ओतला आहे. वाचक एका बैठकीत हे पुस्तक वाचून काढेल हे निश्चित!
इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर फारसे लेखन झालेले नाही. सोष्टे यांनी या निमित्ताने केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. शिवकालीन इतिहासावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस हे पुस्तक उतरेल असा विश्वास आहे.