शिलालेखांच्या विश्वात
महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ताजमहाल, गोलघुमट, इब्राहिम रोजा यांच्यासारख्या भव्य दिव्य वास्तू उभारल्या नाहीत हे सत्य आहे, पण मंदिरे, विहिरी, घाट, संतमहंतांच्या समाध्या, गावाच्या वेशी, गढ्या, मठ वगैरे लोकोपयोगी कामे करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली ही महत्त्वाची गोष्ट शिलालेखांवरून स्पष्ट होते.
शिलालेख हे इतिहासाचे समकालीन, अस्सल व विश्वसनीय असे साधन आहे. परंतु इतिहासलेखनात जसा कागदपत्रांचा, ताम्रपटांचा किवा नाण्यांवरील मजकूराचा प्रभावीपणे वापर केला गेला, तसा शिलालेखांचा केला गेला नाही. खासकरून मराठ्यांच्या इतिहासात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. या दुर्लक्षित साधनाकडे सामान्य वाचकापासून ते इतिहाससंशोधकापर्यंत सर्वांचे लक्ष वेधावे ह्या दृष्टिकोनातून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्यात फक्त राजकीय दृष्टीकोन विचारात घेतलेला नाही, तर सामाजिक व धार्मिक मुद्यांबरोबरच भाषा, स्थापत्यकला वगैरे महत्त्वाच्या बाबींचा देखील समावेश केलेला आहे.
महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ताजमहाल, गोलघुमट, इब्राहिम रोजा यांच्यासारख्या भव्य दिव्य वास्तू उभारल्या नाहीत हे सत्य आहे, पण मंदिरे, विहिरी, घाट, संतमहंतांच्या समाध्या, गावाच्या वेशी, गढ्या, मठ वगैरे लोकोपयोगी कामे करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली ही महत्त्वाची गोष्ट शिलालेखांवरून स्पष्ट होते. या लोकोपयोगी कामांमध्ये महिलाही मागे नव्हत्या. गावातील जोशीच्या पत्नीपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांपर्यंत सर्वांनी आपापल्या पद्धतीने हे समाजकार्य केले हे देखील शिलालेखांतून स्पष्ट होते.
मराठी लोकांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, गुजराथ, उत्तर प्रदेश, गोवा वगैरे राज्यांमध्ये जाऊन लोकोपयोगी कामे केली आहेत. स्थानिक लोकांच्या श्रद्धेचा त्यांनी आदर केला ही बाब शिलालेखांमधून समोर येते. या संदर्भात गुजराथ राज्यातील डभई येथील हिरा दरवाज्यावर कोरलेला मराठी शिलालेख बराच बोलका आहे. नेपाळमधील शिलालेखातील मराठी नावेआडनावे लक्षवेधी आहेत, तर प्रतिनिधी घराण्यातील महिलांनी काशीसारख्या तीर्थक्षेत्री जाऊन केलेली बांधकामे त्यांच्या उदारपणाची द्योतक आहेत.
असा इतिहास शिलालेखांमधून बाहेर येतो, त्यामुळे इतिहासाच्या एका दुर्लक्षित साधनाकडे लक्ष वेधून घ्यावे, त्यांचे जतन व संवर्धन करावे आणि त्यातून समोर येणाऱ्या माहितीवरून विचारपरिवर्तन घडावे या उद्देशांनी स्नेहल प्रकाशनाने नव्या जोमाने आणि मोठ्या आशा-अपेक्षांनी हे पुस्तक वाचकांच्या दरबारी आणले असून आय.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनासुद्धा है। पुस्तक उपयुक्त ठरेल यात काही शंकाच नाही.
पुस्तक - शिलालेखांच्या विश्वात
लेखक - महेश तेंडुलकर
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन
पाने - ६८८