कापूर - प्रकार व फायदे

वैद्यकशास्त्रात कापूर हा कडू, तिखट, थंड, कंठसुधारक, कफवात हारक आणि जंतुनाशक इत्यादी गुणधर्म असलेला मानण्यात आला आहे.

कापूर - प्रकार व फायदे
कापूर

दैनंदिन पूजासामग्रीत वापरला जाणारा अत्यंत महत्वाचा पदार्थ म्हणजे कापूर. संस्कृत भाषेत कापुरास कर्पूर तर इंग्रजीमध्ये कंफोर म्हणून ओळखले जाते. कपूर हा भारतातील पूजापद्धतीत कधी उपयोगात आणला गेला याची स्पष्ट माहिती मिळत नसली तरी त्याचा उल्लेख सर्वप्रथम नरहरी पंडित लिखित राज निघंटु या ग्रंथात आढळतो व या ग्रंथात कापूरचे आरोग्यवर्धक गुणधर्म प्रतिपादित केले गेले आहेत. 

प्राचीन काळात कापूर हा प्रामुख्याने आशियातील बौद्ध धर्मीय देशांत प्रथम वापरला गेला असावा. चीन आणि श्रीलंकेत बौद्धधर्माचा प्रसार झाल्यावर तेथील धर्म प्रचारकांकडून कापूर भारत देशात प्रचलित झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.

कापूर हा प्रामुख्याने पूजा, सुगंधी पदार्थ आणि वैद्यकशास्त्रात अतिशय महत्वाचा मानला गेला असून कापूरचे एकूण तीन मुख्य प्रकार मानले जातात व त्यांची नावे भीमसेनी कापूर, चिनी कापूर आणि पत्री कापूर अशी आहेत.

कापूर हा पदार्थ एका वनस्पतीपासून तयार होतो व प्राचीन काळी ही वनस्पती आशिया खंडाच्या पूर्वेस विपुल प्रमाणात आढळत असे. मलेशिया, इंडोनेशिया, जपान, चीन आदी देशांत कापराची झाडे प्रामुख्याने आढळत व प्राचीन काळी मलेशिया येथून भारतात कापराची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाई.

वैद्यकशास्त्रात कापूर हा कडू, तिखट, थंड, कंठसुधारक, कफवात हारक आणि जंतुनाशक इत्यादी गुणधर्म असलेला मानण्यात आला आहे. कापूर हा सुंगधी पदार्थांत सुद्धा वापरला जातो व आजही नुसत्या कापराचा धूर वातावरणात सुगंध निर्माण करण्यासाठी वापरला जातो हे आपण जाणतोच.  

भीमसेनी कापूर - कापराचे जे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत त्यापैकी भीमसेनी कापूर हा आग्नेय आशिया खंडातील मलेशिया, इंडोनेशिया मधील जावा आणि सुमात्रा आदी द्वीप येथे उत्पन्न होतो. सुमात्रा द्विपात कानसूर अथवा बरास म्हणून एक ठिकाण आहे तेथे हा कपूर मोठ्या प्रमाणात तयार होतो. भीमसेनी कापूर हा सर्वात महाग कापूर समजला जातो. 

चिनी कपूर - दैनंदिन वापरात असणारा कपूर म्हणजेच चिनी अथवा चीनई कापूर. सिनॅमॉमम कॅम्फोरा नावाच्या झाडापासून हा कापूर तयार होतो आणि प्रामुख्याने चीन आणि जपान आदी देशांत या कापराची निर्मिती होते. भीमसेनी आणि पत्री कापराहून हा अधिक स्वस्त असल्याने हा कापूर सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो.

पत्री कापूर - हा कापूर चीनमध्ये आणि ब्रह्मदेशात आढळणाऱ्या ब्लुमिया बालसोमिफेरा या वनस्पतीपासून तयार केला जातो.  पत्री कापूर भीमसेनी कापराहून अधिक वजनदार असतो मात्र हवेत याचे विघटन वेगाने होते. पत्री कापूर हा असा कापूर आहे ज्याची आयात भारतात फारशी केली जात नाही त्यामुळे भारतात भीमसेनी आणि चीनई कापूर हेच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.