शेखमीरा वाडा - पसरणी

पसरणी गाव म्हणजे ख्यातनाम शाहीर साबळे व उद्योजक बी.जी.शिर्के यांची जन्मभूमी तर शिवकाळात अफजलखानाला यमलोकात घेऊन जाणारा पसरणी घाटाची वाट. मग डोळ्यासमोर उभा राहिला छ.शाहू महाराजांच्या काळातील शेखमिरा. - सुरेश शिंदे

शेखमीरा वाडा - पसरणी

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी रविवार असल्याने वाईशेजारी असलेल्या पसरणी गावातील नबाब वाडा किंवा शेखमिरा वाडा पाहण्यास जाण्याचे मनातील विचार श्री.वैभवकुमार साळवे यांना सांगितले आणि त्यांनी होकार देताच वाई येथील आमचे स्नेही श्री. रोहित शिवाजी मुंगसे यांना चलभाषवर संपर्क केला. मग सकाळी १०:३० वाजता दुचाकीवरून आमचा वाईचा प्रवास सुरू झाला अर्थातच अंबाडखिंड घाट मार्गाने.

भोर व वाई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या घाटातील संस्थान काळातील अन्नछत्र ओलांडून पुढे गेल्यावर समोर दिसणारा हिरवाईने नटलेला पांडवगड मनाला सुखावत होता तर कृष्णानदीवर असलेल्या धोम धरणाचे दृश्य विलोभणीय दिसत होते. घाटात विविध रंगाची फुले हिरवाईचे सौंदर्य खुलावित होते. वाईमधे पोहोचल्यावर श्री. रोहित शिवाजी मुंगसे यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते त्यांच्या शिंदे नावाच्या मित्रासोबत आले. मग दोन्ही दुचाकी पसरणीच्या दिशेला निघाल्या. वाईपासून सुमारे तीनचार कि.मी.अंतरावर असलेल्या शेखमिरा यांच्या वाड्यासमोर पोहोचलो. वाड्याच्या प्रवेशद्वाराची कमान कालौघात क्षतिग्रस्त झाली असली तरी आपल्या वैभवाच्या खुणा सांभाळून आहे. उत्तराभिमुख इमारतीचा पश्चिमेस असलेला मिनार लक्ष वेधून घेतो. 
कधीकाळी या वाड्याभोवती सुरक्षा तटबंदी होती ती नष्ट झाली आहे. इमारतीसमोर श्री.शेलार नावाचे गृहस्थ होते त्यांनी आमचे स्वागत करून वाडा पाहण्यास होकार दर्शविला. समोरील सोप्यातील मिनारच्या बाजूचा दरवाजा उघडला. आतील भागात श्री गणेशोत्सवाची तयारी चालू होती. मग पायऱ्यांचा दादरानी छतावर पोहोचलो. सर्व बांधकाम दगड, वीट व चुन्यामधे केले आहे. छतावर गेल्यावर आजूबाजूच्या परिसरात चौफेर नजर फिरते. पसरणी गाव म्हणजे ख्यातनाम शाहीर साबळे व उद्योजक बी.जी.शिर्के यांची जन्मभूमी तर शिवकाळात अफजलखानाला यमलोकात घेऊन जाणारा पसरणी घाटाची वाट. मग डोळ्यासमोर उभा राहिला छ.शाहू महाराजांच्या काळातील शेखमिरा.  

इ.स.१७०७ मधे छ. शाहू महाराजांची मोगलांनी सुटका केल्यावर ते महाराष्ट्रात आले. वाटेतच खेड-कडूस येथे ताराराणी सैन्य व शाहू सैन्याचा संघर्ष झाला. ताराराणीच्या सेनापतिपासून बरीच मंडळी शाहूच्या पक्षात आल्याने ताराराणीचा पक्ष कमजोर होऊन पराजित झाला. पुढे शाहू महाराज शिरवळ येथे आल्यावर शंकराजी नारायण सचिव रोहिडा किल्ल्यावर होते, त्यांना शिरवळला येण्याचे महाराजांनी कळविले. सचिवांनी ताराराणीशी दुध भाताची शपथ घेतली असल्याने ते ती शपथ मोडू शकत नव्हते, त्याचबरोबर स्वराज्याचा खरा वारसदार असलेल्या महाराजांच्या आदेशाचा अव्हेर देखील करू शकत नव्हते. अशावेळी सचिवांनी संन्यास घेऊन आंबवडे येथे देह त्यागला. सातारचा किल्ल्ला ताराराणी यांच्या ताब्यात होता. महाराज सातारच्या दिशेने जाताना सातारचा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे होते. ताराराणीच्या वतीने सातारचा किल्ला प्रतिनिधी यांच्या सत्तेखाली होता. छ. शाहू महाराजांनी त्या किल्ल्यावरील हवालदार असलेल्या शेखमिरा याला आपल्या बाजूला करून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबाला पकडून आणले. मग शेखमिराने ताराराणी पक्षाच्या परशुरामपंत पंतप्रतिनिधीला किल्ला शाहूच्या ताब्यात देण्याचे बोलणे सुरू केले तेव्हा परशुरामपंत तयार झाले नाहीत म्हणून शेखमिराने भेद करून परशुरामपंतांना अटक करविली व सातारचा किल्ला शाहूंना महाराजांना मिळाला.

शेखमिरा हा वाई येथील त्यांच्या घराण्याचा मूळपुरूष होय. तो फौजेतील पायदळातील लहानसा अंमलदार होता. त्याने सातारच्या किल्ल्यासाठी केलेल्या मदतीच्या बदल्यात महाराजांनी वाईच्या शेखमिरा यास पसरणी गाव इनाम, साठ स्वारांची मनसब व त्याच्या खर्चासाठी चाळीस हजार रुपयेची नेमणूक व दरमहा १८०० रुपयांचा सरंजाम सुरू केला. त्यानंतर पसरणी गावाच्या परिसरातील नऊ गावचा मोकासा शेखमिरा यांस मिळाला. इ.स.१७१९ ते  १७३२ पर्यंत पसरणी गाव, वाई मधील जमीन, एरंडोल व दर्यापूर महालाचा मोकासा याचा समावेश होता. १७३४ मधे शेंदुरजणे गावी पंधरा बिघे जमीन देवस्थान इनाम म्हणून मिळाली. तो १७३४ दरम्यान मरण पावला असावा पण त्याला वारसपुत्र नसल्याने त्याचा दत्तकपुत्र खानमहंमद हा वारसदार असल्याने तो सर्व मिळकितीचा मालक झाला. तो १७८५ पर्यंत जीवंत असावा व आपल्या वतनाचा कारभार सांभाळून होता. त्याचा मुलगा यांस पेशव्यांनी इनाम व सरंजाम तसाच पुढे चालू ठेवला. १८०६ साली शेखमिरा यांच्या इनामात करंजखोपचा देखील समावेश झाला. इ.स.१८१८ मधे ब्रिटिशांची सत्ता सुरू झाल्यावर मुंबई गव्हर्नर माउंटस स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने शेखमिरा यांचे इनाम तसेच सुरू ठेवले. १८२८ मधे शेखमिराचा तत्कालीन वारसदार मृत्यू पावला तेव्हा त्यास मोठा मुलगा खानमहमद व धाकटा अब्दुल उर्फ गुलाम कादर हा होता. शेखमिराचा मोठा मुलगा हा इनामाचा वारसदार म्हणून इंग्रजांनी मान्यता दिली. १८३५ मधे खानमहमद हा कर्जबाजारी झाल्याने बराचसा भाग वसुलीसाठी सावकारांनी जप्त करण्यात आला. पुढील काळात खानमहमद व गुलामकादर यांच्यात वाटणीचा दावा बरेच वर्षे चालला. १८६१ मधे कंपनी सरकारच्या काळात दाव्याचा निकाल होऊन गुलामकादर यांस वाटणी मिळाली तर खानमहमदचा दत्तकपुत्र सुलतान सानी ह्याचे सरंजाम सरकार जमा करून घेतला. 

हा सर्व इतिहास डोळ्यासमोरून जात असताना आम्ही मिनारातून पायऱ्या उतरून दर्शनी सोप्यात आलो होतो. सोप्यात तत्कालीन रंगीत फरशी पाहात होतो, ही त्याकाळी बाहेर देशातून आणली असावी असा मनात विचार आला मात्र सत्य इतिहासालाच ज्ञात. श्री.शेलार यांना धन्यवाद देऊन आम्ही पसरणी गावातील ओढ्यालगत असलेल्या ऐतिहासिक चौकोनी बारवेजवळ पोहोचलो. घडीव दगडी बांधकामातील भव्य बारव आपले अस्तित्व सांभाळून आहे. पश्चिमेस पायऱ्या असून पूर्वेकडील बाजूच्या देवकोष्ठकात श्री गणेशाची शेंदूर लेपनातील मूर्ती असून पश्चिमेकडील पायऱ्यांच्या दोहोबाजूस पूर्वाभिमुख दोन देवकोष्ठके असून दक्षिणेकडील देवकोष्ठकात नागदेवतेच्या अलिकडीलच्या काळात स्थापित केलेल्या मूर्ती आहेत. बारवेशेजारी समाधिशिळा व सतिशिळा आढळून येतात तर शेजारी असलेले एकाच दगडात कोरलेले पाणी साठवण शिळा आहे.  

मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. धोम धरणाचा पाणी कालव्याच्या बाजूने पसरणी घाटातून महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचलो. मग श्री.रोहीत मुंगसे यांचे मार्गदर्शक असलेल्या श्री.प्रशांत डोंगरे यांच्या हाॕटेलमधे सर्वांशी गप्पागोष्टी करीत चहापान केले व सर्वांचा निरोप घेऊन भोरच्या दिशेने निघालो.              

संदर्भ -  १) श्रीक्षेत्र वाई - वर्णन  - लेखक - गोविंद विनायक आपटे  - आवृत्ती - जानेवारी १९११ - किंमत - आठ आणे पृ.संख्या - ९६   
२) ) पेशवेकालीन महाराष्ट्र  - लेखक - वासुदेव कृष्ण भावे  - प्रथमावृत्ती - डिसेंबर १९३५ - किंमत - ३ रुपये  - पृष्ठ संख्या - ५५८

- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])