नागेश्वर - भोर तालुक्यातील गूढरम्य शिवमंदिर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा विविधांगी पर्यटन स्थळांनी नटलेला जिल्हा आहे. या भोर तालुक्यात खुद्द भोर शहरापासून अदमासे १३ किलोमीटर अंतरावर आंबवडे या गावात नागेश्वराचे एक अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे.

नागेश्वर - भोर तालुक्यातील गूढरम्य शिवमंदिर
नागेश्वर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा विविधांगी पर्यटन स्थळांनी नटलेला जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या भोर तालुक्याच्या पूर्वेस रायगड जिल्ह्याची हद्द असल्याने ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या भोरची संस्कृती ही काही कोकणातील तर काही पश्चिम महाराष्ट्रातील आहे. प्राचीन काळापासून वरंधा घाटमार्गे जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील भोर हे एक महत्वाचे ठिकाण. शिवकाळातही भोर तालुक्यातील कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाले यांनी स्वराज्याची सेवा केली व शिवोत्तर काळातही भोर तालुक्यातील अनेकांनी आपल्या कर्तबगारीने इतिहासात आपले नाव कोरले.

पंतसचिवांनी भोरला आपल्या मुख्य शहराचे स्थान दिले. ब्रिटिश काळात भोर संस्थांची व्याप्ती प्रचंड होती. अगदी रायगड जिल्ह्यातील विद्यमान सुधागड तालुका भोर संस्थानाचा भाग होता. पंतसचिव हे सुधागड किल्यावर काही काळ राहिले असल्याने याशिवाय त्यांची कुलदेवता भोराई ही सुधागड किल्ल्यावरच असल्याने त्यांच्यासाठी संस्थानाचा हा भाग अतिशय महत्वाचा होता. 

तर या भोर तालुक्यात खुद्द भोर शहरापासून अदमासे १३ किलोमीटर अंतरावर आंबवडे या गावात नागेश्वराचे एक अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. भोर ते आंबवडे हा रस्ता म्हणजे भोरमार्गे कोकणातील महाड येथे जाणाऱ्या राजरस्त्यावरच निम्मा असून आंबेघर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातून डावीकडे जो फाटा फुटतो तो आंबवडे येथे जातो. रस्त्याने जाताना डाव्या बाजूस किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड आपली साथ देत असतो. नाझरे या गावापासून अगदी थोड्याच अंतरावर आंबवडे हे गाव लागते. 

वाहनातून खाली उतरल्यावर उजव्या बाजूस एक फलक दिसून येतो ज्यावर जिजीसाहेब झुलता पूल, नागेश्वर मंदिर असे लिहिलेले दिसून येते याच फलकाच्या बाजूने पाहिल्यास एक अतिशय विलक्षण असा पूल आपल्याला दिसून येतो ज्यास जिजीसाहेब झुलता पूल असे म्हणतात. या पुलावर वेगळा लेख होऊ शकतो म्हणून अधिक खोलात न जात आपण याच पुलाला ओलांडून समोर असलेल्या नागेश्वर मंदिरात जाऊ. 

नागेश्वर मंदिराचा परिसर म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने केली उधळण असून आंबा, चिंच व इतर अनेक जैवविविधतेस चालना देणारी वृक्षराजी या परिसरात दिसून येते. कुठल्याही ऋतूत येथे आल्यास आल्हाददायक हवा ही तुम्हाला मिळेलच अशी सुविधा निसर्गानेच करून ठेवली आहे. पूल ओलांडून आपण पलीकडच्या तीरास लागतो तेव्हा समोरच भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी दिसून येते. या समाधीचे दर्शन घेऊन डाव्या बाजूस वळायचे आणि परत सरळ जाऊन उजव्या बाजूचा रस्ता पकडायचा. येथून जात असताना उजव्या बाजूस काही वीरगळी आणि सतीशिळा दिसून येतात. समोरच खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खाली उतरल्यावर समोरच नागेशवराच्या भव्य अशा मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या बाह्य रुपावरूनच मंदिराची बांधणी अतिशय जुनी असल्याचे समजते मात्र मुख्य दरवाज्यातून आत शिरल्यावर दिसणारे खांब हे निश्चित करतात की हे मंदिर शिलाहार अथवा यादव कालीन आहे. 

मंदिराच्या पायऱ्या चालून आपण जेव्हा वर येतो तेव्हा समोरच सुंदर अशा नंदीचे दर्शन होते. हा नंदी भव्य आहे. येथून आपण जेव्हा मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो तेव्हा यादवकालीन वास्तुशैली येथील स्तंभांच्या रूपात आपल्या नजरेसमोर येते. सभागृहात एकूण सहा स्तंभ समोरासमोर असे आहेत. सभागृहाची उंची थोडी कमी असल्याने आत गेल्यावर थोडा अंधार दिसून येतो. याच सभागृहात जमिनीवर एक भलामोठा कूर्म कोरलेला दिसून येतो. अंधारात सहसा तो समजून येत नाही मात्र तो सुद्धा अतिशय भव्य असा आहे. येथून मंदिराचे गर्भगृह दिसून येते. गर्भगृह अतिशय ऐसपैस असून एखाद्या धार्मिक कार्यप्रसंगी ८-१० लोक बसू शकतील एवढे ते मोठे आहे. मधोमध नागेश्वराचे लिंग असून बाजूच्या पाषाणी भिंतींमध्ये काही कोनाडे आहेत. लिंगाच्या मागे असलेल्या कोनाड्यात मूर्ती आहेत. 

डाव्या बाजूस एक पितळी घंटा दिसून येते व लिंगाच्या वर तांब्याचे अभिषेक पात्र आहे. नागेश्वराच्या लिंगाबद्दल असे म्हणतात की मुख्य लिंग उचलले असता आत काही आकाराने लघु अशी लिंगे पहावयास मिळतात. मात्र हे करण्याअगोदर पुजारी अथवा मंदिराच्या विश्वस्तांची पूर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक. नागेश्वर मंदिराचे एक रहस्य म्हणजे मंदिराच्या मागील बाजूस एक लाकडी दार दिसून येते ज्यातून आत जाण्यास मार्गच नाही आणि वर चढण्यास पायऱ्याही नाहीत. मुळात शिवमंदिरात अथवा कुठल्याही मंदिरात प्रवेश करताना तो सभागृहातूनच केला जातो आणि नागेश्वराची सुद्धा याच पद्धतीची रचना आहे मात्र तरीही हे वेगळे द्वार कशासाठी हे समजून येत नाही. तज्ज्ञांच्या मते पूर्वीच्या काळी मूर्तिभंजकांपासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी अशी योजना करण्यात आली असावी अथवा मंदिराच्या निर्माणकर्त्याच्या कल्पकतेतून ही रचना निर्माण झाली असावी.

मंदिराच्या मागील बाजूस दगडी दीपमाळ आहे. मंदिराचा आसमंत मंदिराप्रमाणेच भव्य आणि दिव्य असून अनेक देवतांची मंदिरे येथे आहेत. सर्व देवड्यांमधील मूर्ती सुद्धा अतिशय पुरातन असून काही साधू तपस्वी लोकांच्या मूर्तीसुद्धा येथे पाहावयास मिळतात. नागेश्वर मंदिरामागे असलेल्या ओढ्याला बारमाही पाणी असते. हा ओढा बनेश्वर मंदिराच्या ओढ्याप्रमाणेच असून पाण्याचा खळखळाट येथील गूढ वातावरणात वेगळीच पार्श्वभूमी निर्माण करत असतो. 

नागेश्वर मंदिराचे दर्शन हे कोणत्याही ऋतूमध्ये आल्हाददायकच असल्याने एकदा येथे येऊन महादेवाच्या दर्शनाबरोबरच येथील रानमेव्याचाही आस्वाद नक्की घ्या. एकदा येथे येणारा परत परत येथे येतो असा आमचा स्वानुभव आहे.