बाळंभट देवधर - मल्लखांब खेळाचे जनक

बाळंभट यांनी आपल्या गावीच वेदाचे अध्ययन पूर्ण केले व थोडे मोठे झाल्यावर १७९६ च्या सुमारास जनार्दनपंत बाळंभट यांना घेऊन पुण्यास आले.

बाळंभट देवधर - मल्लखांब खेळाचे जनक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारताच्या मातीत निर्माण झालेला एक मर्दानी खेळ म्हणजे मल्लखांब. मल्लखांब या खेळात भारतातील पुरुष व स्त्रियांनी उत्तम कामगिरी करून भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. 

अशा या मल्लखांबाचे जनक म्हणजे बाळंभट देवधर. बाळंभट देवधर यांचा जन्म १७८० साली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे या गावी झाला. बाळंभट यांच्या वडिलांचे नाव जनार्दन असे होते. 

बाळंभट यांच्या काळात पेशव्यांचे आप्त असलेले बर्वे यांच्याकडे बाळंभट यांचे वडील जनार्दन हे कामास होते. बाळंभट यांनी आपल्या गावीच वेदाचे अध्ययन पूर्ण केले व थोडे मोठे झाल्यावर १७९६ च्या सुमारास जनार्दनपंत बाळंभट यांना घेऊन पुण्यास आले. 

लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने पुण्यास आल्यावर त्यांनी प्रसिद्ध पहिलवान राघोबा वस्ताद यांच्या तालमीत प्रवेश घेतला. राघोबा वस्ताद हे त्याकाळी पुण्यातील प्रमुख बावन्न पेहेलवानांमध्ये एक असून त्यांना पेशव्यांचा आश्रय होता.

एक दिवस असे झाले की राघोबा वस्ताद यांच्या तालमीतील चेला सदू याने राघोबा वस्ताद यांच्या विरुद्ध पक्षात सामील होऊन थेट राघोबा यांनाच कुस्तीचे आव्हान दिले. यावेळी राघोबांचे वय झाले असल्याने व ते थकलेले असल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारण्यासाठी बाळंभट यांना तयार केले.

यानंतर बाळंभट आणि सदू या दोघांमधील झालेल्या कुस्तीमध्ये बाळंभट यांनी सदुस चितपट केले आणि आपल्या गुरूस खऱ्या अर्थी गुरुदक्षिणा दिली.

या घटनेनंतर बाळंभट यांना पहेलवान म्हणून खऱ्या अर्थी ओळख प्राप्त झाली आणि त्यांना पुण्याच्या पेशवे दरबारात राजाश्रय मिळाला.

त्याकाळी हैदराबादच्या निजामाच्या राज्यात अली आणि गुलाब नावाचे दोन प्रसिद्ध पहेलवान होते व त्यांच्याकडे निजामाच्या राज्यातील अजिंक्यपत्र होते. हे दोघे पहेलवान तेव्हा निजामाच्या आश्रयास आले.

अली आणि गुलाब हे एके दिवशी पुण्यात आपले अजिंक्यपत्र घेऊन आले आणि पेशव्यांची भेट घेऊन त्यांना म्हणाले की आम्ही निजामाच्या राज्यातील अजिंक्य पहेलवान आहोत आणि आपल्या राज्यात जर कोणी आम्हाला आव्हान देणारा असेल तर त्यास आमच्यासोबत कुस्ती लढण्याची परवानगी द्यावी अथवा आम्हाला येथून सुद्धा अजिंक्यपत्र द्यावे.

यावेळी पेशव्यांच्या डोळ्यासमोर बाळंभट यांचे नाव आले मात्र या कुस्तीच्या तयारीकरिता पेशव्यांनी सहा महिन्याची मुदत मागितली आणि बाळंभट यांनी या सहा महिन्यात कुस्तीची उत्तम तालीम घेतली.

या कुस्तीपूर्वी बाळंभट हे सप्तश्रुंगी गडावर गेले व तेथे जाऊन त्यांनी ध्यानधारणा केली व यावेळी साक्षात सप्तशृंगी व मल्लविद्येचे देव श्री हनुमान यांचा अनुग्रह मिळाला.

त्यानतंर पुणे येथे मोठ्या मैदानात बाळंभट आणि अली यांची कुस्ती ठरली आणि हि कुस्ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही कुस्ती सुरु असताना बाळंभट यांनी एक स्वतःहून शोधून काढलेला डाव टाकून अलीला चितपट केले. 

अलीसारखा पहेलवान चितपट झालेला पाहून गुलाब या पेहेलवानाची बाळंभट यांच्यासोबत कुस्ती खेळण्याची हिम्मत झाली नाही आणि बाळंभट यांना अजिंक्यपत्र प्राप्त झाले.

अलीला चितपट करणारे पहेलवान म्हणून बाळंभट संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या तालमीत शिक्षण घेण्यासाठी देशोदेशीहून शिष्य येऊ लागले.

बाळंभट यांच्या तालमीत सर्व धर्माच्या पेहेलवानांना स्थान असे आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांमध्ये त्याकाळातील काशीचे प्रख्यात पहेलवान कोंडभट गोडबोले, अच्युतानंद स्वाम, बाळंभट यांचे पुत्र नारायण गुरु, टक्के जमाल आणि त्यांचे शिष्य जुम्मादादा ही नावे प्रख्यात आहेत.

बाळंभट यांनी मल्लविद्येचे प्रचार व प्रसार केलाच मात्र त्यांनी मल्लखांब हा प्रकार स्वतःहून शोधून काढला व आजही या खेळाचे अनेक अनुयायी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आढळून येतात. १८५२ साली बाळंभट देवधर यांचे निधन झाले मात्र मल्लखांब या विद्येचे जनक म्हणून बाळंभट यांचे नाव अजरामर आहे.