भूतनाथ लेणी - धामणखोल
जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील मानमुकुट उर्फ मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूतनाथ लेणी समूह
महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे नाणेघाटाची निर्मिती झाली. कल्याण, सोपारा, चौल सारख्या बंदराशी जुन्नर बाजारपेठ जोडली गेली. पैठण, तेर, भोकरदन, उजैन अश्या त्यावेळच्या मोठ्या शहराशी जिर्णनगर उर्फ जुन्नर व्यापारी मार्गाने जोडले गेले.
धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बौध्द भिक्षू या व्यापारी मार्गावरून प्रवास करू लागले. आणि मग त्याच्या निवासासाठी, पर्जन्यकाळी आसरा अश्या उदेश्याने या व्यापारी मार्गावर डोंगरात, कातळ खोदून लेण्यांची निर्मिती झाली.
एकट्या जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील मानमुकुट उर्फ मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूतनाथ लेणी समूह...
अंबा अंबिका लेणी समूह पाहून झाल्यावर डावीकडे एक पायवाट गर्द झाडीत जाते, वाटेत डाव्या हाती दगडात कोरलेली पाण्याची दोन टाकी आहेत ती पार केली की, सुमारे १५ मिनिटांत ही पायवाट आपल्याला भूत लेणी समुहाकडे घेऊन येते, मातीच्या १०,१२ पायऱ्या चढलो की आपण दाखल होतो भूत लेणी समूहात, लांबून दिसणारी शिल्पे, मोठी मधाची पोळी आणि मधमाशांच्या आवाज यांनी प्रथमदर्शनीच वातावरण गंभीर बनवते.
भूतनाथ लेणी समूह हा १६ बौद्ध लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ...
● लेणे क्र ३७, इथे बाहेर एक पोढी, पाण्याचे टाके आढळते, त्यावर एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे, त्याचा अर्थ, "कुमीय यांची कन्या सुलसा हिने या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले" असा आहे.
● लेणे क्र ३८, हा विहार असून, चौरस मंडप व दोन खोल्या आहेत. पुढे जमिनीत पाण्याची लहान टाकी कोरलेली आहेत.
● लेणे क्र ३९, हा ही विहार असून ३ स्तंभ व २ अर्धंस्तंभ असून, ५ अपूर्ण खोल्या आहेत. समोर पाण्याचे लहान टाके आहे.
● लेणी क्र ४०, खरंतर या लेणी समुहाकडे आल्यावर प्रथमदर्शनी आपले लक्ष वेधणारी ही प्रमुख लेणी, इथे चैत्यगृह आहे. समोर दर्शनी भाग ११ मीटर उंच आहे, तो खाली रुंद दरवाजा आणि वर तुटलेला गच्चीचा भाग असा दोन भागात विभागलेला आहे.
गच्चीच्या वर सुंदर, नक्षीदार चैत्य गवाक्ष आहे. अगदी वरच्या पट्टीत ७ सुंदर चैत्यकमानी कोरल्या आहेत. डाव्या कोपऱ्यात बोधिवृक्ष कोरलेला असून, त्यावर पुष्पमाला सजवलेल्या कोरलेल्या आहेत. तर उजव्या कोपऱ्यात कोरीवकाम अर्धवट सोडलेले दिसते.
चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंना ठळक मनुष्याकृती कोरलेल्या आहेत. उजवीकडे गरुड तर डावीकडे शेषनागराज शिल्पे कोरलेली आहेत. खरतर गरुड अन् नाग एकमेकाचे शत्रू, तरीपण या चैत्यासमोर आपले वैर विसरून, त्याच्या रक्षणासाठी इथे उभे आहेत, हा त्याचा अर्थ. पूर्वी स्थानिक लोक यांना भुते समजत, त्यामुळे हा लेणी समूह आता भूत लेणी अथवा भूतनाथ लेणी समूह म्हणून ओळखला जातो.
कमानीच्या खालील अर्धगोलास मण्याची झालर असून त्यात मध्यभागी गजलक्ष्मी सोबत कमळाच्या सात पाकळ्यावर सुंदर शिल्पे कोरली आहेत. इथे खाली चंद्रकोरीच्या आकारात शिलालेख कोरलेला आहे, त्याचा अर्थ, "यवन ( ग्रीक ) चंद्र याने गर्भद्वार दान दिले" असा आहे. यावरून त्याकाळी बौध्द धर्म आणि व्यापार कुठपर्यंत पोहोचला होता याचा प्रत्यय येतो.
आतमध्ये चैत्यगृह असून, याचा आलेख चापाकार असून, छत गजपृष्ठाकृती आहे. डाव्या बाजूस ४ अष्टकोनी स्तंभ असून, उजव्या बाजूचे अपूर्ण अवस्थेत आहेत, सर्वात मागे स्तूप असून, त्यावर हार्मिका नाही. या लेण्याची निर्मिती इस पहिल्या शतकातील असल्याचे इतिहास अभ्यासकांनी नोंद केली आहे.
● लेणी क्र ४१ ते ४७, हे सर्व विहार असून, खोल्यांच्या प्रवेशद्वारावर नक्षीदार चैत्यकमानी कोरलेल्या आहेत.
लेणी अभ्यासकांनी दिलेल्या संदर्भाचा विचार केल्यास, येथील शिलालेखात या डोंगराचे नाव "मानमुकुड" (संस्कृत मध्ये "मानमुकुट") असे दिले आहे. आजही ते "मानमोडी" या अपभ्रंश रुपात जवळपास दोन हजार वर्षा नंतरही प्रचलित आहे. या लेण्यांमध्ये खूप साऱ्या मधमाश्या आहेत, तेव्हा खूप काळजी घ्यावी. परफ्यूम स्प्रे, विडी, सिगारेट पासून या भागात दूर रहावे.
शिवजन्मभुमी जुन्नर परिसर, लेण्याबाहेर असलेली नीरव शांतता, मधमाश्यांच्या वावर आणि शांतता भेदणारा आवाज, लेण्यांमधील थंड, गूढरम्य वातावरण अन मूर्ती व लेणी अभ्यासक सदानंद आपटे काकांनी सांगीतलेली अभ्यासपूर्ण माहिती!!! एक ना अनेक कारणांनी ही लॉकडाऊन मधील जुन्नर भेट, अविस्मरणीय ठरली हे मात्र खरं..
पुढच्या लेखात भेटू, लेण्याद्री, गणपती लेणी समूह पहायला! मग येताय ना सोबत...
संदर्भ -
- जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी - सदानंद आपटे
- जुन्नर शिवनेरी परिसर - सुरेश वसंत जाधव
- लेणी महाराष्ट्राची - दाऊद दळवी
- प्राचीन महाराष्ट्र - डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर (प्र आ १९३५)(दु आ १९८९)
- ऍड हेमंत वडके