हिंगुलडोहावरील हिंगुलकरीण माता

या भागास हिंगुळ डोह या नावाने ओळखले जाते. डोह म्हणजे नदीच्या पात्रातील खोल स्थान. जानसई नदीच्या पात्रातील हा डोह सुद्धा खोल व गूढ आहे आणि या परिसराचे अधिदैवत आहे हिंगुलकरीण माता.

हिंगुलडोहावरील हिंगुलकरीण माता
हिंगुलकरीण माता

कोकणात गूढ दैवते पुष्कळ आहेत. काही देवता या गावात तर काही गावांच्या वेशीवर असतात तर काही अगदीच गावाच्या आसमंतात एखाद्या शांत व गूढ जागी असतात. रायगड जिल्ह्यातील म्हसळे तालुक्यातील हिंगुलकरीण हे दैवत सुद्धा असेच एक गूढ दैवत.

म्हसळे तालुक्यातील मुख्य नदी म्हणजे जानसई नदी. ही नदी घोणसे गावाजवळ उगम पावून पश्चिमेकडे वाहते. नदीची लांबी फार नाही मात्र म्हसळे तालुक्यातील मुख्य नदी असलेली जानसई म्हसळे गावाच्या पाण्याचाही मुख्य स्रोत आहे. माणगावहून आपण म्हसळ्याच्या दिशेने येतो तेव्हा घोणसे घाट उतरून यावे लागते. येथून पुढे लागणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस आपल्याला नदीचे अस्तित्व जाणवू लागते. 

केळेची वाडी, देवघर कोंड, सुरई, ढोराजे अशी काही गावे म्हसळ्यापूर्वी आपल्याला दिसतात ती नदीच्या जवळच आहेत मात्र म्हसळा येण्यापूर्वी एक चेकपोस्ट लागते जेथून एक रस्ता गोरेगाव येथे जातो तर दुसरा माणगाव येथे त्याच ठिकाणी एक छोटा रस्ता उजवीकडे नदीच्या दिशेने जातो. या रस्त्यावर नदीच्या दिशेने जाताना आपल्याला दाट जंगलाचे अस्तित्व जाणवू लागते. नदी बाजूस असल्याने व सदाहरित वनराई विपुल असल्याने परिसरात बऱ्यापैकी थंडावा असतो. काही क्षणातच आपण अशा एका धार्मिक ठिकाणी येतो जे म्हसळेकरांच्या दृष्टीने अतिशय पवित्र आहे.

या भागास हिंगुळ डोह या नावाने ओळखले जाते. डोह म्हणजे नदीच्या पात्रातील खोल स्थान. जानसई नदीच्या पात्रातील हा डोह सुद्धा खोल व गूढ आहे आणि या परिसराचे अधिदैवत आहे हिंगुलकरीण माता. हे देवस्थान नदीच्या किनाऱ्यावर एका प्रशस्त ठिकाणी आहे. खरं तर देवीचे भव्य असे मंदिर येथे नाही. निसर्ग हेच देवीचे मंदिर. नाही म्हणायला एक छोटेखानी मंदिर वृक्षांच्या छायेखाली बांधण्यात आले आहे. मंदिरात देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूस आराध्यदैवत गणेशाची खूप रेखीव मूर्ती आहे व उजव्या बाजूस एका शिळेवर काही मुखवटे आहेत जे देवीचेच असावेत. याशिवाय एक अनोखी वीरगळ सुद्धा येथे पाहावयास मिळते ज्यामध्ये दोन वीर धनुष्य व बाणासहित दिसून येतात. 

देवीच्या स्थानाचा असा इतिहास आहे की हे स्थान फार पूर्वीपासून खूप प्रसिद्ध होते व भक्तांची प्रत्येक इच्छा देवी पूर्ण करीत असे. भक्तांच्या घरी कार्ये असली की या डोहातून चांदीची भांडी बाहेर येत जी कार्याकरिता वापरून मग कार्ये झाली की पुन्हा डोहात सोडून देण्याची प्रथा असे मात्र एका व्यक्तीने ही भांडी परत दिलीच नाहीत त्यामुळे देवीचा कोप झाला व डोहातून भांडी वर येणे बंद झाले. मात्र भक्तांनी करूणा भाकल्याने देवीने वर दिला की या ठिकाणी येऊन माझी प्रार्थना केल्यास आपली प्रत्येक इच्छा मी कायमच पूर्ण करिन.

असेही म्हटले जाते की डोहात असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी जर गवताची पेंडी बांधून ती पाण्यात सोडली असता ती थेट हरिहरेश्वर येथील काळभैरव येथे बाहेर पडते याचा अर्थ डोहाच्या अंतर्भागाचा दक्षिण काशी हरिहरेश्वरशी गूढ संबंध असावा. हिंगुळ डोह हा परिसर अतिशय गूढ व रम्य असून मनास अतिशय प्रसन्नता देणारा आहे. परिसरात मोठं मोठी वारुळे आहेत जी पूज्य मानली जातात याशिवाय नदीच्या पात्रात झाडे असून त्यामुळे या परिसराचे दर्शन एक वेगळाच अनुभव देऊन जाते.

एका धार्मिक मतप्रवाहानुसार हिंगुळकरणी देवी ही हिंगुळजा या शक्तिपीठांपैकी एक अशा देवतेचे मंदिर आहे. हिंगुळजा देवीचे मूळ पीठ हे सध्याच्या पाकिस्तानातील बलुचिस्तानात आहे हे अनेकांना माहित नाही. फार पूर्वी भारताच्या सीमा या अगदी काबुल, कंदहार पर्यंत होत्या त्यामुळे हिंगुळजा देवीचे शक्तीपीठ हे भारतातच होते. पुढे भारतातील काही प्रदेशांची कालपरत्वे विभाजने झाली त्यामुळे कालांतराने हे शक्तीपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात गेले. बलुचिस्तानच्या क्लात नामक शहराच्या दक्षिणेस सुमारे वीस पंचवीस मैल अंतरावरील काही टेकड्या हरबोनी टेकड्या म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी हिंगोळी या नदीचा उगम आहे. ही नदी दक्षिणेस ३०० मैल वाहत जाऊन कराची शहराच्या वायव्येस १०० मैल अंतरावर स्तेन मिआनी या उपसागरात हिंगुळा ही नदी विलीन होते. या भागात एका टेकड्यांमध्ये नदीच्या प्रवाहाच्या बाजूलाच देवीचे स्थान आहे. हे शक्तीपीठ समुद्रसपाटीपासून ३७०० फूट उंचावर असून तेथे जाणे अतिशय अवघड आहे.

हिंगुळजा देवी व हिंगुळकरीण देवी यांच्यात नावाचे साधर्म्य आहेच मात्र याशिवाय या दोन्ही देवींचे स्थान नदीच्या किनारी असून दोन्ही नद्या समुद्रास मिळतात. याशिवाय गडहिंग्लज येथील जे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे तेथील देवीचे व हिंगुळकरीण देवीचे स्वरूपही थोड्या फार प्रमाणात साम्य दाखवणारे आहे. याशिवाय मूळ शक्तीपीठ जेथे आहे त्या नदीचे नाव हिंगोळी असून हिंगुळकरीण देवीचे स्थान हिंगुळ नामक डोहावर आहे.

आधुनिक काळात विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी झाली मात्र देवतांच्या नावाने असलेल्या या देवराया शेकडो वर्षांपासून शाबूत आहेत. ही परंपरा कायम राहावी हिच देवीचारणी प्रार्थना.