मुंबई जवळील किल्ले

आत्ताची मुंबई पूर्वी ७ बेटांचा समूह होते. मराठे, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा विविध राजवटींचा मुंबईवर वेगवेगळ्या काळात अंमल होता. तेव्हाच्या बॉम्बेला शत्रूशी सामना करता यावा यासाठी चारही बाजूंनी किल्ल्यांनी संरक्षित केले गेले होते.

मुंबई जवळील किल्ले
मुंबई जवळील किल्ले

हे किल्ले वेगवेगळ्या काळात संरक्षणाच्या कारणास्तव बांधले गेले. त्यातील बहुतेक किल्ले जरी भग्नावस्थेत असले तरी ते अवशेष रूपाने आजही जिवंत आहेत. त्यांच्या आपल्या जीवनकाळात अनेक मानवी आणि नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. या लेखाद्वारे आपल्या मुंबईच्या समृद्ध भूतकाळाची साक्ष सांगणाऱ्या या किल्ल्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.

बॅसीन किल्ला

इसवी सन १५३६ मध्ये पोर्तुगीजांनी ११० एकरच्या भव्य क्षेत्रफळात बॅसीन म्हणजेच वसईच्या किल्ल्याचे बांधकाम केले. वसईचा किल्ला इंडो-युरोपियन संरक्षण स्थापत्याचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. या एकाच किल्ल्याच्या आवारात ३ कॉन्व्हेंट्स, ६ चर्च आणि एक कॅथेड्रल म्हणजे प्रमुख चर्च होते. इतकेच नव्हे तर अनेक सार्वजनिक व खाजगी मालकीच्या इमारती जसे की सेंट सेबास्टियन फोर्ट, सेनेट हाऊस, टाऊन हॉल, फॅक्टरी, महाविद्यालय, ग्रंथालय, टाकसाळ आणि बाजार असे सगळे होते. जवळजवळ ३०० वर्षे हे पोतुगीजांचे राजकीय, व्यावसायिक आणि संरक्षण ठाणे होते. येथे २४०० सैनिक, ३००सामान्य रहिवासी, काही राजघराण्यातील लोक आणि कारागिरांची वस्ती होती. १७३९ साली पेशवे पहिले बाजीरावांचे लहान भाऊ चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी हा किल्ला काबीज केला व ठिकठिकाणी विजयचिन्हे बांधली. एक मंदिर आणि एक पुतळा या विजयाची साक्ष देतात. पुढे १८०२ मध्ये ब्रिटिशांनी बॅसीनचा तह करून मराठ्यांची भूमी काबीज केली. बॅसीन किल्ल्याच्या दरबाराचे प्रवेशद्वार आजही वसईतील रेमेडी चर्च येथे जतन करून ठेवलेले आहे. या शहरवजा किल्ल्याचा बराचसा भाग जरी अवशेषरूपात उरला असला तरी काही वॉच टॉवर्स, त्यांच्या जिन्यासहित चांगल्या अवस्थेत आहेत. अनेक बॉलिवूड गाण्यांच्या चित्रीकरणासाठी ही जागा सुप्रसिद्ध आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागांतर्गत ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.

सायन किल्ला  

इसवी सन १६७७ आणि १६९९ च्या मध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने एका लहानशा टेकडीवर हा किल्ला बांधला. या किल्ल्याच्या उत्तरेस खाडीपलीकडे असलेले सालसेट बेट आणि अलीकडचे ब्रिटिशांच्या ताब्यातील परेल बेट यांच्यातील सीमा निश्चित करणारा हा किल्ला होता. पूर्वेच्या किनाऱ्याचे सुंदर दृश्य सायन किल्ल्यावरून दिसते. किल्ल्यावर जायला सुंदर पायवाटा आहेत आणि काही पडझड झालेल्या खोल्या आणि माथ्यावर एक जुनी तोफदेखील आहे. किल्ल्याच्या पायथ्याला पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आहे. किल्ल्याच्या एका बाजूने ठाण्यातील मिठागर दिसते. सायन किल्ल्याची ग्रेड १ हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदणी करण्यात आली. २००९ सालापासून या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य सुरू झाले. मात्र निधीअभावी हे काम अर्धवट अवस्थेत थांबवावे लागले.

बेलापूर किल्ला  

१५६०-१५७० मध्ये पोर्तुगीजांकडून बेलापूरचे क्षेत्र जिंकून जंजिऱ्याच्या सिद्दींनी पनवेल खाडीच्या मुखाजवळ बेलापूरचा किल्ला बांधला. १६८२ मध्ये तो पोर्तुगीजांनी सिद्दीच्या राजवटीतील परिसर आणि बेलापूर किल्ला पुन्हा जिंकून घेतला. १७३७ मध्ये पेशव्यांचे सेनानी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी पोर्तुगीजांच्या या किल्ल्यावर आक्रमण केले आणि हा किल्ला जिंकला. चिमाजी अप्पांनी अशी प्रतिज्ञा केली होती की जर हा किल्ला जिंकला तर शेजारील अमृतेश्वराला बेलाचा हार घालू. मराठ्यांच्या विजयानंतर या किल्ल्याला बेलापूर असे नाव देण्यात आले. जून १८१७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यदलांनी हा किल्ला काबीज केला आणि मराठ्यांचा या भागातील अंमल कमी व्हावा या हेतूने याचा काही भाग उध्वस्त केला. असे म्हणतात की या किल्याच्या आत एक भुयार होते ज्यातून एलिफंटा लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या घारापुरी बेटांपर्यंत जाता येत असे. खेदाची गोष्ट ही या किल्ल्याच्या पुनर्स्थापनासाठी काहीही प्रयत्न केले गेले नसून आता ही वास्तू सिडकोच्या अखत्यारीत येते.

अर्नाळा किल्ला

वैतरणा नदीच्या मुखापाशी असलेला सामरिक महत्त्वाचा हा किल्ला १५१६ साली सुलतान मोहम्मद बेगडा या गुजरातच्या स्थानिक सरदाराने बांधला होता. मराठा संरक्षण स्थापत्याचा एक नमुना असलेला हा किल्ला १५३० साली पोर्तुगीजांनी किनारी भागातील आपला अंमल वाढवत हा किल्ला आणि त्याचा परिसर जिंकून घेतला. १७व्या आणि १८ व्या शतकात या प्रांतात मराठा साम्राज्याचे पुनरागमन झाले. पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे असलेला बॅसीन किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांच्या मराठा फौजेने सामरिक महत्त्वाच्या अर्नाळा किल्ल्याचा ताबा घेतला. मराठा आरमाराला पोर्तुगीजांच्या आरामाराशी सामना करण्यासाठी ही मोक्याची जागा होती. मार्च १७३७ मध्ये किल्ल्याच्या उत्तरेकडे मराठ्यांनी विजयाप्रीत्यर्थ लावलेली बांधलेली कोनशिला आजही येथे पाहायला मिळते. चौरसाकृती असलेल्या या किल्ल्यावर त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि शंभू महादेवाचे मंदिर आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्ती आणि वाघांच्या सुंदर चित्रांनी सुशोभित केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागांअंतर्गत ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.

घोडबंदर किल्ला  

इसवी सन १५५० मध्ये पोर्तुगीजांनी उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील घोडबंदर गावात हा किल्ला बांधला. सुरवातीला या किल्लाचे नाव त्यांनी ‘केश द टॅना’ असे ठेवले होते. युरोपियन स्थापत्यशैलीत मोठ्या दगडांचे थर रचून बांधलेल्या या किल्ल्यावर २ चर्च आहेत. यातील एक चर्च अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी पोर्तुगीज अरबी व्यापाऱ्यांसोबत घोड्याचा व्यापार करत असत म्हणून या जागेला घोडबंदर असे नाव देण्यात आले. चिमाजी अप्पांनी १८१८ मध्ये पोर्तुगीज फौजांचा पराभव केल्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आला. ब्रिटिशांनी मग मराठ्यांचा हा किल्ला आपल्या साम्राज्याशी जोडला आणि येथे स्थानिक प्रशासकीय कार्यालय बांधले. किल्ल्याभोवती आजही मोठी तटबंदी आहे आणि बुरुज आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर वॉच टॉवर्स देखील आहेत. नुकतेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग , रत्नागिरी आणि राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासन यांनी या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे कार्य हाती घ्यायचे ठरवले आहे.

रिवा किल्ला

मुंबईतील धारावी येथे मिठी नदीच्या किनारी वसलेला रिवा किल्ला ‘काळा किल्ला’ या नावाने ओळखला जातो. इंडो-ब्रिटिश आर्किटेक्चर शैलीतील या किल्ल्याचे मुख्य बुरुज जांभ्या खडकात बांधले आहेत. मुंबई किल्ल्याचा भाग असलेला किल्ला १७ व्या शतकातील ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील बॉम्बेच्या उत्तरेला होता. तेव्हाचा गव्हर्नर जॉन याने मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देता यावे म्हणून या किल्ल्याची रचना गोलाकार करण्याचा आदेश दिला होता. रिवा किल्ल्यात देखील एक भुयार आहे जे मिठी नदीचा प्रवाह अखंडित राहावा या दृष्टीने बांधण्यात आले होते. राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही वास्तू राज्य संरक्षित वास्तू म्हणून नोंदवली गेली आहे.

शेवरी/ शिवडी किल्ला

इसवी सन १६८० मध्ये परेल बेटावर हा किल्ला बांधला गेला. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून ब्रिटिशांनी हा किल्ला बांधला. १६८९ मध्ये यादी सकट नावाच्या सिद्दीच्या सेनापतीने २०००० लोकांच्या फौजेसह बॉम्बेवर आक्रमण केले आणि पहिल्यांदा शिवडीचा किल्ला काबीज केला. १७७२ मध्ये या किल्ल्यावर आणखी एक लढाई झाली ज्यात ब्रिटिशांनी पोर्तुगिजांचा हल्ला परतवून लावला. स्थानिक साम्राज्यांचे व ब्रिटिशांच्या शत्रूंचे वर्चस्व जेव्हा कमी व्हायला लागले तेव्हा हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जाऊ लागला. सध्या राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेला हा किल्ला ग्रेड वन हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदवण्यात आला आहे. ‘मुंबई फोर्ट सर्किट प्रोजेक्ट’ अंतर्गत या किल्ल्याच्या पुनर्स्थापनाचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरु आहेत. स्थलांतरित पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वागत करणारा दलदल प्रदेश या किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे हा किल्ला पक्षी निरीक्षणासाठी उत्तम मानला
जातो.

या किल्ल्यांबद्दल डॉ. मयूर ठाकरे, असिस्टंट आर्कियॉलॉजिस्ट, राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासन म्हणाले की, “हे किल्ले केवळ दगड-विटांच्या वास्तू नसून ते मुंबईच्या आजच्या महानगराला त्याच्या इतिहासातील खऱ्या स्वरूपाशी जोडणारे दुवे आहेत. मुंबईवर त्या काळी होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायला ते खंबीरपणे उभे राहिले आणि आज कालपरत्वे नामशेष होत आहेत. आपल्या बहुसांस्कृतिक समाजाचे आणि इतिहासाचे ते एकमेव साक्षीदार आहेत. या किल्ल्यांवर संशोधन, संवर्धन आणि पुनर्प्रस्थापन करण्यास पुष्कळ वाव आहे. त्यांचे स्थापत्य निर्माण आणि परिसराचा विकास अधोरेखित व्हावा या दृष्टीने त्यांचे योजनाबद्ध पद्धतीने जतन करणे आणि काळजीपूर्वक संवर्धन करणे आवश्यक आहे. आपल्या इतकेच त्यांचे आयुष्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण त्यांचा आदर करून त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे.

आपल्या संकुचित नागरी गरजा त्यांच्यावर थोपवणे बंद केले पाहिजे. आपण हा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचेल याची खात्री करणे गरजेचे आहे.” असे त्यांनी नमूद केले. मुंबईला वैविध्यपूर्ण संस्कृतीचा आणि एका मोठ्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभला आहे. जरी मुंबईतील काही किल्ले भग्नावस्थेत असले तरीही त्यांना स्थापत्याचे उत्तम नमुने म्हणून आजही पाहिले जाते. हे किल्ले मुंबईच्या इतिहासाची भली मोठी गाथा स्वतःच्या हृदयात बाळगून आहेत.

- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ