कुंभमेळा - एक पुण्ययोग
गुरु हा ग्रह एका राशीत आल्यावर त्यास पुन्हा त्या राशीत येण्यास बारा वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे कुंभमेळा हा प्रामुख्याने बारा वर्षांनीच येतो.
हिंदू धर्मशास्त्रात एक अत्यंत पवित्र मानला जाणारा काळ म्हणजे कुंभ पर्व. कुंभ पर्व हा एक पुण्ययोग असून दर बारा वर्षांनी येणारा योग आहे.
ज्यावेळी सूर्य आणि चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत व अमावस्या हे सर्व योग एकाच वेळी आले की जो कुंभयोग होतो त्यावेळी उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे मोठा कुंभमेळा भरतो.
या काळात प्रयाग तीर्थात स्नानाचा लाभ घेतल्यास एक हजार अश्वमेध, शंभर वाजपेय आणि पृथ्वीभोवती एक लाख प्रदक्षिणा केल्याचे पुण्य लाभते असा शास्त्रात उल्लेख आहे.
मुख्य कुंभपर्वाची सुद्धा तीन उपपर्वे असून पहिले उपपर्व मकरसंक्रांतीस, दुसरे अमावस्येला आणि तिसरे वसंतपंचमीस येते.
या तीन उपपर्वांमध्ये अमावास्येस जे पर्व येते ते सर्वात मुख्य असून या पर्वाला पूर्णकुंभ असे म्हटले जाते. प्रयागव्यतिरिक्त भारतातील हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे कुंभपर्व आहेत. ज्यावेळी कुंभ राशीत गुरु आणि मेष राशीत सूर्य येतो त्यावेळी हरिद्वार येथे कुंभमेळा भरतो. ज्यावेळी गुरु सिंह राशीत आणि सूर्य व चंद्र कर्क राशीत येतात त्यावेळी नाशिक येथे कुंभमेळा भरतो आणि ज्यावेळी सूर्य तूळ राशीत आणि गुरु वृश्चिक राशीत येतो त्यावेळी उज्जैन येथे कुंभमेळा भरतो.
गुरु हा ग्रह एका राशीत आल्यावर त्यास पुन्हा त्या राशीत येण्यास बारा वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे कुंभमेळा हा प्रामुख्याने बारा वर्षांनीच येतो.
हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पुण्यवान योग मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पुढील माहिती मिळते, ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन झाले. मंथन सुरु असताना क्षीरसागरातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले यावेळी देवांना वाटले की जर हे अमृत दानवांना मिळाले तर ते अमर होतील व आपल्याला त्रास देतील. यानंतर देवांनी इंद्राचा पुत्र जयंत यास इशारा केला आणि जयंताने धन्वंतरींच्या हातून अमृतकुंभ हिसकावून पळ काढला.
देवांच्या या कृत्यामुळे दानव क्रोधीत झाले आणि देव दानव यांच्यामध्ये एकूण बारा दिवस आणि बारा रात्री युद्ध झाले. हे युद्ध सुरु असताना एकूण बारा वेळा अमृतकुंभ खाली पडला मात्र यावेळी बृहस्पती, सूर्य, चंद्र आणि शनी आदींनी त्याचे रक्षण केले.
असे असले तरी ज्या बारा ठिकाणी हा कुंभ खाली पडला ती ठिकाणे अत्यंत पवित्र मानली जातात मात्र तो कुंभ खाली पडताना बृहस्पती, सूर्य, चंद्र आणि शनी या चार ग्रहांनी त्याचे रक्षण केल्याने या चार ग्रहांच्या संबंधाने जे योग निर्माण होतात त्याचवेळी कुंभ पर्व सुरु होते.
देव व दानव यांचे युद्ध सुरु असताना कुंभ एकूण बारा ठिकाणी पडला मात्र यापैकी फक्त चार ठिकाणे म्हणजे प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन ही पृथ्वीवर असून इतर आठ स्थाने पृथ्वीलोकाच्या बाहेर असल्याने पृथ्वीवरील फक्त याच चार ठिकाणी कुंभमेळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.