सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय

राशीचक्रातील एक रास म्हणजे सिंह रास व या राशीत जेव्हा गुरु दाखल होतो तो संपूर्ण काळ सिंहस्थ या नावाने ओळखला जातो.

सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय
सिंहस्थ पर्वणी

प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या भारताचे नागरिक म्हणून आपल्या ऐकण्यात अथवा वाचनात अनेकदा सिंहस्थ, सिंहस्थ पर्वणी, सिंहस्थ कुंभमेळा आदी शब्द येत असतात. महाराष्ट्रातील नाशिक येथील कुंभमेळा तर जगप्रसिद्ध आहे मात्र ही सिंहस्थ पर्वणी म्हणजे नक्की काय हे अनेकांना फारसे माहित नसते त्यामुळे या लेखात आपण सिंहस्थ म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

आपल्या ग्रहमालेत जे ग्रह आहेत त्यापैकी सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. गुरु हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीपेक्षा अधिक दूर आहे आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी गुरूला ४३३३ दिवस लागतात. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे. त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे.

भारतीय ज्योतिशास्त्रात जे राशीचक्र आहे त्यामध्ये एकूण बारा राशी आहेत आणि प्रत्येक ग्रह हा ठराविक काळाने एका राशीत येत असतो त्याचप्रमाणे गुरु ग्रह एका राशीत तेरा महिने असतो. एका राशीत तेरा महिने म्हणजे एकूण बारा राशींचे चक्र पार करण्यास गुरूस एकूण तेरा वर्षे लागतात. राशीचक्रातील एक रास म्हणजे सिंह रास व या राशीत जेव्हा गुरु दाखल होतो तो संपूर्ण काळ सिंहस्थ या नावाने ओळखला जातो व आधी सांगितल्याप्रमाणे गुरूस राशीचक्र पूर्ण करण्यास तेरा वर्षे लागतात त्यामुळे सिंहस्थ सुद्धा दर तेरा वर्षांनीच येतो.

गुरु सिंहराशीत अर्थात सिंहस्थास असतेवेळी काही शुभकृत्ये वर्ज्य करण्यात आली आहेत असे असले तरी भारतातील काही विशेष स्थाने आहेत ज्या ठिकाणी सिंहस्थ गुरूचा दोष लागत नाही. धर्मशास्त्रात वर्णिल्याप्रमाणे गोदावरी नदीच्या उत्तरेस आणि भागीरथी नदीच्या दक्षिणेस असलेल्या प्रदेशाशिवाय इतर ठिकाणी सिंहस्थ गुरूचा दोष लागत नाही.

या सिंहस्थ काळात गोदावरी या पवित्र नदीत स्नानाचे महत्व सर्वाधिक आहे. धर्मग्रंथांत असे प्रतिपादित करण्यात आले आहे की, जेव्हा सिंहराशीत गुरु असतो त्यावेळी जी पुण्यवान लोक गोदावरीत स्नान करतात त्यांना साठ हजार वर्षे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. सिंहराशीत गुरु असता गोदावरीत स्नान करणे अत्यंत पवित्र असून गंगा, यमुना, सरस्वती आणि भागीरथी या चार पवित्र नद्यांत स्नान केल्याचे पुण्य सिंहस्थाच्या वेळी गोदावरीत स्नान केल्याने प्राप्त होते व यामुळेच सिंहस्थ ही पर्वणी मानली जाते व संपूर्ण भारतवर्षातील जनता या काळात नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रात स्नानाचा आनंद घेते.