उरण शहर - एक सोन्याचा तुकडा

उरणचे प्राचीन नाव उरूण अथवा उरणे असे होते. उरण तालुक्यातील चाणजे या गावात उरणावती या देवीचे स्थान आहे व उरणावती देवीवरूनच उरण असे नाव या शहरास मिळाले असे म्हटले जाते.

उरण शहर - एक सोन्याचा तुकडा

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

उरण हे रायगड जिल्ह्याच्या वायव्येकडील तालुक्याचे ठिकाण. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले उरण हे पूर्वी 'सोन्याचा तुकडा' या नावाने प्रसिद्ध होते कारण हा भाग द्विपप्राय असल्याने थोडा विलगच होता. 

उरणचे प्राचीन नाव उरूण अथवा उरणे असे होते. उरण तालुक्यातील चाणजे या गावात उरणावती या देवीचे स्थान आहे व उरणावती देवीवरूनच उरण असे नाव या शहरास मिळाले असे म्हटले जाते. उरणचे भौगोलिक स्थान करंजा या बेटावर असून करंजा या बेटाची लांबी १२.८ किलोमीटर व रुंदी ६.४ किलोमीटर आहे. करंजा हे बेट पूर्वी चारही बाजूनी पाण्याने व्यापलेले असून मुख्य भूभागापासून हे बेट भेंडखळ या खाडीमुळे विलग झाले होते.

करंजा या बेटावरील गावांची नावे शेवा, जसखार, सोनारी, सावरखार, करळ, पाणजे, डोंगरी, मुळेखंड, पागोटे, फुंडे, नवघर, बोरी, केगाव, म्हातवली, काळा धोंडा, बोकडवीरा, भेंडखळ, रानवड, नागाव, चाणजे आणि या सर्व गावांच्या मध्यवर्ती असलेले गाव म्हणजे उरण शहर.

उरण तालुक्यावर प्राचीन काळापासून सातवाहन, त्रैकूटक, कलचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट व शिलाहार या राजवंशाची सक्रिय सत्ता प्रस्थापित होती. घारापुरी अथवा एलिफंटा ही प्रसिद्ध लेणी, मोरा हे प्राचीन बंदर, द्रोणागिरी किल्ला, पुरातन शंकर मंदिर हे उरण परिसराची प्राचीनता दर्शवितात या शिवाय येथे प्राचीन राजवटींची माहिती देणारे तीन शिलालेख व अनेक गधेगाळी सापडलेल्या आहेत.

खुद्द उरण शहर हे सुद्धा एकेकाळी भुईकोट किल्ला होते कारण पोर्तुगीजांनी या ठिकाणी एक भुईकोट निर्माण केला होता आता हा भुईकोट नामशेष झाला असला तरी सध्या उरण येथील कोट नाका अथवा काळा धोंडा नावाचा जो भाग आहे तेथे या किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार आजही पाहावयास मिळते. भुईकोटास एकूण चार बुरुज होते व डुक्कर खार या भागात एक दरवाजा असून सध्या जेथे उर्दू शाळा आहे तिथे तोफेचा बुरुज अस्तित्वात होता.

उरण शहरात अनेक मंदिरे आहेत. शहरातील प्रसिद्ध मंदिर म्हणजे उरणावती याच देवीचे नाव रमेण असेही होते. उरणावती देवी मंदिराच्या शेजारी शितळादेवीचे मंदिर आहे. याशिवाय उरणमधील संगमेश्वराचे मंदिर रामजी महादेव या सुभेदारांनी १७६० च्या दरम्यान बांधले. संगमेश्वर मंदिराच्या शेजारी शंकर पार्वती मंदिर आहे. येथील विठ्ठलदास रामजी यांना १२५ वर्षांपूर्वी पूर्वी तळ्यात प्राचीन बालाजीची मूर्ती सापडली होती त्या मूर्तीची स्थापना त्यांनी बालाजीचे मंदिर बांधून केली आहे. गावात मंगलदास बैरागी यांनी बांधलेले सुंदर दत्तमंदिर आहे याशिवाय उरणमध्ये मारुती, गणपती, लक्ष्मी नारायण व राममंदिर इत्यादी विपुल मंदिरे आहेत.

उरण शहरात मुस्लिम धर्मियांची जुम्मा मशीद व नंगाबाबा दर्गा आहे यातील जुम्मा मशीद ही १७५० साली बांधण्यात आली याशिवाय ख्रिश्चन धर्मीयांसाठी येथे एक चर्च देखील आहे जे १८३२ साली येथील मामलेदार डिसोजा याने बांधले.

उरणमध्ये पिण्याच्या पाण्याचे तीन मोठे तलाव होते यातील एक उरण मोरा रस्त्यावर, दुसरा करंजा ते उरण मध्ये व तिसरा उरण गावातील भीमाळे हा तलाव. कस्टम हाऊस जवळही तत्कालीन कस्टम कमिश्नर पिचर्ड स्पूनर याने एक तलाव बांधला होता अशी माहिती मिळते. 

उरण शहरास सुंदर असा समुद्रकिनाराही लाभला असून केंगाव बीच, दांडा रानवड बीच, नागांव बीच, पिरवाडी बीच असे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असे समुद्र किनारे उरण मध्ये पाहावयास व अनुभवायास मिळतात.

उरण मिठाचे आगार म्हणून प्रसिद्ध असून मिठाचे उत्पन्न व निर्यात पूर्वीपासून विपुल प्रमाणात होत असे. या ठिकाणी भिवंडीवाले नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी मिठप्रक्रियेवर संशोधन व प्रयोग करून मिठाचा दर्जा व उत्पन्न वाढवण्याची यशस्वी प्रयत्न केले होते. भिवंडीवाले यांचा सोडा वॉटरचा कारखाना व वॉटर वर्क्स त्यांच्या बागेत होते.

खूप पूर्वी येथे दारू गाळण्याचे कारखाने सुद्धा खूप असून उरण परिसरात सुमारे दारू गाळण्याचे २० परवाना असलेले कारखाने होते. असे म्हणतात की उरण हे त्याकाळी महाराष्ट्रातील दारू निर्मितीचे प्रमुख केंद्र होते आणि या कारखान्यांमुळे येथील अदमासे ८००० लोकांना रोजगार प्राप्त झाला होता मात्र कालांतराने हे कारखाने नाशिक येथे स्थलांतरित झाले व हा व्यवसाय कायमस्वरूपी ठप्प झाला. हळूहळू मिठाचा धंदाही पूर्वीप्रमाणे चालत नसल्याने उरणचे जुन्या काळचे वैभव हळूहळू कमी होत गेले. कालांतराने उरणमध्ये ओ.एन.जी.सी. व जे.एन.पी.टी हे दोन अतिशय मोठे प्रकल्प आले व उरण परिसराची पुन्हा एकदा भरभराट झाली.