सामराजगड - एक अपरिचित शिवकालीन दुर्ग

सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८० मीटर आहे. मुरुड येथून खाडीवरील पूल ओलांडून आपण रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एकदरा गावात शिरल्यावर तेथून गावाच्या मागे असलेल्या सामराजगडाची चढण सुरु होते.

सामराजगड - एक अपरिचित शिवकालीन दुर्ग
सामराजगड

महाराष्ट्रास दुर्गांची ऐतिहासिक परंपरा आहे. फक्त महाराष्ट्रातच अदमासे ३५० हुन अधिक किल्ले आहेत. हे किल्ले शिवकालीन इतिहासाचा अविभाज्य भाग असून आज्ञापत्रातील दुर्ग प्रकरणात

'हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले'

या शब्दांत दुर्गांचे महत्व प्रतिपादित केले आहे. मराठेशाहीनंतर दुर्गांचे महत्व हळूहळू राजकीय दृष्ट्या कमी होऊ लागले मात्र शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले हे दुर्ग आधुनिक महाराष्ट्राची तीर्थस्थाने आहेत.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील सामराजगड हा एक ऐतिहासिक मात्र अपरिचित दुर्ग. मुरुड जंजिरा येथे आल्यावर पर्यटक जंजिरा व पद्मदुर्ग या जलदुर्गांना आवर्जून भेट देतात मात्र काही जणांचीच पावले सामराजगडाकडे वळतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे या गडाविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र गेल्या काही वर्षांत दुर्गप्रेमींच्या जागरूकतेमुळे या अपरिचित किल्ल्याकडे पर्यटकांची पावले वळायला लागली आहेत.

सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८० मीटर आहे. मुरुड येथून खाडीवरील पूल ओलांडून आपण रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एकदरा गावात शिरल्यावर तेथून गावाच्या मागील बाजूस असलेल्या सामराजगडाची चढण सुरु होते.

गडाच्या पायथ्याशी एक शिवमंदिर असून रस्त्यात एकदरा गावातील घरे दुतर्फा दिसून येतात. काही वेळाने मनुष्यवस्ती संपून टेकडीच्या माथ्यावर आपण येऊन पोहोचतो व तेथून झाडाझुडपांतून वाट काढत आपण सामराजगडाच्या बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचतो. वाटेत दिसणारी वीरांची काही स्मारके गडाचे ऐतिहासिक महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात. 

पुढे पोहोचल्यावर गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार व बुरुज नजरेस पडतात. गडावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष आजही दिसून येतात मात्र काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे.

सामराजगडाचे महत्व हे त्याच्या उंचीमुळे नसून त्याचे स्थान आणि मराठ्यांचा प्रबळ शत्रू सिद्दी याची राजधानी असलेल्या जंजिरा या किल्ल्यावर वचक ठेवणे आणि राजपुरी खाडीवरील दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी होते. किल्ल्यावरून जंजिरा, पद्मदुर्ग, मुरुड शहर, राजपुरी खाडी व अरबी समुद्र असा विस्तृत परिसर दृष्टिक्षेपात येतो.

सामराज गडाच्या निर्मितीचा इतिहास फारसा उपलब्ध नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी जंजिरा मोहिमांमध्ये हा किल्ला बांधण्यात आला असावा. अनेकांच्या मते सामराजगडाचे बांधकाम हे १६६१ साली जेव्हा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीपंत यांना ५००० स्वार आणि २००० मावळे देऊन राजपुरीवर पाठवले होते तेव्हा झाले असे मानतात मात्र या मोहिमेपूर्वी सुद्धा शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर अदमासे १६५९ साली एक मोहीम काढली होती व तिचे नेतृत्व त्यांनी शामराज निळकंठ या पेशव्यांकडे दिले होते. त्या मोहिमेबद्दल जाणून घेऊ.

त्याकाळी सिद्दी फत्तेखान हा जंजिऱ्याचा वजीर होता. फत्तेखानाच्या कारकिर्दीत त्याचे त्याचे आजोबा तत्कालीन वजीर सिद्दी अंबर सानकच्या काळापासून जे अनुभवी कारभारी होते त्यांच्याशी पटेनासे झाले त्यामुळे सिद्दीच्या कारभाऱ्यांनी विविध भागात बंड उभारले व शिवाजी महाराजांची मदत मागितली. शिवाजी महाराजांनी त्यांची मागणी मान्य करून सिद्दीच्या मुलुखातील तळे, घोसाळे, बिरवाडी इत्यादी किल्ले स्वराज्यात आणले.

फत्तेखान हा व्यसनी होताच मात्र चुकीच्या लोकांच्या संगतीने त्याचा स्वभावही संशयी बनला होता त्यामुळे या संशयाच्या फेऱ्यात तेथील ७५ हुन अधिक हबशी मारले गेले. यावेळी किल्ल्यात सिद्दी खैरीयत आणि सिद्दी कासीम असे दोन हुशार हबशी भाऊ होते ते जीव वाचवण्यासाठी किल्ल्यातून निसटून विजापुरास जाण्यास निघाले. शिवाजी महाराजांना सिद्दीच्या राज्यातील अराजक समजले व जंजिरा किल्ला घेण्यासाठी ही योग्य संधी आहे असे पाहून त्यांनी शामराज निळकंठ पेशवे आणि बाजी घोलप यांच्यासोबत सैन्य देऊन त्यांना हबसाणात धाडले.

येथे सिद्दी खैरीयत आणि सिद्दी कासीम विजापुरास आदिलशहाकडे जात असताना त्यांना वाटेत कुणी इसम भेटला व त्याने खबर दिली की तुम्ही जंजिरा सोडून जाताय आणि शिवाजी महाराजांसारखे बलाढ्य राजे व आदिलशाहाचे प्रबळ शत्रू किल्ला जिंकायला येत आहेत तेव्हा तुम्ही नसलात तर किल्ला सिद्दीच्या हातून गेलाच असे समजा. हे ऐकून दोघे माघारी वळले व तळगडावर गेले, शामराज पंतांना ही खबर लागली आणि त्यांनी तळगड किल्ल्यास वेढा दिला.

मात्र येथून ते दोघे गुप्तपणे निसटले आणि तळ्यातील एका काजीकडे गेले व आश्रय घेतला. शामराजपंतांना खबर लागताच त्यांनी काजीच्या घराची झडती घेतली मात्र त्यांना दोघे सापडले नाहीत. काजीने नंतर दोघांना रहाटाड येथून होडीने जंजिऱ्यास पाठवले. फत्तेखानाच्या कानावर महाराजांच्या हल्ल्याची खबर गेलीच होती त्यामुळे तो चिंतेत होता यावेळी सिद्दी खैरीयत आणि सिद्दी कासीम पुन्हा किल्ल्यात आल्याने त्याच्या जीवात जीव आला आणि त्यांचे स्वागत करून सिद्दी खैरीयत याला त्याने सुभेदारपद दिले.

शामराजपंतांनी राजपुरी पर्यंत धडक मारली व येथून त्यांनी जंजिऱ्याचे राजकारण सुरु केले. त्यांनी सिद्दीकडे जंजिरा आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली. यावेळी खैरीयत याने असा निरोप पाठवला की किल्ला घेण्याची इच्छा असेल तर आम्हाला किल्ल्यात येऊन भेटावे. शामराजपंत किल्ल्यात गेल्यावर सिद्दी खैरीयतने त्यांना दग्यानें अटक केले आणि पुन्हा जंजिऱ्यावर चाल करणार नाही असे वचन घेऊन त्यांना परत पाठवले.

शिवाजीमहाराजांना सदर गोष्ट समजताच त्यांनी पुन्हा शामराजपंतांना तेथे जाण्याचा आदेश दिला मात्र वचनबद्ध असल्याने तेथे जाऊ शकत नाही असे शामराजपंतांनी सांगताच शिवाजी महाराजांची त्यांच्यावर इतराजी झाली व त्यांच्याकडून मोहिमेची जबाबदारी काढून घेण्यात आली.

सामराज गडाचा इतिहास याच कालावधीतील असावा कारण शामराज पंत हे तत्कालीन पेशवे या मोहिमेवर असताना हा किल्ला बांधण्यात आला असावा व त्यामुळे गडास सामराज गड म्हणून ओळख मिळाली असावी. साम्राज्य गड या अर्थानेही सामराज गड असा किल्ल्याच्या नावामागील आणखी एक निष्कर्ष काढता येतो.

पुढे शिवाजी महाराजांनी त्याच वर्षी निळोपंत मुजुमदार, दर्या सारंग, दौलतखान आणि मायनाक भंडारी उर्फ मायाजी भाटकर यांना जंजिऱ्यास धाडले व ही मोहीम बऱ्यापैकी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर १६६१ सालच्या पावसाळ्यात शिवाजी महाराजांनी व्यंकोजीपंतांबरोबर ५००० स्वार आणि २००० पायदळ देऊन त्यांना जंजिरा मोहिमेवर पाठवले. यावेळी मराठ्यांनी सिद्दीचे मुख्य स्थान राजपुरी सुद्धा जिंकून तेथे तळ दिला. याच कालावधीत शिवाजी महाराजांनी कांसा उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला बांधून. राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवली.. यानंतर मराठयांच्या राजपुरी खाडीवरील आरमाराचे केंद्र पद्मदुर्ग उर्फ कांसा हा किल्ला बनला. या मोहिमेतही सामराजगडाचे अमूल्य योगदान मराठ्यांना लाभले असावे.

१६८२ साली संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर मोहीम काढली होती त्यावेळी त्यांनी दादाजी देशपांडे यांना राजपुरीस धाडले होते. यावेळी त्यांच्यासोबत मायनाईक आणि गोविंदराव काथे हे दोन सरदार, आरमार व सैन्य होते. जंजिरा मोहीम यशस्वी केल्यास दादाजी देशपांडे यांना अष्टप्रधान मंडळात घेण्याचे वचन संभाजी महाराजांनी दिले होते. दादाजी देशपांडे यांनी सामराजगडावर तळ दिला. यानंतर स्वतः संभाजी महाराज वीस हजार सैन्य व औरंगजेबाचा मुलगा सुलतान अकबर यास घेऊन सामराजगडावर दाखल झाले.

यानंतर सामराजगडावरून संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु केला व हा वर्षाव सलग ३० दिवस सुरु होता. या हल्ल्यामुळे जंजिरा किल्ल्याचा समोरील तट कोसळला आणि सिद्दींची पाचावर धारण बसून त्यांनी जंजिरा किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर आश्रय घेतला. 

यानंतर संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांना जंजिरा किल्ल्यातील दारुखान्यास आग लावण्यासाठी सामराजगडावरून गुप्तरित्या धाडले मात्र दुर्दैवाने हा कट उघडकीस आल्याने सिद्दी खैरीयतने कोंडाजी फर्जंद यांना हाल हाल करून मारले.

यानंतर संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची खाडी आठशे वार रुंद आणि तीस वार उंच अशा दगडांनी भरून काढण्यास घेतली. प्रभू श्रीरामांनी लंकेत जाण्यासाठी जसा समुद्रात सेतू बांधला तसाच संभाजी महाराजांनीही जंजिरा किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी सेतू बांधण्याचे काम सुरु केले. मात्र उत्तरेतून मोगलांनी हसन अली खान यास ऐनवेळी स्वराज्यावर पाठवले व त्याने स्वराज्यातील कल्याण हे सुभ्याचे ठिकाण जिंकल्याने संभाजी महाराजांना ही मोहीम सोडून मोगलांच्या परामर्शास जावे लागले. यानंतर दादाजी देशपांडे यांनी सामराज गडावरून ही मोहीम सुरु ठेवली होती.

तर असा हा सामराजगड पाहावयाचा असेल तर काही तास पुरतात मात्र गडाचा वैभवशाली इतिहास कायमचा आपल्या मनात कोरला जातो. आजही हा किल्ला आपला इतिहास सांगण्यासाठी आतुर आहे त्यामुळे शिवकाळातील या दुर्गास एकदा तरी भेट देऊन त्याची कैफियत ऐकणे गरजेचे आहे.