अच्युतानंद स्वामी - प्रसिद्ध मल्लविद्या प्रचारक
अच्युतानंद स्वामी यांचा रोजचा सराव हा ३३०० जोर आणि ३३०० बैठका एवढा जबरदस्त असे आणि अगदी आजारपणातही त्यांचा सराव चुकत नसे.
कुस्ती अथवा मल्लविद्या हा भारतीय मातीत निर्माण झालेला खेळ मानला जातो. प्राचीन काळापासून आधुनिक काळातही कुस्तीचे अथवा मल्लविद्येचे महत्त्व कमी न होता ते वाढतच आहे.
मल्लविद्येची परंपरा ही प्राचीन असली तरी तिचा प्रवाह कालौघात अधुन मधून खंडित होत असे व अशावेळी या विद्येचे पुनर्जीवन करण्यासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लोक उदयास आले.
एकोणिसाव्या शतकात सुद्धा मल्लविद्या संक्रमण काळातून जात होती व यावेळी बाळंभट देवधर यांनी या विद्येचे पुनर्जीवन केले आणि त्याचबरोबर मल्लखांब या विद्येचा शोध लावून एक नवा आदर्श प्रस्थापित केला.
बाळंभट देवधरांच्या कार्यास पुढे नेण्याचे काम करणारे मल्लविद्याप्रचारक म्हणून अच्युतानंदस्वामी यांचे नाव घेतले जाते.
अच्युतानंद हे नाव वाचून ते कुणा अध्यात्मिक व्यक्तीचे वाटते व ते खरे सुद्धा आहे. अच्युतानंद हे फक्त मल्लविद्याप्रचारकच नव्हते तर एक अध्यात्मिक पुरुषही होते.
अच्युतानंद यांचे मूळ नाव दामोदर मोघे. दामोदर मोघे यांचा जन्म १८३९ साली मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका मराठी कुटुंबात झाला व त्यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण आणि आईचे नाव जानकी असे होते.
बालवयातच दामोदर यांना मल्लविद्येत प्रवीण होण्याची इच्छा असल्याने त्यांनी काशी येथे जाऊन बाळंभट देवधर यांच्या प्रसिद्ध आखाड्यातील प्रमुख कोंडभट गोडबोले यांच्याकडे मल्लविद्येचे धडे घेण्यास सुरुवात केली.
कोंडभट यांच्याकडे शिक्षण घेत असताना त्यांनी खूप वेगाने मल्लविद्या या खेळात प्राविण्य मिळवले आणि तेथील अनेक स्पर्धांमध्ये विरोधी मल्लाना चितपट केले.
मल्लविद्या शिकत असताना दामोदर यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती.
दामोदर उर्फ अच्युतानंद स्वामी यांचा रोजचा सराव हा ३३०० जोर आणि ३३०० बैठका एवढा जबरदस्त असे आणि अगदी आजारपणातही त्यांचा सराव चुकत नसे. जोर आणि बैठका यांच्याव्यतिरिक्त मल्लखांब आणि कुस्ती यांचा सरावही सुरूच असे.
दामोदर यांना अच्युतानंद हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे ते एक अध्यात्म शास्त्रातील निष्णात गृहस्थ असून त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या.
अच्युतानंद यांनी मल्लविद्येचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी आखाडे निर्माण केले आणि मल्लखांबाचा प्रचार केला.
अच्युतानंद यांच्याकडून शिक्षण घेऊन पुणे आणि सातारा येथे त्यांच्या नावाने कुस्तीचे आखाडे सुरु झाले होते. प्रसिद्ध मल्लविद्यापटू अण्णा वझे यांनी सातारा तर गणेश वझे आणि सीतारामगुरू भट यांनी पुण्यात अच्युतानंद यांच्या नावाने आखाडे सुरु केले.
पुण्यातील खासगीवाले यांच्या वाड्यात अच्युतानंदव्यायामशाळा अगदी काही वर्षांपर्यंत सुरु होती.
अचुत्यानंद यांच्या आखाड्याची खूण म्हणजे वेताचा मल्लखांब समजली जात असे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर हे अच्युतानंद यांचे जन्मस्थान व त्याठिकाणी त्यांचे शिष्य रामचंद्रराव पेंटर यांनी अच्युतानंद यांच्या कार्याचा मोठा प्रचार केला होता.