रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास

विश्वकर्म्याने अयोध्या नगरीत मोठमोठे मंडप, सुवर्ण दुर्ग, प्राकार आदी निर्माण केले आणि कुलवंत, नीतिमान आणि विद्यासंपन्न अशी माणसे वसवली.

रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास
रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास

भारतातील एक प्राचीन व धार्मिक महत्व असलेले स्थळ म्हणजे रामजन्मभूमी अयोध्या. सूर्यवंशातील इश्वाकू कुळात दशरथ राजाच्या व कौसल्येच्या उदरी जन्म घेतलेल्या रामाने आपल्या कार्यकाळात एक आदर्श स्थापित केल्यामुळे संपूर्ण भारतात श्रीराम हे श्रद्धास्थान व विष्णूचा अवतार मानले जातात.

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या नगरीसही तेवढेच महत्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे त्यामुळेच रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या ही रामजन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे व तिच्या या महत्त्वामुळे ही नगरी भारतात ज्या सात मोक्षदायक पुऱ्या आहेत त्यापैकी एक आहे.

अशा या पवित्र अयोध्या नगरीचे महत्व हे रामजन्माच्याही पूर्वीपासून आहे. अयोध्या ही शरयू या नदीच्या काठावर वसलेले एक नगर असून हिची स्थापना ही सृष्टीची निर्मिती जेव्हा सुरु झाली तेव्हाच झाली असल्याची माहिती पुराणांत सापडते. ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरु केली त्यावेळी त्याने विष्णूच्या आज्ञेवरून सृष्टीचा वास्तुविशारद विश्वकर्मा यास सर्व ऐश्वर्यांनी युक्त अशी एक नगरी निर्माण करण्यास सांगितले व या नगरीस अयोध्या हे नाव प्राप्त झाले.

विश्वकर्म्याने अयोध्या नगरीत मोठमोठे मंडप, सुवर्ण दुर्ग, प्राकार आदी निर्माण केले आणि कुलवंत, नीतिमान आणि विद्यासंपन्न अशी माणसे वसवली. या नगरीचे निर्माण पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेव यांनी ही नगरी पहिली आणि अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी मनू या सूर्यवंशातील क्षत्रियास असे सांगितले की या अद्भुत अशा नगरीत तू आपल्या इश्वाकू या पुत्राची स्थापना करावीस. मनूने ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून अयोध्येत इश्वाकुची स्थापना केली व यानंतर इश्वाकू तेथे राज्य करू लागला.

त्याकाळात इश्वाकुने अयोध्येत राज्य सुरु केले त्यावेळी या ठिकाणी शरयू नदी नव्हती. नदी ही तर जीवनदात्री त्यामुळे नदीचं नसेल तर अनेक वैभवशाली नगरे सुद्धा काही काळातच कालवश होतात हे इश्वाकू राजास माहित होते त्यामुळे त्याने वसिष्ठ यांना आपली चिंता सांगितली आणि म्हणाला की ज्या ठिकाणी आदर्श राजा, श्रीमान, विद्वान व धर्मपालन करणारे लोक,वैद्य आणि नदी या पाच गोष्टी नसतात अशा ठिकाणी निवास करणे योग्य नाही. या अयोध्येत सर्व काही आहे पण पण पाण्याचा स्रोत बिलकुल नाही त्यामुळे आता पुढे काय करावे?

वसिष्ठ ऋषींना इश्वाकुचा प्रश्न पटला आणि त्यांनी यावर उपाय म्हणून विष्णूची प्रार्थना सुरु केली आणि या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या विष्णूच्या नेत्रांतून शरयू नदीचा प्रवाह निर्माण होऊन तो अयोध्येत स्थिरावला. शरयू नदीचे आगमन येथे झाल्यावर देश विदेशातून अनेक लोक अयोध्या नगरीत येऊन स्थायिक झाले व इश्वाकू राजाच्या छत्राखाली आनंदाने राहू लागले.

याच इश्वाकू राजाच्या कुळातील बासष्टावा राजा म्हणजे श्री दशरथ आणि त्रेसष्ठावा राजा म्हणजे साक्षात विष्णूअवतार प्रभू रामचंद्र. त्रेतायुगाच्या अंती रामावतार पूर्ण झाला आणि रामाने शरयू नदीतच प्रवेश करून आपले अवतारकार्य पूर्ण केले. रामायण काळानंतर अयोध्या नगरीस एक धार्मिक व अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले व त्यानंतर अयोध्या ज्या ज्या राजांच्या राज्यांतर्गत होती त्यांनी या ठिकाणी मंदिरे, नद्यांचे घाट, धर्मशाळा, विद्यालये आदी निर्माण केली आणि भरतखंडात अनेक विद्वान व धार्मिक लोक या ठिकाणी येऊन ज्ञानाची व मोक्षाची प्राप्ती करू लागले.

रामायण काळास आजपावेतो सात हजार वर्षे पूर्ण झाली असे म्हटले जाते व इतक्या वर्षांनंतरही राम नामाचा महिमा कायम आहे व तेवढाच महिमा राजन्मभूमी म्हणून अयोध्येस आहे.